आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ मार्च २०२० सकाळी ११.००
वाजता
****
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात येत्या
एकतीस मार्चपर्यंत संचार बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना आज मुख्य सचिव अजेय मेहता
यांनी जारी केली. या अधिसूचनेनुसार अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या
दळणवळणासाठी राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
एसटी महामंडळाच्या बसेस आणि मेट्रो यांसह एका राज्यातून दुसऱ्या
राज्यात तसंच एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद
असतील.
प्रवासी चारचाकी टॅक्सीमध्ये चालकाव्यतिरिक्त अन्य दोन व्यक्ती
तर ऑटोरिक्षात चालकाव्यतिरिक्त एका प्रवाशाला अत्यावश्यक प्रवासासाठी मान्यता असेल.
अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी प्रवासी वाहतूक करण्यास अधिसूचनेत मान्यता देण्यात आली
आहे.
विलगीकरणात राहण्याचे निर्देश देण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने
त्याचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि त्याला शासकीय विलगीकरण व्यवस्थेत
स्थलांतरित केलं जाईल. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास
बंदी असेल.
शासकीय कार्यालये आणि सुरू ठेवण्यात येणारी दुकाने आणि आस्थापने
यांनी अतिशय कमीतकमी कर्मचारीवर्ग असण्याची आणि परस्परांपासून किमान अंतर राखण्याची
दक्षता बाळगावी.
गरज भासल्यास, आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची
व्यवस्था करण्यासाठी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना
रूग्णालयाच्या आसपास उपलब्ध जागांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या कोरोना विषाणू मुक्त असलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना
त्यांच्या जिल्ह्यात बाहेरून वाहने येण्यास प्रतिबंध करणारे आदेश काढण्याचे अधिकार
दिले आहेत.
****
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता एकशे एक वर पोहोचली
आहे. पुण्यात तीन तर सातारा इथं एक नवीन रुग्ण आढळून आला आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात सरसम इथं पुणे, मुंबई,
औरंगाबाद, हैदराबाद इथून गावाकडे परतलेल्या सत्त्याण्णव जणांची तपासणी करून त्यांच्या
हातावर "होम क्वारंटाईन" हा शिक्का मारण्यात आला आहे. बाहेरगावाहून आलेल्या
व्यक्तीबाबत माहिती मिळताच प्रशासनास कळवावं, असं आवाहन ग्रामसेवक अच्युत जोशी, सरपंच
शशिकला नगराळे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment