Tuesday, 24 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24.03.2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक मार्च २०२० सकाळी ७.१० मि.
****
** कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू; आंतर जिल्हा वाहतूकही पूर्णपणे बंद
** राज्यात कोरोना विषाणू बाधित २३ नवे रूग्ण; रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि मर्यादित स्वरुपारक्तदान शिबीर घेण्याच आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
** संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित; लोकसभेत चर्चेविना अर्थसंकल्प मंजूर
** आणि
** मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे नेते शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा विराजमान
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर, संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याचा, तसंच आंतर जिल्हा वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केला. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कुठल्याही कारणासाठी नागरिकांना, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही.

राज्यात १४४ कलम लागू केलेला आहे संचारबंदी सुद्धा मला आज लागू करावी लागते आहे. याचं कारण असं अनेक वेळा लोकांना वाटत असतं आता काय एवढं संकट वाटत नाहीये आपण एक फेरफटका मारून येऊयात हे मौज मजा करण्याची वेळ नाहीये काल आपण एक निर्णय घेतला होता महाशिवराज्याच्या सीमा ह्या सील केल्यात. आज आपण आंतर जिल्हा म्हणजे जिल्हा जिल्हाच्या सीमा सुद्धा सील करीत आहोत याचं कारण असं सुदैवानं अजूनही महाराष्ट्रात असे काही जिल्हे, बरीच काही ठिकाणे अशी आहेत तिथे हा विषाणू पोहोचलेला नाहीये या जागा आपल्याला सर्वप्रथम ठेवायच्या सुरक्षित ठेवायच्या आहेत.

जीवनावश्यक वस्तू मात्र लोकांसाठी उपलब्ध राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले.

जीवनावश्यक वस्तू म्हणजे त्यामध्ये अन्नधान्य असेल, औषध आलीत, औषध बनवणारे कारखाने आले औषध आणि जीवनावश्यक वस्तू यांचे यांची ने – आण करणारी वाहतूक आली हे सगळं उघडे राहील, बेकरी उघडे राहील. शहरामध्ये काही पाळीव प्राणी आहेत त्यांच्या संबंधातील त्यांची खाद्य पदार्थांची दुकान उघडे राहतील त्यांचे दवाखाने उघडे राहतील आणि त्याच्यात विशेषतः कृषी उद्योग आणि कृषी विषयक मग बियाणी असेल खत असेल हे दुकान आणि हे पुरवणारे कारखाने आणि त्याचे वाहतूक ती सुद्धा उघडी असेल.

मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी, आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशीही, दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी, पुढचे पंधरा दिवस गांभिर्याने वागण्याची गरज असून, आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा, आणि आरोग्य व्यवस्था वाढवा, अशा सूचना दिल्या. तात्पुरत्या सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण कराव्यात, आवश्यकता असल्यास लष्कराचं मार्गदर्शन घ्यावं,  गावपातळीवर काम करणाऱ्या आशा, आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना, आवश्यक वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात यावं, खाजगी आस्थापनांमध्ये, कारखान्यात काम करणाऱ्या, विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये,सं आवाहनही त्यांनी केलं.
ऑटो रिक्षा तसंच खासगी वाहनांद्वारे, प्रवासी वाहतुकीवरही मर्यादा घालण्यात आल्या असून, दुचाकी वाहनांना शंभर रुपयांचं, तर चारचाकी वाहनांना एक हजार रुपयांचं पेट्रोल एका वेळी दिलं जाणार आहे. नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ९७ झाली आहे. काल २३ नवीन रुग्णांची नोंद झाली, यामध्ये मुंबईत १४, सांगली चार, तर पुणे, सातारा, ठाणे, वसई-विरार आणि नवी मुंबई इथं प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी, प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात येत असून, येत्या २७ मार्चपासून सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, कोरोना संसर्ग चाचणी केंद्र सुरू केलं जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भानं आरोग्य व्यवस्थेवर आलेल्या ताणामुळे, रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता टोपे यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांनी सुरक्षित पद्धतीनं, मर्यादेत स्वरुपाच्या आणि सामाजिक स्तरावर व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखलं जाईल, अशा पद्धतीनं रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं, असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनीही घाबरुन न जाता सुरक्षेची खबरदारी घेत, रक्तसंकलनात योगदान द्यावं असंही आवाहन टोपे यांनी केलं आहे.
सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूरमध्ये चार जण कोरोनाबाधित झाल्याचं आढळून आलं आहे. एकाच कुटुंबातील हे चारही जण हज यात्रेहून आले होते. या सर्वांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलं आहे. सातारा शहरातही विलगीकरण कक्षातल्या एका महिलेचा अहवाल सकारात्मक आला आहे.
****
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल निर्धारित मुदतीच्या दोन आठवडे आधीच अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं. आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत काल चर्चेविना मंजूर झाला. देशानं रविवारी पाळलेला जनता कर्फ्यू आणि वैद्यकीय तसंच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना नागरिकांनी केलेलं अभिवादन, याचं लोकसभेनं कौतुक केलं,
राज्यसभेचं कामकाजही काल अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. त्यापूर्वी कार्यकाळ पूर्ण झालेल्या सदस्यांना काल निरोप देण्यात आला.
****
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनानं घेतलेल्या निर्णयांचे आणि घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या तसंच रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नसून रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. राज्याचा आरोग्य विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज संस्थांचे, तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी त्यांची जबाबदारी जीवाचा धोका पत्करुन उत्तमपणे पार पाडत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करु नये, तसे केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कारवाई करु, असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते शिवराजसिंह चौहान यांनी काल चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काल भाजप आमदारांच्या बैठकीत चौहान यांची गटनेतेपदी निवड झाली. कलमनाथ यांच्या नेतृत्वातलं काँग्रेसचं सरकार अल्पमतात आल्यानं कमलनाथ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केला होता.
****
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कालपर्यंत ४७० व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील एकालाही कोरोनाची लक्षणे आढळुन आली नाहीत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १ हजार २५९ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ३० जणांचं जिल्हा आरोग्य विभागामार्फत घरात विलगीकरण करण्यात आल आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सर्व यंत्रणेवर सोपवली असून यामध्ये कोणही हलगर्जीपणा करू नये अस आवाहन लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केल आहे. बेजवाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस प्रशासनाला करणार असल्याच केंद्रे यांनी सांगितलं. 
****
परदेशातून जालन्यात आलेल्या आणि सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या सात कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल नकारात्मक आले आहे. विलगीकरण कक्षात भरती असलेल्या आणखी काही संशयितांचे अहवाल येणं बाकी असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात घेतलेल्या १९ जणांचे लाळेचे अहवाल नकारात्मक आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे यांनी दिली आहे. उस्मानाबाद नगरपालिकेनं कोरोना विषाणापासून बचावाचा उपाय म्हणून शहरात बारा ठिकाणी हात धुण्यासाठीची केंद्र सुरू केली आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या नांदापूर गावात ग्रामपंचायतीनं नवीन व्यक्तींना प्रवेश बंदी केली आहे. घराबाहेर न जाण, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गावातून बाहेरगावी जाणाऱ्या - येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्यात येत आहे. तसेच गावात प्रवेश करतांना हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सचना देण्यात येत आहे.
****
लातूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकशे वीस शाखांमध्ये सरकारी अनुदान, पिक विमा जमा झाला आहे. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिकविमा अनुदान वाटप सध्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक हनमंत जाधव यांनी काल ही माहिती दिली.
****












No comments: