Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27
March 2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मार्च २०२०
सायंकाळी ६.००
****
‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
रिझर्व्हं बँकेने जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत
होईल, असं राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र, कर्जवसुली पुढचे
तीन महिने स्थगित करावी, असा केवळ सल्ला नव्हे तर स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेने द्यावेत,
असंही पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी
राज्यातल्या हॉटेलांना खाद्यपदार्थ घरपोहोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी
देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ शिजवणारे तसंच पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता
आणि ‘कोरोना’ सुरक्षेची योग्य काळजी घेणं आवश्यक असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
नागरिकांनी भाजीपाला, फळं, मासे मांस घेण्यासाठी बाजारात गर्दी आणि त्यामुळे होणारा
संसर्ग टाळावा, असं आवाहनही पवार यांनी केलं. राज्य सरकारने लष्कराला लिहिलेलं पत्र
हे फक्त लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरतंच मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्र्यांनी
केला आहे.
****
लॉकडाऊनच्या कालावधीत दिव्यांगांना
एका महिन्याचं राशन तसंच आरोग्यविषयक किट घरपोच वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांची
विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याचे सामाजिक
न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या किटमध्ये धान्य, तेल इत्यादी साहित्यासह
सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल अशा आरोग्यविषयक साहित्याचाही समावेश
असणार आहे.
****
सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची
संख्या २३ झाली आहे. १२ जणांचे अहवाल आज पॉझीटिव्ह आले आहेत. इस्लामपूर इथल्या एकाच
कुटुंबातल्या ६ महिला आणि ६ पुरुष अशा एकूण बारा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात संचारबंदी काळात
लोकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं नियंत्रण कक्षाची
स्थापना करण्यात आली आहे, या कक्षाचा हेल्पलाइन क्रमांक १०९१ असा आहे. नांदेड जिल्हा
पोलिस दलाची व्हाट्सअप मेसेज सेवा सुरू करण्यात आलेली असून त्याचा क्रमांक ८८ ८८ ८८
९२ ५५ आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात शेतीच्या
कामाला मजूर कामाला येत नसल्यामुळे शेतकरी कुटुंबातल्या सर्वच सदस्यांना हळद काढणीचं
काम कराव लागत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नरसी शहरानजिकच्या गरीब वस्तीत
रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी प्रतीकुटुंब धान्य,
तेल, तसंच भाजीपाल्याचं वाटप केलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर जवळ लोणीमोड
इथं वस्तीत राहणाऱ्या गोरगरीब लोकांना विश्व हिन्दू परिषदेनं मदत केली. या वस्तीत एकूण
२६ कुटुंब आहेत. या कुटुंबांना १० दिवस पुरेल इतकं अन्नधान्य देण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जीवनावश्यक
वस्तू वितरणात काळाबाजार होत असल्याचं आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा पालकमंत्री वर्षा
गायकवाड यांनी दिला आहे. जिल्ह्यात जीवनावश्यक
वस्तूंचा पुरवठ्याबाबत नागरिकांना कुठलाही अडथळा येणार नाही, यासाठी प्रशासनाने संपूर्ण
सहकार्य करण्याचे निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
दरम्यान, कोरोना उपचार आणि प्रतिबंधासाठी
हिंगोली पोलीस वाहतूक शाखेनं ८१ दिवसांच वेतन पंतप्रधान मदत निधीला दिलं आहे.
****
जालना जिल्ह्यात ग्रामस्थांना
जीवनावश्यक वस्तू घेताना अडचणी येऊ नये यासाठी नऊ सदस्यीय समितीचं गठन करण्यात आलं
आहे. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तसंच महिला बचत गटाच्या सदस्यांचा समावेश असलेल्या या
समितीनं, जीवनाश्यक वस्तूंची साठेबाजी होऊ नये, तसंच नागरिकांनी गर्दी करु नये याबाबत
खबरदारी घ्यावी असे निर्देश, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
****
हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयात
एका संशयिताला दाखल करण्यात आलं आहे. या संशयित रुग्णाच्या घशातल्या स्रावाचा नमुना
पुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, लातूर इथल्या विलासराव
देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दुपारी चारवाजेपर्यंत एकुण ९३ व्यक्तींची
तपासणी करण्यात आली. यापैकी ५० जणांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते,
यापैकी ४३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असून सात व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
****
No comments:
Post a Comment