Friday, 27 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 27.03.2020 TIME – 11.05 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ मार्च २०२० सकाळी ११.०५ वाजता
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याज दरात मोठी कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत  ही माहिती दिली. रेपो दरात शून्य पूर्णांक ७५ शतांश अंकांची कपात करण्यात आली आहे, यामुळे रेपो दर ५ पूर्णांक १५ शतांश टक्क्यांवरून ४ पूर्णांक ४ दशांश टक्क्यावर खाली आला आहे. रिव्हर्स रेपो दरातही बँकेनं शून्य पूर्णांक ९० शशांश अंकांची कपात केली आहे. त्यामुळे रिव्हर्स रेपो दर ४ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांवरुन ४ टक्के झाला आहे. अल्पमुदतीच्या व्याजदरात घट झाल्याने गृह तसंच वाहन कर्जाच्या हप्त्यांची रक्कम तसंच हप्त्यांची संख्याही कमी होणार आहे. सर्व बँकांनी सर्व प्रकारच्या कर्जवसुलीचे हप्ते तीन महिन्यांपर्यंत वसूल करू नयेत, असंही दास यांनी म्हटलं आहे. कॅश रिझर्व्ह रेपो मध्ये शंभर अंकांची कपात करण्यात आली आहे, यामुळे खेळत्या भांडवलात तीन लाख ७४ हजार कोटी रुपयांनी वाढ होईल, असं दास यांनी सांगितलं. कोरोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता असून भारताच्या विकासदरातही घट होण्याची शक्यता दास यांनी वर्तवली.
****
देशभरातल्या कोरोना बाधितांची संख्या ७२४ झाली आहे. यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला असून, ६७ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं देशातल्या २७ खाजगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी सर्वाधिक आठ प्रयोगशाळा महाराष्ट्रात असणार आहेत.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू असतांना धुळे शहरात मोटार सायकलवर फिरत फेसबुक वर थेट प्रक्षेपण करत चित्रफित तयार करण्याऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संचारबंदी आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या देखत त्याने आपली चूक मान्य करून, अशी चूक शहरातील इतर कोणी करु नये असं आवाहनही त्यानं केलं आहे.
****


No comments: