Monday, 23 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 23.03. 2020 TIME – 11.00 AM



आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात आणखी तीन विषाणू चाचणी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता या संशयितांच्या नमुन्यांची चाचणी क्षमता आता शंभर वरून आता सहाशे पर्यंत वाढली आहे, अशी माहिती राज्यातले वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. यापैकी दोन चाचणी सुविधा केंद्र पुण्यात तर एक मुंबईत सुरू करण्यात आले आहे. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून करोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशे पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुंबईत काल रात्री मरण पावलेल्या फिलिपाईन्स देशाच्या नागरिकाला कोरोनाचा संसर्ग झालेला नव्हता. बृहन्मुंबई महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून ही माहिती देण्यात आली. मूत्रपिंड निकामी झाल्यानं, तसंच दम्याचा त्रास बळावल्यानं, या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी डिजिटल व्यवहार पद्धतींचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या काळात एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीनं डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा आज बलिदान दिवस. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. देश त्यांच्या बलिदानाची नेहमीच आठवण ठेवेल. अशा  भावना मोदींनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे.
समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. लोहिया यांचं कार्य आणि आदर्श लोकांना नेहमीच प्रेरणा देतील असं मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****


No comments: