Saturday, 28 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.03.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****
 मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी काही  स्थलांतरित मजूर आपल्या गावी परतण्यासाठी चालत निघाले असताना मागून येणाऱ्या टेम्पोनं धडक दिल्यानं  ५ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

 दररोज रोजंदारीवर कामं करणाऱ्या या मजुरांना आता कामं नसल्यानं आणि खाण्यापिण्याची तसचं राहण्याची योग्य ती सोय नसल्यानं हे मजूर आपल्या मूळ गावी परतत होते.

 या जखमींवर हायवे इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत.

 संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या अलिबाग मधल्या मुरुड तालुक्यात साळाव इथल्या ७ जणांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात काल गुन्हे दाखल करण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टीनं कोणतीही खबरदारी न घेता,  हे ७ जण मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी एकत्र आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
****

 प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  संचारबंदी असल्यामुळे  रूग्णांना रक्ताचा तुटवडा पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं समर्पण परिवार या संस्थेमार्फत आज रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. भोकर इथं न्यायालयाच्या परिसरात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबीर असेल. सकाळी १० वाजात सुरू झालेल्या या शिबीरासाठी प्रशासनाकडून विशेष परवानगी घेण्यात आली आहे.
****

नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या भाजीपाला बाजारात राज्यभरातून सुमारे १ हजार वाहनं दाखल झाली आहेत. ठोक खरेदी करणारांची संख्या ही मोठी आहे. या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचं निदर्शनास येत असून काही व्यापाऱ्यांनी एक पेक्षा जास्त वाहनांमध्ये भाजीपाला मागवल्यानं बाजारातलं नियोजन कोलमडलं आहे.
*****
***

No comments: