Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 28 March 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ मार्च २०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø रिझर्व्ह बँकेकडून
व्याज दरात मोठी कपात; गृह तसंच वाहन कर्जाचे
हप्ते कमी होणार
Ø ट्रेसिंग-टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर कोरोनाशी लढा; जनतेनं सहकार्य करण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं
आवाहन
Ø राज्यात
कोरोनाचे नवीन २८ रुग्ण; एकूण रुग्णसंख्या १५३ तर २४ रुग्णांना
डिस्चार्ज
Ø प्रजापिता ब्रह्मकुमारी संघटनेच्या
प्रमुख राजयोगिनी जानकी दादी यांचं निधन
आणि
Ø कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर समाजातून
गरजूंसाठी मदतीचा ओघ
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याज दरात मोठी कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. रेपो दरात शून्य पूर्णांक ७५ शतांश अंकांची कपात करण्यात
आली आहे, यामुळे रेपो दर ५ पूर्णांक १५ शतांश टक्क्यांवरून ४
पूर्णांक ४ दशांश टक्क्यापर्यंत खाली आला आहे. रिव्हर्स रेपो दरातही बँकेनं शून्य पूर्णांक ९० शतांश अंकांची कपात केली आहे.
त्यामुळे रिव्हर्स रेपो दर ४ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांवरुन ४ टक्के
इतका झाला आहे. अल्पमुदतीच्या व्याजदरात
घट झाल्यानं गृह तसंच वाहन कर्जाच्या हप्त्यांची रक्कम तसंच हप्त्यांची संख्याही कमी
होणार आहे. सर्व बँकांनी सर्व प्रकारच्या कर्जवसुलीचे हप्ते तीन
महिन्यांपर्यंत वसूल करू नयेत, असंही दास यांनी म्हटलं आहे.
कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये शंभर अंकांची कपात करण्यात आली आहे, यामुळे खेळत्या भांडवलात तीन लाख ७४ हजार कोटी रुपयांनी वाढ होईल, असं दास यांनी सांगितलं. कोरोनामुळे जगभरात मंदी येण्याची
शक्यता असून भारताच्या विकास दरातही घट होण्याची शक्यता दास यांनी वर्तवली.
****
रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या व्याजदरात
कपातीच्या निर्णयाचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी स्वागत केलं आहे. बँकेनं कमी केलेल्या व्याज दराचा ग्राहकांना लवकरात लवकर लाभ व्हावा,
अशी अपेक्षा व्यक्त करताना, कर्ज हप्त्यांच्या
वसुलीला दिलेली तीन महिन्यांची स्थगिती मोठा दिलासा देणारी असल्याची भावना अर्थमंत्री
सीतारामन यांनी व्यक्त केली. देशाची अर्थव्यवस्था या संकटाचा
सामना करण्यासाठी भक्कम असल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं.
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश
जावडेकर यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यामुळे उद्योग
व्यवसायांवरचा व्याजाचा ताण कमी होईल, त्यामुळे आर्थिक व्यवहारांना
गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
रिझर्व्हं बँकेनं जाहीर
केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होईल, असं राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र, कर्जवसुली पुढचे तीन महिने स्थगित करावी, असा केवळ
सल्ला नव्हे तर स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेनं द्यावेत, असंही
पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नागरिकांच्या
सोयीसाठी राज्यातल्या हॉटेलांना खाद्यपदार्थ घरपोहोच किंवा सोसायट्यांपर्यंत
पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ शिजवणारे तसंच पोहचवणाऱ्या
व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षेची
योग्य काळजी घ्यावी, असं पवार यांनी सांगितलं. राज्य सरकारने
लष्कराला लिहिलेलं पत्र हे फक्त लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरतंच मर्यादित
असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे.
****
गोरगरीब आणि असंघटीत कामगारांसाठी
केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या मदतीची योग्य अंमलबजावणी घेणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते. या लॉकडाऊनच्या
काळात, आर्थिक ताण पडला तर थोडा सहन करावा आणि प्रत्येकानं
आपल्यापेक्षा वंचिताला मदतीचा हात द्यावा, असं
आवाहन पवार यांनी केलं. कोरोना विषाणू प्रसाराला
प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी पूर्णवेळ घरात थांबणं आवश्यक असल्याचं पवार यांनी नमूद
केलं. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून विचारलेल्या प्रश्नांनाही
पवार यांनी उत्तरं दिली.
****
कोविड -१९ च्या
पार्श्वभूमीवर केंद्र सरकार करत असलेल्या विविध उपाय योजनांमुळे असंघटित
क्षेत्रातले कामगार आणि निराधारांच्या समस्या कमी होतील, अशी अशा राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू
यांनी व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंबंधी
सर्व राज्यांचे राज्यपाल आणि
केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे
चर्चेदरम्यान ते बोलत होते. राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी राजभवनातून
चर्चेत भाग घेतला.
समाजाच्या सामुहिक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असं
राष्ट्रपतींनी नमूद केलं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
रेड क्रॉस संघटना, स्वयंसेवी संस्था, आणि
धार्मिक संस्थांची मदत घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
****
लॉकडाऊनच्या कालावधीत
दिव्यांगांना एका महिन्याचं धान्य तसंच आरोग्यविषयक
किट घरपोच वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेणं आवश्यक असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. या किटमध्ये धान्य, तेल
इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर, मास्क, रुमाल,
साबण, डेटॉल, फिनेल अशा
आरोग्यविषयक साहित्याचाही समावेश असेल.
****
ट्रेसिंग-टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर कोरोनाशी लढा देण्यावर प्रशासनानं
भर द्यावा आणि जनतेनेही या कामात सहकार्य करावं, असं आवाहन आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून
बोलत होते. कोरोनाबाधितांवर योग्य पद्धतीनं उपचार सुरू असल्यामुळे,
रुग्णांचा उपचारांना योग्य प्रतिसाद मिळून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण
आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपचारादरम्यान कोरोनाग्रस्तांच्या सलग दोन चाचण्या नकारात्मक आल्यावर तो बरा
होतो, आणि त्यानंतर रुग्णाला सुटी मिळते, त्यामुळे कोरोना बरा होतोच, हे सर्वांनी लक्षात घ्यावं,
असं टोपे यांनी सांगितलं.
सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी
रुग्णसेवा सुरू ठेवावी, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा असावा
यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान करावं, असं आवाहन टोपे यांनी केलं.
आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्यामुळे आता बाहेरच्या बाधित देशातून
संसर्ग होण्याचा धोका नाही, मात्र देशातल्या रुग्णांपासून संसर्गाचा
धोका संभवतो, त्यामुळे सर्वांनी समाजाच्या थेट संपर्कात येणं
टाळावं, असं आवाहन त्यांनी केलं. ते पुढे म्हणाले,
जो मंत्र आहे या सर्व कोरोनाव्हायरस
पासून दूर राहण्याचा तो म्हणजे सोशल डिस्टन्सीइन मेनटेन करा सुरक्षित
अंतर ठेवा कुठल्याही परिस्थितीत आपण गर्दीमध्ये जाऊ नका आणि
एकच मंत्र मी याठिकाणी सांगेल मी घरी थांबणार
मी करोणाला हरवणार या विचाराने मीच माझा रक्षक हा ब्रिज घेऊन खऱ्या आर्थाने आपण सर्वांनी आपले वर्तन ठेवणं आवश्यक आहे अत्यावश्यक
सेवा आणि जीवनावश्यक सेवा या सर्व करत असतांना सोशल
डिस्टन्सचा नियम जरूर पळाला आणि तुम्ही सुरक्षित राहा
आणि तुम्ही समाजाला सुरक्षित ठेवा राज्य आणि देश सुरक्षित ठेवा.
कोविड १९ या आजारामुळे
निर्माण झालेल्या संकटातही जीव धोक्यात घालून काम करत असलेले शासकीय आरोग्य सेवेतले डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग तसंच
इतर आपात्कालीन सेवांमधल्या कर्मचारी वर्गाला प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा विचार
राज्य सरकार करत असल्याची माहिती टोपे यांनी ट्वीटरवरून दिली
आहे. त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात या सर्व कर्मचाऱ्यांचं
अभिनंदनही केलं आहे.
दरम्यान, राज्यात
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. काल
राज्यात २८ नवीन रूग्ण आढळले. त्यापैकी १५ रुग्ण सांगलीत आढळल्याचं पीटीआयचं वृत्त
आहे. पुणे, ठाणे आणि कोल्हापूर इथं प्रत्येकी
१, तर नागपुरात ५ नवे रुग्ण आढळले.
मुंबईत एका ८५ वर्षीय रुग्णाचा काल कोरोनामुळे मृत्यू झाला, राज्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची
संख्या आता पाच झाली आहे.
राज्यात आतापर्यंत २४ जण उपचारानंतर बरे झाले
असून, त्यांना रुग्णालयातून घरी पाठवलं आहे.
****
राज्यातल्या हातावर
पोट असणाऱ्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत उपाशी राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे
निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न आणि नागरी पुरवठा विभाग तसंच जिल्हा प्रशासनाला
दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीच्या
माध्यमातून संवाद साधला. केंद्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज तसंच राज्य शासनाच्या स्वस्त
धान्य दुकानातून त्यांना तात्काळ धान्य मिळेल, त्यांची उपासमार होणार नाही, याकडे लक्ष
देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
या बैठकीनंतर राज्याला
संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी, शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवत असल्याचंही त्यांनी
सांगितलं. वस्तुंचा पुरवठा व्यवस्थित होत राहील, ग्रामीण भागातून दूध संकलन व्यवस्थित
केलं जाईल, राज्यात अडकलेल्या परराज्यातल्या नागरिकांची प्रशासन व्यवस्थित काळजी घेईल,
असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असून, स्वयंसेवी संस्थांनी
रक्तदान शिबिरे घ्यावी, मात्र अनावश्यक गर्दी होऊ देऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
वेळीच उपचार झाले तर
कोरोना बरा होऊ शकतो, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.
****
शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत, कोरोना विषाणूमुळे
निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, येत्या ३० जूनपर्यत वाढवावी, आशी मागणी माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या
संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणात प्रश्न
निर्माण झाले आहेत. त्याकडे लक्ष वेधून याबाबत तातडीने निर्णय करावा असं
त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम
२०१३ अंतर्गत समाविष्ट नसलेल्या मराठवाडा आणि विदर्भातल्या १४ जिल्ह्यांमधल्या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना एप्रिल, मे आणि जून या महिन्यांकरता सवलतीच्या दरात
प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
यांनी काल नाशिक इथं ही घोषणा केली. या निर्णयानुसार औरंगाबादसह
विभागातल्या जालना, नांदेड, बीड,
परभणी, उस्मानाबाद, लातूर,
हिंगोली या जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांना याचा लाभ
होणार आहे.
****
गेल्यावर्षी आलेला पूर,
भूस्सखलन, चक्रीवादळ आणि दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या आठ राज्यांना काल
केंद्र सरकारनं पाच हजार ७५१ कोटी २७ लाख रूपयांची अतिरिक्त मदत जारी केली आहे. या
आठ राज्यात महाराष्ट्र, केरळ, बिहार, नागालँड, ओडिसा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक
या राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल एका
उच्च स्तरीय समितीची बैठक झाली, या बैठकीत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
प्रजापिता ब्रह्मकुमारी या आध्यात्मिक
संघटनेच्या प्रमुख राजयोगिनी जानकी दादी यांचं काल पहाटे माऊंट आबू इथं निधन झालं. त्या १०४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर
काल माऊंट आबू इथं शांतिवन परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. जगभरातल्या १४० देशात त्यांनी आपल्या संघटनेमार्फत सेवा केंद्र उभारली.
स्वच्छतेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत, केंद्र सरकारनं त्यांना स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रॅण्ड ॲम्बसेडर म्हणून नियुक्त
केलं होतं. राजयोगिनी जानकी दादी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
कोरोना विषाणूग्रस्तांच्या उपचारासाठी रस्ते वाहतूक आणि राज्य महामार्ग मंत्री नितीन गडकरी
आपलं एक महिन्याचं वेतन पंतप्रधान मदत कक्षाला देणार आहेत. जास्तीत
जास्त लोकांनी या संकटावर मात करण्यासाठी मदत करावी असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये
म्हटलं आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही पन्नास लाख रुपये
मदत दिली आहे. शिर्डी इथल्या साईबाबा संस्थानानं ५१ कोटी रुपये, तर सिद्धीविनायक
मंडळानं देखील ५ कोटी रुपये दिले आहेत.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
सध्या लॉकडाऊन असल्याचं कामगार, गरीबांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे. त्यांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, तसंच नागरिकांचे गट
पुढे आले आहेत. गरजूंना अन्नधान्यासह
मास्क आणि सॅनिटारझरचं देखील वाटप करण्यात येत
आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या नरसी शहरानजिकच्या
गरीब वस्तीत रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी काल
प्रतीकुटुंब धान्य, तेल, तसंच भाजीपाल्याचं
वाटप केलं.
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेतल्या
काँग्रेस पक्षाच्या सर्व ७३ नगरसेवकांनी एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस
देण्याचा निर्णय घेतला आहे. बिलोली नगर पालिकेच्या नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांनीही दोन महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यार
असल्याचं सांगितलं आहे. हिमायतनगर नगर पंचायतीचे
माजी नगराध्यक्ष अब्दुल खलील यांनी काल शहरातल्या गरीबांना मोफत राशन किटच वाटप केलं.
लातूर जिल्ह्यात उदगीर जवळ लोणीमोड
इथं वस्तीत राहणाऱ्या गोरगरीब लोकांना विश्व हिन्दू परिषदेनं मदत केली. या वस्तीत एकूण २६ कुटुंब आहेत. या कुटुंबांना १० दिवस
पुरेल इतकं अन्नधान्य देण्यात आलं आहे.
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर
इथंही एकता मित्र मंडळाच्या वतीनं गावात फिरणाऱ्या भिकाऱ्यांसाठी जेवण उपलब्ध करून देण्यात आलं.
उस्मानाबाद इथल्या अन्नपूर्णा
या तरुणांच्या गटानं शहरातले गरजू, गरीब,
शासकीय तसंच खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक
यांच्यासाठी जेवणाचे डबे दिले. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
उस्मानाबाद शहरातील दवाखान्यात
उपचारासाठी आलेले रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना
आणि गोरगरीब लोक त्यांच्या घराची लॉक डाऊनलोड
मुळ चूलही पेटनं
उघड आहे. अशा गोरगरिबांना या तरुणानी सोशल मीडियावर आवाहन करून डब्याची आवश्यकता आहे का. याची माहिती घेतली. आज पहिल्या दिवशी
300 जणांकडून जेवणाचे डब्बे आवश्यक असल्याचे
समजलं. त्यावरून १२ युवकांनी पोलिस आणि
जिल्हा प्रशासनाच्या मदतीने शहरात रस्त्यावर तसंच बसस्थानकावर गोरगरिबांना जेवणाचे
डबे पोच करून एक प्रकारे तरुणाईसमोर एक प्रकारे आदर्श निर्माण केला आहे.
देविदास पाठक, उस्मानाबाद.
तुळजापूर इथंही राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे युवक नेते आई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमर चोपदार यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड कर्मचाऱ्यांना मास्क वाटप केले. नगरसेवक सुनिल
रोचकारी, समाजसेवक विजय भोसले, स्वीकृत
नगरसेवक अभिजित कदम यांनीही गरजू तसंच गरीबांना अन्नदानाच्या
कामासाह तुळजापूरात स्वच्छतेचं काम हाती घेतलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरचे
नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी नगरपरिषदेच्या
वतीनं खबरदारीची उपाययोजना म्हणून आठवडी बाजार आणि बाजारपेठ बंद करण्याचं आवाहन केलं.
त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात संचारबंदी
काळात लोकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं नियंत्रण
कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, या कक्षाचा हेल्पलाइन क्रमांक
१०९१ असा आहे. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक
करणाऱ्या मालवाहू वाहनांना अडचण येऊ नये, यासाठी प्रादेशिक
परिवहन कार्यालयाच्या वतीनं २४
तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात शेतीच्या कामाला मजूर येत नसल्यामुळे शेतकरी कुटुंबातल्या
सर्वच सदस्यांना हळद काढणीचं काम करावं लागत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जीवनावश्यक
वस्तू वितरणात काळाबाजार होत असल्याचं आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा पालकमंत्री वर्षा
गायकवाड यांनी दिला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत नागरिकांना
कुठलाही अडथळा येणार नाही, यासाठी प्रशासनानं संपूर्ण सहकार्य
करण्याचे निर्देश गायकवाड यांनी दिले आहेत.
दरम्यान, कोरोना उपचार आणि प्रतिबंधासाठी हिंगोली पोलीस वाहतूक शाखेनं ८१ दिवसांचं वेतन
पंतप्रधान मदत निधीला दिलं आहे.
****
जालना जिल्ह्यात ग्रामस्थांना
जीवनावश्यक वस्तू घेताना अडचणी येऊ नये यासाठी नऊ सदस्यीय समितीचं गठन करण्यात आलं
आहे. सरपंच, ग्रामसेवक,
तलाठी, तसंच महिला बचत गटाच्या सदस्यांचा समावेश
असलेल्या या समितीनं, जीवनाश्यक वस्तूंची साठेबाजी होऊ नये,
तसंच नागरिकांची गर्दी होणार नाही, याबाबत खबरदारी
घेण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
****
हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयात
एका कोरोना संशयिताला दाखल करण्यात आलं आहे. या संशयिताच्या
लाळेचा नमुना पुणे इथं तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतून ५० जणांचे नमुने तपासणीसाठी
पुण्याला पाठवण्यात आले होते, यापैकी ४३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह
आलेले असून सात व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
परभणी जिल्हा रुग्णालयातल्या
८५ पैकी ६२ रुग्णांचे अहवाल नकारात्मक आले असून, आठ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
****
पोलिसांनी संचारबंदीच्या काळातही
नागरिकांवर बळाचा वापर करू नये असे आदेश हिंगोलीच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले
आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास विभागांतर्गत
चौकशी करून दंडित करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
बीड जिल्हा प्रशासनानं
जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. कोणत्याही पद्धतीने छुपी प्रवासी वाहतुक होऊ
नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक करणाऱ्या वाहनांचीही कसून तपासणी केली जाणार
आहे. जिल्ह्यात कृषी निविष्ठांची दुकानं सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत सुरू राहणार
आहेत.
****
परभणी जिल्ह्यातली कृषी निविष्ठा
विक्री केंद्र सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत सुरू ठेवण्यास तसेच त्याअनुषंगाने
वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कालावधीत
कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी,
असे निर्देश जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी दिले आहेत.
****
मराठवाडा पदवीधर मतदार
संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय -
घाटी रूग्णालयाला भेट दिली. उपचारासाठी आवश्यक साहित्याची प्रशासनाने सरकारकडे
मागणी केली आहे. चव्हाण यांनी सर्व संबंधितांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घाटी
प्रशासनाला अत्यावश्यक वस्तूंची त्वरीत पूर्तता करावी अशी सूचना केलेली आहे.
****
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दररोज
नियमित औषधं घ्यावी लागणाऱ्या गरीब रुग्णांना जिल्हा नियोजनच्या निधीतून
एक महिन्यांची औषधं घरपोच मोफत देण्यात यावी, अशी मागणी भारतीय
जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उस्मानाबादचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रशासनाकडे केली आहे. दररोज नियमित औषधं
घ्यावी लागणाऱ्या गरीब रूग्णांना जिल्हा नियोजन
निधीतून एक महिन्यांची औषधे घरपोच मोफत देण्यात यावी, असं ठाकूर यांनी म्हटलं
आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड
इथं नागरिक सोशल डिस्टसिंग अर्थात समूहापासून दूर राहण्याचा नियम पाळताना दिसून येत
आहे. भाजी बाजारात नागरिकांनी विशिष्ट अंतरावर उभं राहूनच भाजीपाला खरेदी केला. प्रशासनाच्या
आवाहनाला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. सेलू
नगरपालिकेनं रेल्वे स्थानक परिसरात जंतुनाशक सॅनिटायझरची फवारणी सुरु केली आहे.
****
राज्यातल्या
रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्तसाठा कमी झाला असून,
नागरिकांनी सामाजिक अंतर राखून रक्तदान करण्याचं आवाहन लातूर जिल्हा
परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केलं आहे. उदगीर तालुक्यात लोणी इथल्या तरुणांनी
केंद्रे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काल रक्तदान केलं.
****
जालना जिल्ह्यात संचारबंदीच्या
काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल वितरीत
करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत. जमावबंदीच्या कालावधीमध्ये इतर सर्व खाजगी वाहनांना पेट्रोलपंप
चालकांनी इंधनाचा पुरवठा करु नये, तसंच खाजगी दुचाकी आणि चारचाकींना
रस्त्यावर फिरण्यास सक्त मनाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरात
शंभर खाटांचं ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करण्याची मागणी आमदार सुरेश वरपुडकर यांनी
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या ग्रामीण
रुग्णालयाचं बांधकाम झालं असून, अद्याप ते सुरु झालेलं नाही, सध्याच्या परिस्थितीत हे रुग्णालय सुरु होण्याची
गरज असल्याचं वरपुडकर यांनी आरोग्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील
यांनी काल नांदेड इथं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर
यांची भेट घेऊन हदगाव, हिमायतनगर, किनवट,
माहूर तालुक्यातल्या रूग्णालयात
कर्मचारी वाढवावेत, अशी मागणी केली आहे.
****
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेनं शेतकऱ्यांना घरपोच पिकविमा रक्कम वितरीत
करण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे.
दरम्यान, पीक काढणीसाठी शेतात मजूर
नसल्यानं शेतकऱ्यांना यंत्राच्या सहाय्यानं पीक काढणी करु द्यावी,
यंत्र घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवू नये, अशी सूचना पवार यांनी औसा पोलिसांना केली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment