Monday, 30 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी असून, सुदैवानं भारतात अजून सामाजिक संसर्गाचा धोका नसल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. भारतात सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं, कोरोनाची लक्षणं दिसल्यास लपवू नयेत, असं आवाहनही या अधिकाऱ्यांनी केलं. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या एक हजार ७१ झाली आहे, यापैकी २९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, शंभर रुग्णांना उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या देशभरात ९४२ रुग्ण उपचार घेत आहेत.
****

 शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून पुढचे तीन महिने शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 दरम्यान, नांदेड इथं संचारबंदीच्या काळात शिवभोजन थाळीचा तीस ते पस्तीस जणांनी आज लाभ घेतला.
****

 लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपये निधी आणि आपलं एका महिन्याचं एक लाख रुपये वेतन पंतप्रधान हाय्यता निधीसाठी दिले आहे. 
****

       औरंगाबाद इथल्या शेंद्रा औद्योगिक परिसरातून जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं दाखल झालेल्या कामगार महिला, पुरुष आणि लहान मुलांची जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. बदनापूर इथल्या स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाच्या मदतीनं सर्व कामगारांची जेवणाची आणि राहण्याची व्यस्था केली. जालना शहरात सकाळी अकरानंतर पोलिसांनी संचारबंदी अधिक कडक केली आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी स्वतः शहरात फिरून बंदोबस्ताचा आढावा घेतला.
****

लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी काही सोयी सुविधा तातडीनं तयार करण्यात येत आहे. या सुविधांसाठी वैद्यकीय, शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तसंच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार आपत्कालीन निधीमधून दोन कोटी सतरा लाख रुपये खर्चास जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
****

 बीड जिल्ह्यातल्या महसुल, तलाठी, वाहन चालक कर्मचारी संघटना तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे सादर करण्यात आलं. संघटनेच्या वतीने दहा लाख रूपये या निधीस देण्यात आल्याचं संघटनेचे अध्यक्ष नायब तहसीलदार चंद्रकांत जोगदंड यांनी सांगितले.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यात सुधीर राठोड यांच्या सह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर ठेवून गरजू लोकांना धान्य वाटप केले. कळमनुरी जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ.सतीश पाचपुते यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं वयोवृद्ध, निराधार आणि गरजू मजुरांना धान्यासह आवश्यक साहित्याचं वाटप केलं.
****

       लातूर शहरातल्या सर्व अठरा प्रभागांमध्ये उद्यापासून जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे. दररोज पाच ते सहा प्रभागांमध्ये सकाळी सात ते बारा आणि दुपारी चार ते संध्याकाळी सात या दरम्यान फवारणी होईल. येत्या आठ तारखेपर्यंत फवारणीचे तीन टप्पे होणार असल्याचं, याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यात उद्या ३१ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहून हा जनता कर्फ्यू यशस्वी करावा आणि आपला जिल्हा कोरोना मुक्त राहील यासाठी सर्वांनी आपलं योगदान द्यावं असंही मुंढे यांनी म्हटलं आहे.
****

 परभणी शहरात महापालिकेकडून जंतुनाशक फवारणी करण्यात येत असून, आरोग्य विभागामार्फत पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दवाखाना बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून दवाखान्यांचा दररोजचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत.
****

 नांदेड जिल्ह्यात उद्यापासून चाळीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून रुग्णवाहिका, मालट्रक, छोट्या मालवाहू वाहनांची तपासणी करूनच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी ही माहिती दिली. व्यावसायिक प्रवासी वाहतुकीला मुळीच परवानगी नसून, ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने पोलिस विभाग संपूर्ण शहरावर नजर ठेवणार आहे. हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही शहरात फिरणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****

 लातूर शहरातल्या कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचं आवाहन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी सामाजिक प्रसार माध्यमातून केले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करत सर्वांना रक्तदान करण्याचं आवाहन गुरुनाथ मगे यांनी केलं आहे.

बीड तसंच परभणी इथंही रक्तदान शिबीर घेण्यात आलं.
*****
***

No comments: