Monday, 23 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमातून संचारबंदीची घोषणा केली. राज्यात जमावबंदी कलम लागू करूनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यानं, नाईलाजास्तव संचारबंदी लागू करत असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्याच्या निर्णायक स्थितीवर आपण पोहोचलो असून, या टप्प्यावर कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आपण ठाम निश्चय करणं अत्यावश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानंच सुरू राहतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अद्याप कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी आंतरजिल्हा सीमा बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

 पुढचे पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवा अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या. तात्पुरत्या सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण कराव्यात, आवश्यकता असल्यास लष्कराचं मार्गदर्शन घ्यावं,  गावपातळीवर काम करणाऱ्या आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना आवश्यक वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. खाजगी आस्थापनांमध्ये, कारखान्यात काम करणाऱ्या विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये असं आवाहनही त्यांनी केलं.

 ऑटो रिक्षा तसंच खासगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतुकीवरही मर्यादा घालण्यात आल्या असून, दुचाकी वाहनांना शंभर रुपयांचं, तर चारचाकी वाहनांना एक हजार रुपयांचं पेट्रोल एका वेळी दिलं जाणार आहे. नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****

 परभणी जिल्ह्याच्या सीमा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त कोणीही शहरात ये - जा करू शकणार नाही. परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी नागरिकांना स्वयंस्फूर्तीने कोरोना विरुद्ध लढा द्यावा असं आवाहन केलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना वगळून खाजगी वाहनांना पेट्रोल पुरवठा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत.  जिल्ह्यात दररोज सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत किराणा दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या उपस्थितीत आज व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आल्यांचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या नांदापूर गावात ग्रामपंचायतीनं नवीन व्यक्तींना प्रवेश बंदी केली आहे. घराबाहेर न जाण, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गावातून बाहेरगावी जाणाऱ्या - येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्यात येत आहे. तसेच गावात प्रवेश करतांना हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सचना देण्यात येत आहे.
****

 लातूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकशे वीस शाखांमध्ये सरकारी अनुदान, पिक विमा जमा झाला आहे. परंतू कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिकविमा अनुदान वाटप सध्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक हनमंत जाधव यांनी आज ही माहिती दिली.
****

 देशांतर्गत नागरी हवाई वाहतुक थांबवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतुक मंत्रालयानं घेतला आहे. उद्या मध्यरात्रीनंतर सर्व प्रवासी विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. मालवाहतुक करणाऱ्या विमानांची उड्डाणं मात्र नियमित सुरू राहणार आहेत.
****

 आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत चर्चेविना मंजूर झाला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चर्चेविना वित्त विधेयक मंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवला, सर्व पक्षाच्या प्रमुखांनी याला अनुमोदन दिलं. त्यानुसार हे विधेयक मंजूर करुन, सदनाचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्धारित मुदतीच्या दोन आठवडे आधीच तहकूब करण्यात आलं.

 काल देशानं पाळलेला जनता कर्फ्यू आणि वैद्यकीय तसंच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना सायंकाळी पाच वाजता नागरिकांनी केलेलं अभिवादन, याचं लोकसभेनं कौतुक केलं, राज्यसभेतला आपला कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. हुसेन दलवाई, राजकुमार धूत, संजय काकडे, माजिद मेमन, यांच्यासह अनेक सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच भारतीय रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली आहे.
*****
***

No comments: