Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ३० मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी
देशातल्या अनेक मोठ्या कंपन्या आणि व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. टीव्हीस मोटार्स
कंपनीने पंचवीस कोटी रूपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केले आहे. भारतीय क्रिकेट
नियामक मंडळ - बीसीसीआयने पंतप्रधान मदत निधीत एक्कावन्न कोटी रुपयांचे योगदान दिलं
आहे.
****
खासदार आणि माजी केंद्रीय
मंत्री अरविंद सावंत यांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आणि एक कोटी
रुपये मुंबईतल्या रुग्णालयांना व्हेंटिलेटर्ससाठी वितरित केले आहे. त्यांनी खासदार
निधीतून एक कोटी रुपये मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय तसंच गोकुळदास
तेजपाल-जीटी रुग्णालयाना व्हेंटिलेटर्स घेण्यासाठी दिले आहेत.
****
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या
लॉकडाऊनमधल्या दोन आठवड्यांचा काळ अद्याप बाकी आहे, या काळात नागरिकांनी नियमांचं गांभीर्यानं
पालन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
ते आज सामाजिक संपर्क माध्यमांवरून जनतेशी बोलत होते. पुढचे काही दिवस नागरिकांनी काटकसरीची
सवय लावून घ्यावी, अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावं, पोलिसांशी हुज्जत घालून
गैरवर्तन करू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं. लॉकडाऊनची मुदत वाढवली जाण्याबाबत
सामाजिक संपर्क माध्यमांवरून फिरत असलेल्या निराधार संदेशांबाबत बोलताना पवार यांनी,
नागरिकांनी नियमांचं योग्य पालन केलं, तर लॉकडाऊन वाढवण्याची गरजच पडणार नाही, असं
सांगितलं. ऊसतोडणी कामगारांचं काम संपल्यावरही कारखान्यांनी कारखाना परिसरातच त्यांची
पुढचे तीन ते चार आठवडे निवास, भोजन, तसंच वैद्यकीय उपचारांची सुविधा करून द्यावी अशी
सूचना पवार यांनी केली आहे. नागरिकांनी सामाजिक संपर्क माध्यमांवरून विचारलेल्या अनेक
प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिली.
****
लॉकडाऊनच्या काळात घरमालकांनी
भाडेकरू कामगारांना घरातून बाहेर काढू नये, असं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास
शिंदे यांनी केलं आहे. कोणत्याही आस्थापनांनीही कामगारांना कामावरून कमी करू नये, असं
आवाहनही डॉ शिंदे यांनी केलं आहे. इतर राज्यातून पालघर जिल्ह्यात रोजगारासाठी सुमारे
चार हजारावर कामगार आलेले आहेत. या सर्वांना जिल्हा प्रशासनानं मदत शिबिरात निवारा
उपलब्ध करुन दिला असून त्यांना अन्न, पाणी, वैद्यकीय मदत दिली जात असल्याची माहिती
जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली
****
सांगली, मिरज औद्योगिक वसाहत
क्षेत्रात काम करणाऱ्या सहाशे कामगारांच्या जेवण आणि निवासाची सांगली पोलिसांनी सोय
केली. परराज्यातून आलेले हे कामगार पायपीट करत असल्याचं आढळून आल्यावर पोलिसांनी या
सर्वांची एका क्रीडांगणावर राहण्याची व्यवस्था केली. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात
येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा
प्रदुर्भाव रोखण्यासाठी ताप आणि खोकल्याच्या रूग्णांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात
येत आहे. आतापर्यंत केलल्या सर्वेक्षणामध्ये एकही कोरोना सदृष्य लक्षणे असलेली व्यक्ती
आढळली नाही. दहा जणांना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल केलं असुन
या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून
देण्यात आली आहे.
****
संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन
केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरात सत्तेचाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी अनेकजण शहराच्या विविध भागात विनाकारण तसंच तोंडावर मास्क न बांधता फिरत असल्याचं
आढळून आलं. काही दुकानदारांनी विनाकारण आपली दुकानं उघडी ठेवली होती, तर काही रिक्षाचालक
नियमांचं उल्लंघन करून रिक्षात गर्दी करून फिरताना आढळून आले. या सर्वांविरोधात आपत्ती
व्यवस्थापन अधिनियमांतर्गत शहराच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले
आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात नवीन
कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण अद्याप आढळलेला नाही, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग अर्थात समाजापासून
योग्य अंतर राखावं, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे. शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडे येणाऱ्या नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह येत आहे, मात्र तरीही
नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हा, योग्य खबरदारी घेऊनच घराबाहेर यावं, असं त्यांनी सांगितलं.
सकाळच्या वेळी फिरण्याचा व्यायामही टाळावा, घरीच व्यायाम करण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी
दिला. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, सुमारे महिनाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक
वस्तू जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
योगासनांची एक थ्रीडी चित्रफित ट्वीटरवर प्रसारीत केली आहे. ही चित्रफित वेगवेगळ्या
भाषांमध्ये उपलब्ध आहे.
****
No comments:
Post a Comment