Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २७ मार्च २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** केंद्र सरकारचं जनतेच्या मदतीसाठी एक लाख सत्तर
हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर
** सर्व जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकानं २४ तास चालू ठेवण्यास परवानगी
** राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या १३०; नवी मुंबईतल्या कोरोनाबाधित
महिलेचा मृत्यू
** देशातल्या २७ खाजगी प्रयोगशाळांना
कोरोना तपासणी केंद्र म्हणून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची मान्यता; राज्यातल्या आठ प्रयोगशाळांचा समावेश
आणि
** सात वर्षापेक्षा कमी शिक्षा शिल्लक
असलेल्या ११ हजार कैंद्यांना पॅरोलवर सोडण्याचा राज्य सरकारचा निर्णय
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या
पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं जनतेच्या मदतीसाठी एक लाख
सत्तर हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दिल्लीत पत्रकार
परिषदेत याबाबत माहिती दिली. कोरोनाबाधितांवर उपचार करणारे
डॉक्टर, परिचारिका, आशा कर्मचारी,
सफाई कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचं
विमा कवच दिलं जाणार आहे. गरीब कुटुंबांना दरमहा पाच किलो
गहू किंवा तांदुळ आणि एक किलो दाळ मोफत दिली जाईल, ८० कोटी
नागरिकांना याचा लाभ होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान
योजनेअंतर्गत आठ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल. याशिवाय
२० कोटी ५० लाख जनधन खातेधारक महिलांच्या खात्यावर आगामी तीन महिने प्रत्येकी ५०० रूपये
सरकार जमा करणार असल्याचंही सीतारामन यांनी सांगितलं. बचत गटासाठीच्या कर्ज मर्यादेतही
वाढ करण्यात आली असून ही मर्यादा आता वीस लाख रूपये करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरच्या कामगारांसाठी
रोजंदारीत वाढ करण्यात आली असून, या कामगारांना आता दैनिक
१८२ रुपयांऐवजी २०२ रुपये मजुरी मिळेल. वृद्ध, दिव्यांग तसंच विधवा महिलांना थेट लाभ हस्तांतरणामार्फत नियमित मासिक
अर्थसहाय्याव्यतिरिक्त एक हजार रुपये मासिक मदत दिली जाणार आहे. दारिद्र्य रेषेखालच्या उज्ज्वला गॅस जोडणीधारक महिलांना पुढचे तीन महिने
गॅस सिलिंडर मोफत मिळेल, याचा आठ कोटी तीस लाख कुटुंबांना लाभ
होणार आहे.
संघटीत क्षेत्रातल्या आस्थापनांमधले
कर्मचारी तसंच नियोक्ता या दोघांचं भविष्य निर्वाह निधी योजनेतलं प्रत्येकी १२
टक्के असं एकूण २४ टक्के योगदान सरकार भरणार आहे. शंभर पेक्षा कमी कामगार तसंच ९० टक्के कामगारांचं मासिक वेतन
पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या कंपन्याना हा निर्णय लागू होणार असल्याचं,
सीतारामन यांनी सांगितलं. या सर्व योजना
पुढच्या तीन महिन्यांसाठी लागू असतील, अस त्या म्हणाल्या.
****
केंद्र सरकारच्या या पॅकेजचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. यामुळे
गरीब आणि कष्टकरी जनतेला मदत होईल, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी या पॅकेजचे लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी
पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं, सांगितलं.
दरम्यान, पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत मंत्रालयात झालेल्या
एका बैठकीत राज्यात मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी देण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना
पोलिसांनी अडवू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
कर्तव्य बजावणारे पोलिस, वैद्यकीय अधिकारी
तसंच कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पवार यांनी दिला आहे.
जीवनावश्यक वस्तू घर पोहोच देण्याबाबत, स्थानिक
स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दूध, भाजीपाला, फळं, औषधं, स्वयंपाकाचा गॅस तसंच अन्नधान्याचा नियमित
पुरवठा असूनही बाजारात होणारी गर्दी चिंताजनक असल्याचं पवार म्हणाले.
शहरात एकाकी राहणारे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, आणि
बेघरांसाठी भोजनाची सोय करण्याकरता स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. राज्यातले सर्व
लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधून सुरक्षा राखण्याची सूचनाही पवार यांनी केली.
****
सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, किराणा दुकानं, औषधांची दुकानं २४ तास चालू ठेवण्याची परवानगी देत असल्याचं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलं. मुंबईत काल कोरोना उपाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची
बैठक झाली, त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. संचारबंदीमुळे
लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे, त्यातून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसंच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी
करता यावं, म्हणून हा निर्णय घेतला आहे. मात्र संबंधित
दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधलं अंतर,
निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनानं घालून
दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात, अस आवाहनही त्यांनी
यावेळी केलं.
****
राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या १३० झाली आहे. काल
नवी मुंबईतल्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे
राज्यात या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे. १५ रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीत सुधार झाल्यानं घरी सोडण्यात आल्याचं
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
****
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं देशातल्या
२७ खाजगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी
सर्वाधिक म्हणजे आठ प्रयोगशाळा महाराष्ट्रात असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित
देशमुख यांनी सांगितलं. यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीनं होऊ शकेल आणि
रुग्णांवर तातडीनं उपचार करणं शक्य होतील, असं देशमुख
म्हणाले. ही तपासणी केंद्रं पूर्ण क्षमतेनं चालवल्यास दररोज एकूण दोन हजार संशयित
रुग्णांचे नमुने तपासणी करणं शक्य होणार असल्याचं ते म्हणाले.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हे राष्ट्रावर
आलेलं संकट असून संचारबंदीमध्ये शेतकऱ्यांनी घाबरून न जाता जीवनावश्यक
भाजीपाल्याचं उत्पादन घ्यावं. तसंच तो बाजारात विकण्यासाठी घेऊन जाण्याचं आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
यांनी केलं आहे. ते
म्हणाले..
शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करतो की आपण जो माल पिकवतो
ते अन्य धान्य जीवनावश्यक वस्तू आहे आपण माल पिकवला पाहिजे योग्य त्या पद्धतीने त्या
मार्केटमध्ये नेला पाहिजे आणि त्यासाठी आपले आणि त्या वाहनांना प्रशासनाच्यावतीने सवलत
दिलेली आहे तर घाबरून जाण्याचं कारण निश्चित नाही आपला माल आपल्या परिसरातील गावा असतील
मार्केट असतील त्या ठिकाणी धान्य निश्चित न्यावं जनतेला मी या माध्यमातून एक आवाहन
करतो हे राष्ट्रावर संकट आलेला आहे हे संकट आला असताना त्यामध्ये औषधांपेक्षा आपण ठराविक
अंतरावर हा राहणं हा त्यावर सर्वात चांगला उपाय आहे आणि म्हणून त्यासाठी विनाकारण रस्त्यावर
येऊ नये
****
राज्यात वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं, कोणीही मूळ गावी जाण्यासाठी जीव
धोक्यात घालून प्रवासाचा प्रयत्न करू नये, असं आवाहन
वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं
आहे. या स्थितीत सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहावं, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, रुग्णवाहिकेतून अवैधरित्या प्रवास करणाऱ्या दहा जणांना वाशिम
जिल्हा पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. हे सर्वजण औरंगाबादहून
यवतमाळ इथं जात होते. यवतमाळ इथंही अनेक जण कंटेनरमधून
अवैधरित्या प्रवास करत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
****
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
राज्यात काही ठिकाणी डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना संबंधित घरमालक किंवा
हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
असे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शासनानं दिला आहे. याबाबतचं एक पत्रक जारी
करण्यात आलं आहे. घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य
यंत्रणेचं महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावं, त्यांची अशी
भूमिका मानवतेच्या दृष्टीनं अत्यंत चुकीची आणि नियमबाह्यही
आहे, त्यांच्याविरोधात साथरोग नियंत्रण कायद्यानुसार
कारवाईचा इशारा या पत्रकातून देण्यात आला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यातल्या सात वर्षापेक्षा कमी शिक्षा शिल्लक
असलेल्या ११ हजार कैंद्यांना पॅरोल रजेवर सोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तुरुंगातली कैंद्यांची संख्या कमी
करुन गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू असून, १४ एप्रिलला साजरी होणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची जयंती यंदा स्वत:च्या घरीच राहून साजरी करण्याचं आवाहन केंद्रीय सामाजिक
न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. कोरोना विषाणूच्या
प्रादुर्भावाबाबत नागरिकांनी जबाबदारीनं वागावं, हे संकट
टळल्यावर उत्साहानं एकत्रितपणे बाबासाहेबांची जयंती साजरी करुया, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.
****
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान
संस्थेत काल १४० जणांची तपासणी करण्यात आली. लातूर इथं ३६ जणांना घरात विलगीकरण करुन ठेवलं आहे.
जालना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण
कक्षात दाखल असलेल्या ६० कोरोना संशयित रुग्णांपैकी ५२ जणांचे तपासणी अहवाल
नकारात्मक आले असून, त्यांना
घरी पाठवण्यात आलं. विलगीकरण कक्षात सध्या आठ संशयित रुग्ण
आहेत. परदेशातून प्रवास करून आलेल्या ९७, तसंच मुंबई, पुणे आणि अन्य राज्यातून आलेल्या २१२
जणांचं घरातच विलगीकरण केलं आहे.
परभणी इथल्या जिल्हा रुग्णालयात १३० जणांची
तपासणी केली असून, त्यापैकी
५७ जणांना निगराणीखाली ठेवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या
म्हस्की ग्रामपंचायतीनं विनाकारण घराच्या बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला पाचशे रूपये
दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गावात दवंडीद्वारे माहिती देण्यात आली.
****
जालना जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांसाठी
हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. ज्यांना अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर जायचं असेल, किंवा इतर अडचण असेल, त्यांनी त्र्याण्णव छपन्न
बहात्तर शून्य शून्य एकोणऐंशी या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं
आहे.
****
परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत
भाजीपाला, अन्नधान्य आणि
इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून
उपाययोजना केल्या जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक
प्रमाणात साठा असून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये असं आवाहन जिल्हा
प्रशासनानं केलं आहे.
****
नांदेड जिल्हा प्रशासनानं नागरिकांना
किराणामालाची घरपोच सेवा देण्याचं नियोजन केलं आहे. नागरिकांना फोनवर सामान आपल्या
घरी मिळणार आहे. ज्यांना
घरपोहोच किराणा सामान मिळणं शक्य नाही, त्यांनी सुरक्षित
अंतर ठेवून किराणामालाच्या दुकानावर खरेदी करावी, असं आवाहन
जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी केलं आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठाचं सर्व कामकाज आणि शैक्षणिक संकुल १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात
येणार असल्याचं कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी जाहीर केलं.
****
हिंगोली जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांमार्फत
घरोघरी सर्वेक्षण करून गावकऱ्यांना कोरोना प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन केलं जात आहे. महिला बालकल्याण विभागाचे उप मुख्य
कार्यकारी अधिकारी गणेश वाघ हे या कामाचा पाठपुरावा करत आहेत.
****
लातूर महानगरपालिकाच्या वतीनं शहरात
निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध भागात औषध फवारणी
करण्यात आली. नांदेड शहरातही तरोडा बुद्रुक भागात फवारणी करून निर्जुंतुकीकरण
करण्यात आलं.
****
औरंगाबाद इथं आजची शुक्रवारची विशेष नमाज मशीदीऐवजी
घरी अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादच्या मशिदीचे मौलाना अब्दुल रशीद नदवी यांनी ही माहिती दिली.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या
धारडिघोळ गावातले सात नागरिक काल रुग्णवाहिकेनं गावात परतले असून, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी
याची गंभीर दखल घेतली आहे. हे नागरिक पुण्याहून
रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गावात परतल्यानं त्यांची तपासणी करण्यात आली असून,
त्यांना १४ दिवस घराबाहेर न निघण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात रुग्णवाहिकेची चौकशी करण्यात येत असून, खासगी
रुग्णवाहिकेच्या गैरवापराबाबत प्रशासन गांभीर्यानं दखल घेतली आहे. याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी मुगळीकर म्हणाले........
परभणी जिल्ह्यातील सीमा आपण बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी बंद केलेली आहे आणि
त्याच प्रमाणात परभणी जिल्ह्यातून बाहेर जाणासाठी लोकांसाठी सुद्धा आपण मंत्रिमंडळ
आखलेलं आहे देखील आणि असं असताना देखील काही लोक अधिकृत प्रवेश करत असतील तर त्यांच्याविरुद्ध
प्रशासन अत्यंत कठोर कारवाई करेल असेल कुठल्याही माध्यमातून माध्यमातून illegal
entry होत असेल तर प्रशासनातर्फे त्यांच्यावर संबंधित लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई
केली जाईल.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ नगरपालिकेनं कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी
वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली आहे. या
पथकांच्या मार्फत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत असून, नागरिकांनी
सहकार्य करण्याचं आवाहन नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख यांनी केलं आहे.
****
लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातला माल
विकण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर शेतकरी मदत केंद्र सुरु करण्याची मागणी
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उस्मानाबादचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. शेतकऱ्यांना पालेभाज्या, फळं वाहतुकीचं प्रमाणपत्र द्यावं,
जेणेकरून शेतमालाची जिल्ह्याबाहेर वाहतूक आणि
विक्री करणं सोयीचं ठरेल, असं ठाकूर
यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, प्रहार संघटनेनंही जिल्हाधिकाऱ्यांकडे,
हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांगांना अन्न तसंच जीवनावश्यक वस्तूंचं
किट देण्याची मागणी केली आहे.
****
औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयानं
नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी शहरातंर्गत जाण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिकांनी औरंगाबाद
सिटी पोलिस डॉट गव्ह डॉट इन या संकेत स्थळावर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज
भरावयाचा आहे. त्याचबरोबर pisb.abadcity.corona@gmail.com या
मेलवर देखील हा अर्ज पाठवता येईल. त्यानंतर संबंधित अर्जदाराला
परवानगी दिली जाईल, असं पोलिस आयुक्त कार्यालयानं
ट्विटरद्वारे कळवलं आहे.
***
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत
असलेल्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये आजपासून सकाळी पाच ते सहा या वेळेत शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याचा लिलाव
होणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत
काल झालेल्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनानं हे आदेश जारी केले. तसंच कांदा, बटाटा, लसूण,
अद्रक यांचे लिलाव दुपारी तीन ते पाच याच वेळेत होणार असल्याचं
बाजार समितीनं सांगितलं आहे. भाजीपाला खरेदी करताना नागरिकांनी जास्त गर्दी करु नये म्हणून
महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या बिडवे लॉन्स इथं भाजीपाला विक्रीची सोय केली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा नगरपालिकेच्या
वतीनं काल अधिकारी, सफाई
कर्मचारी, अग्निशमन दलातल्या कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं.
त्याचबरोबर आजपासून पूर्णा शहरात जंतूनाशक फवारणी करण्याचे आदेश
नगरपरिषदेचे उपाध्यक्ष विशाल कदम यांनी दिले आहेत. जिंतूर
तालुक्यातल्या पिंपळगाव काजळे इथंही काल ग्रामस्थांना
सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं.
****
परभणी इथं दोन रुग्णालयाच्या जागा आयसोलेशन वॉर्ड
आणि विलगीकरण कक्षासाठी आरक्षित केल्या आहेत. डॉ. प्रफुल्ल पाटील रुग्णालय आणि
सरस्वती धनवंतरी दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचा परिसर, संपूर्ण
इमारत तसंच वसतिगृह वैद्यकीय उपकरणासह अधिगृहीत केल्याचं जिल्हाधिकारी दीपक
मुगळीकर यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीसह तीस गावांना
पाणी पुरवठा महावितरण कंपनीच्या कारवाईमुळे गेल्या तीन ते चार महिन्यापासून ठप्प
आहे. ही पाणीपुरवठा
योजना सुरू करावी अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी
केली आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी ही पाणीपुरवठा योजना
येत्या दोन दिवसात सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर
तालुक्यातल्या निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त टेंभुर्णी इथल्या गावकऱ्यांनी
गावातून येण्याजाण्यास बंदी घातली आहे,
गाव करोना मुक्त ठेवण्याचा निर्णय सरपंच प्रल्हाद पाटील आणि सर्व
गावकऱ्यांनी घेतला आहे. या सूचनेचं उल्लंघन करणाऱ्या
व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा फलक गाव वेशीवर लावला आहे.
****
लातूर इथं जागृती शुगर कारखान्यात ऊसाचं
गाळप सुरू आहे. कारखाना
क्षेत्रात सुमारे पाचशे हेक्टरवरच्या ऊसाचं गाळप बाकी आहे. संचारबंदी
असली तरी प्रशासनाने ऊस वाहतुकीस परवानगी दिली आहे. ऊस
संपेपर्यंत कारखाना चालू राहणार, त्यामुळे ऊस उत्पादक
शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असं आवाहन कारखान्याचे संस्थापक
अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड इथला भूमी
अभिलेख कार्यालयातला परिरक्षण भूमापक गजानन वानखेडे याला काल दहा हजार रुपयांची
लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. तक्रारदाराच्या प्लॉटची मालमत्ता पत्रक रजिस्टरला
नोंद घेऊन पीआर कार्ड देण्याकरता त्यानं ही लाच मागितली होती.
****
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा
आणि अहमदनगर जिल्ह्यात वादली वारा, वीजेच्या कडकडाटासह
अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment