Wednesday, 25 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 देशातल्या ८० कोटी नागरिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू तर तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात सध्या लागू केलेल्या लॉकडाऊनवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना या काळात कामावर हजर मानलं जाणार असून, पूर्ण वेतन मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. समाजापासून अंतर राखण्याच्या आवश्यकतेवर या बैठकी भर देण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असून या वस्तू सातत्यानं उपलब्ध असतील, असं प्रकाश जावडेकर यांनी नमूद केलं.
****

 महाराष्ट्रातले पहिले कोरोनाबाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातले दोन जण आज  कोरोनामुक्त होऊन घरी परतत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसंच राज्यातल्या विविध रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिली.
   अमेरिकेत लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेण्यात आली. महाराष्ट्रात ही वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. असा इशाराही त्यांनी दिला.

 ब्रिटनचे युवराज चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांच्या पत्नी कॅमिला यांचा चाचणी अहवाल मात्र नकारात्मक आला आहे. या अहवालानंतर शाही दाम्पत्य स्कॉटलंडमधल्या आपल्या घरी विलगीकरणात राहण्यास गेल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२२ झाली आहे. मुंबईत आज दुपारनंतर नवे पाच रुग्ण तर ठाण्यात एक रुग्ण आढळला.
****

 भारतीय रेल्वेच्या सर्व प्रवासी रेल्वे गाड्या १४ एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी ३१ मार्च पर्यंत रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय मंत्रालयानं घेतला होता. मात्र, आता यात वाढ करण्यात आली आहे. या कालावधीत मालवाहतूक सुरु राहणार आहे.
****

 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षानं व्यावसायिक अभ्याक्रमाच्या सीईटी २०२० परिक्षा कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगानं पुढे ढकलली आहे. या परीक्षेचं १३ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
****

 कोरोनावर मात करण्यासाठी उद्योगांनी आरोग्याशी निगडीत साधन-सामुग्रीचा शासनाला पुरवठा करावा, सं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. संचारबंदीमुळे अनेक उद्योग ठप्प झाले असले तरीही अत्यावश्यक सेवा म्हणून काही उद्योगांना सवलती देण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय साहित्याची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी या वस्तुंचा शासनास पुरवठा करावा, असे आवाहन देसाई यांनी केलं.
****

 नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यात अवैध आणि अप्रमाणित सॅनिटायझरचा सुमारे आठ लाख रुपयांचा साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त केला आहे. यात सॅनिटायझरच्या सुमारे पाच हजार सातशे साठ बाटल्या सापडल्या असून त्यातल्या तीन हजार तीनशे साठ बाटल्यांवर उत्पादनाविषयीची कोणतीही माहिती नसल्याचं आढळलं आहे. कंपनीचे चालक अमित चंदांनी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
****

 नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात करोना प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला, यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलेल्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
****

 औरंगाबाद शहरातल्या हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन आयटक संघटनेनं केलं आहे. धान्य , सॅनिटायझर, साबण, मास्क आदी वस्तू किंवा रोख रक्कम स्वरुपातली मदत औरंगाबाद इथं खोकडपुरा परिसरातल्या आयटक कार्यालयात जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****

 आंबेडकरी चळवळीतले सामाजिक कार्यकर्ते बुध्दप्रिय कबीर यांचं आज औरंगाबाद इथं खाजगी दवाखान्यात निधन झालं. ते ४५ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते.
****

 राज्यात आज अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण आणि सिल्लोड तालुक्यात ऊस झाला. नाशिक जिल्ह्यातही गारांसह जोरदार पाऊस झाला. सातारा शहरात हलक्या स्वरूपाचा तर बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
*****
***

No comments: