Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – ३० मार्च २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** कामगारांचं स्थलांतर रोखण्यासाठी राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्याचा
केंद्र सरकारचा राज्यांना आदेश; उल्लंघन करणाऱ्यांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याचे
निर्देश
** कोरोना विषाणू विरोधातली लढाई जिंकण्यासाठीच कठोर पावलं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
** गर्दी करू नका अन्यथा आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील मुख्यमंत्र्यांचा इशारा
** राज्यात आणखी दोन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू; एकूण रुग्णांची संख्या २०३
आणि
** आता तीन महिन्यांसाठी पाच रूपयात शिवभोजन
थाळी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
****
कामगारांचं स्थलांतर रोखण्यासाठी राज्य आणि जिल्ह्यांच्या
सीमा पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना
दिल्या आहेत. सीमा ओलांडणाऱ्यांना सरकारी विलगीकरण कक्षात किमान
चौदा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचनाही केंद्र
सरकारनं दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळाचे सचिव राजीव गौबा आणि गृह सचिव अजय भल्ला
यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्यामाध्यमातून
संवाद साधला. एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा महामार्गावर लोकांची वाहतूक पूर्णपणे
थांबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. मात्र वाहतूक बंद ठेवतानांच,
गरीब-गरजू आणि स्थलांतरित मजुरांना अन्न आणि निवारा व्यवस्थित
उपलब्ध करून द्यावा, यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीचा
उपयोग करावा, अशी सूचनाही केंद्रानं केली. आदेशाचं
पालन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांवर टाकण्यात आली आहे. केवळ
जीवनावश्यक आणि अन्य सामानाची वाहतूक करण्यास या काळात परवानगी असल्याचं यावेळी स्पष्ट
करण्यात आलं.
संचारबंदीच्या काळात मजुरांना, कामगारांना
वेळेवर वेतन द्यावं, त्यांच्याकडून घरभाड्याची वसुली करू नये, याची खबरदारी राज्य
सरकारांनी घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले.
****
भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या
देशाला, कोरोना विषाणू विरूद्धच्या लढाईसाठी, देशभर
लॉकडाऊन करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी
संवाद साधत होते. या मालिकेचा दुसऱ्या टप्प्यातला दहावा भाग काल प्रसारित झाला.
कोरोना विषाणू विरोधातला लढा, हा जीवन आणि मृत्यु
यांच्यातला असून, हा लढा आम्हाला जिंकायचा आहे. यासाठीच ही कठोर पावलं उचलण्यात
आल्याचं पंतप्रधान म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना होत असलेल्या त्रासाची
आपणाला जाणीव असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
कोरोनाशी यशस्वी मुकाबला करून बऱ्या झालेल्या रुग्णाशी, इटलीहून भारतात आल्यानंतर विलगीकरण कक्षात
राहिलेल्या नागरिकाशीही पंतप्रधानांनी संवाद साधला. त्याचबरोबर
या समस्येशी थेट दोन हात करणाऱ्या दोन डॉक्टरांकडून पंतप्रधानांनी त्यांच्या कामाबद्दल
माहिती जाणून घेतली. देशभरातले सुमारे २० लाख डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय
कर्मचारी, आशा, सफाई कामगारांसाठी ५० लाख रूपयांपर्यंत आरोग्य विमा योजनेची घोषणा सरकारनं
केली आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
या काळात अत्यावश्यक
सेवा पुरवणाऱ्यांचेही पंतप्रधानांनी आभार मानले. मात्र घरात विलगीकरण करुन राहण्यास
सांगितलेल्या, पण त्याचं पालन न करणाऱ्या कोरोना विषाणुच्या संशयितांविषयी त्यांनी नाराजी
व्यक्त केली. या समस्येकडे आणखी गांभिर्यानं पाहण्याची आणि तसंच वर्तन करण्याची गरज पंतप्रधानांनी
यावेळी व्यक्त केली.
****
कोरोना विषाणुच्या आपत्तीने निर्माण झालेल्या स्थितीमुळे
होणाऱ्या विविध दूरगामी परिणामाचा अंदाज घेऊन धोरण प्रक्रिया गतीमान करण्यासाठी केंद्र
सरकारने विविध क्षेत्रांसाठी ११ उच्चस्तरीय गटांची स्थापना केली आहे. आपत्ती व्यवस्थापन
कायद्यातर्गंत या गटाची स्थापना करण्यात आली असून हे गट कोरोना विषाणूसंदर्भात सर्वंकष
धोरण, आराखडा तसंच कालबद्ध अंमलबजावणीचा त्रिस्तरीय प्राधान्यकम तयार करतील. प्रत्येक
गटात पंतप्रधान कार्यालय तसंच केंद्रीय सचिवालयात वरिष्ठ अधिकारी असतील.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सरकारकडून करण्यात
येत असलेल्या उपाययोजनांना काँग्रेस पक्ष पूर्ण सहकार्य करणार असल्याचं पक्षाचे नेते
राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून, त्यांनी एकतेची भावना व्यक्त केली. सामाजिक सुरक्षा अधिक
सक्षम करण्याची गरज असून, गरीब कामगारांना मदत आणि आश्रयासाठी
सार्वजनिक संसाधनांचा उपयोग केला जावा, असं गांधी यांनी म्हटलं
आहे.
****
परराज्यातल्या गावाकडे निघालेल्या मजुरांना जिथे
आहात तिथेच थांबण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सामाजिक माध्यमाद्वारे
जनतेशी संवाद साधला. स्थलांतर करणाऱ्यांची जबाबदारी सरकारची असून, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था
प्रशासन करत असल्याचं ते म्हणाले. कामगारांची वाहतूक पूर्णपणे
बंद करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले.
इतर राज्यातील कामगार हे
त्यांच्या घरी जाण्यासाठी फार उत्सुक किंबहुना एकदम उतावळे झालेले आहेत त्या सर्वांना
सांगू इच्छितो कृपा करून जिथे आहात तिथेच थांबा एकतर आपले घर सोडू नका आपली पूर्ण जबाबदारी
महाराष्ट्र सरकार घेत आहे असे गोंधळून जाऊन आणखीन नका काहीतरी चूक करून मोठी दुर्घटना
घडेल अशा काही गोष्टी करू नका इतर राज्यात जिथं आपले कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा
मी आवाहन करतो मी तुम्ही सुद्धा आहात तिथेच थांबा तुम्हाला जर का तिथे कुठे मदतीची
आवश्यकता असेल तर कृपा करून मुख्यमंत्री कार्यालयाला संपर्क करा या जिल्ह्यातून त्या
जिल्ह्यात हे कामगार किंबहुना ही सगळी वाहतुक पूर्ण बंद करत आहोत
काही रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये वर्दळ होत आहे,
त्याठिकाणी कृपा करून गर्दी करू नका अन्यथा लोक ऐकणार नसतील तर सरकारला
कठोर पावलं उचलावी लागतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला
आहे. कोरोना विषाणुची चाचणी केंद्र वाढवण्यात
आली आहेत, त्याचबरोबर पुढील काही दिवसांत कोरोना विषाणू
रूग्णांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
कोरोनाची लागण झालेल्यांपैकी अनेकांना उपचार देऊन बरं करण्यात आलं आहे,
ही दिलासादायक बाब आहे, मात्र, न्युमोनियाची साथ वाढण्याची भिती असल्याचं ते म्हणाले.
खासगी डॉक्टरांनी कोणतीही लक्षण आढळली तर तात्काळ जवळच्या शासकीय रूग्णालयात
माहिती देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित एकूण रुग्णांची संख्या २०३
झाली आहे. काल २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. तसंच कालच ३५ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटीही देण्यात आली. तर, मुंबईतल्या के. ई. एम रुग्णालयात कोरोनाबाधित ४०
वर्षीय महिलेचा आणि बुलडाणा इथं ४५ वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत
या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या आठ झाली आहे.
***
कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव रोखणं आणि तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी
राज्य आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे
निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना निवारागृह, पाणी,
अन्नधान्य तसेच भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा या सुविधा स्वयंसेवी संस्थाच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यासाठी या समित्या त्यांच्या
स्तरावर नियंत्रणाचे काम करतील. राज्य शासनालं याबाबतचा शासन
निर्णय काल जारी केला. राज्यस्तरीय समितीचे मुख्य सचिव हे
अध्यक्ष आहेत. तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे समितीच
प्रमुख आहेत. महानगरपालिकास्तरावर स्वतंत्र समिती असणार आहे.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या
परिस्थितीत गरजूंना निवारागृह, पाणी, अन्नधान्य तसेच भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय
सेवा अशा सुविधा स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्यानं उपलब्ध करून देण्यासाठी या
समित्या त्यांच्या स्तरावर नियंत्रणाचं काम करतील.
***
योग्य काळजी घेतल्यास ‘कोरोना’ संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो, त्यासाठी जनतेनं
घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जनतेनं घरातच थांबून
योग्य काळजी घेतल्यास, खरेदीची गर्दी टाळल्यास, विलगीकरण केलेल्या संशयित रुग्णांनी सूचनांचं पालन केल्यास आपण निश्चितपणे
‘कोरोना’ला रोखू शकतो, असं ते म्हणाले. त्यासाठी
राज्यातल्या प्रत्येकानं यापुढचे किमान दोन आठवडे घराबाहेर न पडण्याचा संकल्प करु या, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार
करत असलेल्या उपाययोजनांसाठी पंतप्रधान सहायात निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीला
सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
यांनी एक कोटी रुपये पुणे प्रशासनाला आणि एक कोटी रुपये केंद्र सरकारच्या सहायता
निधीत दिले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या खासदार
निधीतून एक कोटी रुपये प्रधानमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा केली आहे.
त्याचबरोबरम दोन महिन्यांचे वेतन ते मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. केंद्रीय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण मंत्रालयाशी संबंधित विविध
कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा १ दिवसाचा पगार पीएम केअर्स निधीला
द्यायला मंजुरी दिली आहे. याद्वारे सुमारे ५०० कोटींचा निधी जमा होणार आहे.
नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी
पंतप्रधान सहायता निधीला एक कोटी रुपयांची मदत दिली आहे. त्याचबरोबर राज्यातल्या कोरोना विषाणूग्रस्तांच्या मदतीसाठी २५ हजार रुपये रोख प्रदेश भाजपाकडे सुपूर्द करण्यात
आल्याचंही चिखलीकर यांनी सांगितलं.
वन विभागात कार्यरत राज्यातले सर्व वनाधिकारी, वनकर्मचारी, वनमजूर
आदी सर्वच कमचारी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत.
राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी काल यवतमाळ इथं ही माहिती दिली.
कोरोनाविरुद्धचं युद्ध आपण जिंकू, असा आत्मविश्वास
व्यक्त करतानाच, वन विभागाप्रमाणेच अन्य विभागातले अधिकारी,
कर्मचारी, शिवाय जनताही सरकारला सहकार्य करेल,
असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी
संलग्नित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावं, असं आवाहन विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी केलं आहे. नांदेड इथल्या ओमकार
कंट्रक्शनचे दादाराव ढगे आणि रामदास होटकर यांनी काल पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे एक लाख ४४ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द
केला.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणी
मंदिर समितीनही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी
रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर समितीनं पंढरपूरची ४ एप्रिल रोजीची चैत्री यात्रा रद्द केली आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला
एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांनी काल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे निधीचं पत्र सुपुर्द केलं.
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण
नसला तरी संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी
मदत म्हणून जाधव यांनी हा निधी दिला.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी आमदार निधीतून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयासाठी पन्नास लाख रुपयांची मदत देण्याची
घोषणा केली आहे.
****
लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व प्रवासी रेल्वे सेवा
१४ एप्रिलपर्यंत बंद आहेत. मात्र त्याच वेळेस अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्य,
खते-बियाणे, कोळसा,
भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक
रेल्वेच्या मालगाड्यांतून केली जात आहे. यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवरचं
आणि नियंत्रण कार्यालयांतलं कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत
आहे.
सेवेवर कार्यरत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून नांदेडच्या रेल्वे खात्याच्या डॉक्टरांनी विभागीय रेल्वे दवाखान्यात
सॅनिटाझजर, तसंच मास्क कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत.
नांदेड विभागीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचं थर्मल स्कँनिंगही केलं
जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लॉकडाउन कालावधीसाठी औद्योगिक ग्राहकांच्या वीज
बिलांबाबत मागणी शुल्क आणि इतर संबंधित मागण्यांबाबत सूट द्यावी अशी मागणी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,
इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली आहे.
ते काल नाशिक इथं बोलत होते. या संदर्भात मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितिन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष
असीमकुमार गुप्ता यांना मंडलेचा यांनी पत्र पाठवलं आहे. लॉकडाउन
कालावधीत उद्योग पूर्णपणे बंद असल्यानं डिमांड शुल्क पूर्णपणे माफ करावं, लॉकडाउन दिवस वगळता लोड फॅक्टर प्रोत्साहनांची गणना करावी, ऊर्जा युनिट्सच्या वास्तविक वापरावर आधारित ऊर्जा शुल्क आकारावं, त्याचप्रमाणे मार्च, एप्रिल आणि मे या महिन्याच्या बिलाच्या
देयकाची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात यावी आदी मागण्या मंडलेचा यांनी केल्या आहेत.
****
कोरोना विषाणुमुळे राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्ते विकास
महामंडळाच्या टोल नाक्यांवरून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आकारण्यात येणारी टोल
वसुली मध्यरात्री १२ वाजेपासून बंद करण्यात आली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातल्या ऊसतोड मजुरांच्या निवासासह भोजनाची आणि आरोग्यविषयक सुविधा- सुरक्षितता
पुरवण्याची जबाबदारी घेण्याचे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहेत.
साखर ही जीवनावश्यक वस्तुंच्या यादीत येत
असल्यानं साखर कारखाने सुरू असून या कारखान्यांसाठी आवश्यक कच्चा माल पुरवण्यासाठी वाहनांच्या आंतरराज्यीय -
राज्यांतर्गत विनाअडथळा वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. यासह त्यांना लागणारे
ऊस तोडणी मजूर आणि त्यांच्या वाहनांची ने-आण करण्यासही देखील परवानगी देण्यात आली आहे.
ऊसतोड मजुरांची कोरोना विषाणू प्रतिबंधक आवश्यक ती व्यवस्था
करणं कारखान्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बेघर
मजूर आणि स्थलांतरित नागरिकांना विशेष बाब म्हणून तीन महिन्यासाठी पाच रूपयात शिवभोजन
थाळी काल पासून उपलब्ध झाली आहे. अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी काल नाशिकमध्ये ही माहिती दिली.
या योजनेचा शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही तालुकास्तरावर विस्तार करण्यात
येणार असल्याचं ते म्हणाले. शिवभोजन थाळीची मर्यादा वाढवण्यात
आली असून दररोज सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ही थाळी उपलब्ध राहणार असल्याचं
भुजबळ यांनी सांगितलं. ते म्हणाले…
पाच रुपयांमध्ये शिवभोजन
थाळी सगळीकडे हे सुरु करत आहोत तीन महिन्यासाठी साबणाने हात धुवा वारंवर जी जेवण करण्याची
जागा आणि जिथे जीवन वाटत होतं निर्जंतुक करणं, मास्क लावणे,गर्दी होऊ न देणं, शक्य असल्यास फुड पॅकेज तयार करून ते
लोकांना देणे वेगवेगळे उपाय त्यांना त्यांना सांगितले आहेत जेणेकरून कोराना चा प्रसार
व्हायला मदत होणार नाही आणि यामुळे अशा अनेक गरीब गरजू लोक त्यांच्या नोकऱ्या गेलेले
आहेत त्यांना केवळ पाच रुपयात जेवण मिळणार आहे
****
येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत गरीबांची उपासमार
होऊ नये, यासाठी स्वस्त धान्य
दुकानांच्या माध्यमातून मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातही स्वस्त धान्य दुकांनामध्ये गहू, तांदूळ
आणि डाळ उपलब्ध असेल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अमित
देशमुख यांनी दिली. पालकमंत्री देशमुख यांनी लातूर जिल्हा स्वस्त
धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष हंसराज जाधव यांच्याशी याबाबत चर्चा केली.
गरज भासल्यास स्वस्त धान्य दुकानांतून भाजीपाला, फळे, दूध, तेल, गॅस आणि अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येतील, असं जाधव यांनी यावेळी सांगितलं.
****
लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणारे मजुर, गरीब, तसंच घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासनातर्फे
आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारे मदत करण्यात येत आहे.
लातूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष रमेश कराड
यांनी दररोज एक हजार गोरगरीब, बेघर, गरजू लोकांना जेवणाची पाकिटं वाटप करण्यास सुरुवात
केली आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर पंचायत समितीनं कोरोना
विषाणू प्रतिबंधक मोहिमेत काम करणारे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी,
आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य
कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी आणि ग्राम पंचायत
कर्मचाऱ्यांना ६०० मास्क वाटप केले. पंचायत
समितीनं निधी संकलित करुन ५० मीटर कापड खरेदी करुन बचत गटांकडून हे मास्क तयार करुन
घेतले.
नांदेड इथं सचखंड गुरूद्वारा आणि लंगर साहेब
गुरुद्वाराच्या वतीनं काल गोर गरीब, भाजी विक्रेते, तसंच रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरूग्णांना अन्नदान केलं.
मुखेड तालुक्यातल्या धामनगाव इथं उपसरपंच पद्मसिंह पाटील यांनीही
गावातल्या प्रत्येक कुटुंबाला जिवनावश्यक सामानाचं वाटप केलं
****
अहमदनगर इथं पोलिस दलानं तृतीय पंथीयांना गहू, तांदूळ, तेल,
डाळ आणि इतर किराणा, जीवनावश्यक वस्तूंचं वाटप
केलं. महाराष्ट्र तृतीयपंथी संघटना प्रदेश अध्यक्ष काजल गुरु
यांनी पोलिसांचे आभार मानले.
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर काँग्रेस
समिती आणि संजय पाटील बोंढारे
मित्र मंडळातर्फे हातावर पोट असणाऱ्या गरजु मजुरांना अन्नधान्य वाटप करण्यात आलं.
****
कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव झालेल्या सांगली
जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथून जवळपास ६० ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यात आले आहेत. बाधित क्षेत्रातून हे सर्व ऊसतोड कामगार
आल्यानं या सर्वांना विलगीकरण कक्षात तात्काळ भरती करण्यात आलं. माजलगाव इथल्या दोन विलगीकरण कक्षांत ३१, तर धारूर इथल्या
एका विलगीकरण कक्षात २९ जणांना ठेवण्यात आलं आहे. यातल्या एकाही
कामगारास कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणं आढळून आली नाहीत.
****
पोलीस विभागानं नांदेड शहरात संपूर्ण नाकेबंदी
केली आहे. आजपर्यंत शहरात
६० ठिकाणी बंदोबस्ताचे नाके लावण्यात आहेत. रस्त्यांवर विनाकारण
येणारी दुचाकी वाहनं जप्त करण्याची मोहीमही नांदेड पोलिसांनी
सुरू केली आहे.
****
संचारबंदी काळातही जीवनावश्यक बाब म्हणून जालना
कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधल्या भाजी बाजार परिसरात सकाळी होणारी नियमित खरेदी-विक्री सुरु आहे. मात्र, याठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
विक्रेते आणि शेतकरी आवश्यक खबरदारी घेत नसल्याचं निदर्शनास आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परभणी
जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यामधल्या
पोखर्णी तांडा इथं काल जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
****
अहमदनगर शहरातल्या संशयित कोरोना विषाणूग्रस्त रुग्णाचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्याला काल घरी सोडण्यात आलं.
हा रुग्ण दुबईहून आला होता.
****
महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनानं
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तीन उद्योजकांना सॅनिटायझर निर्मितीचा परवाना दिला आहे. त्यामध्ये कळंब तालुक्यातल्या रांजणीच्या
नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, गौरगाव इथली इडलर्स बायो एनर्जी
लिमिटेड आणि लोहारा तालुक्यातल्या लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.
****
मुंबई, ठाणे, शहापूर आणि अन्य परिसरातून नाशिकसह
उत्तर महाराष्ट्राकडे निघालेल्या सुमारे सहा हजार नागरिकांना जिल्ह्याच्या सीमाबंदीमुळे
इगतपुरी इथं थांबावं लागलं आहे. स्थलांतरितांना या ठिकाणी थांबवण्यास
स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सीमाबंदी असतानाही हैदराबादपासून हिंगोलीच्या
कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या राजस्थानमधल्या
मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने ते
अडकून पडले होते. त्यांना हिंगोलीत आणल्यानंतर लिंबाळा परिसरातील
शासकीय तंत्रनिकेतन इथं राहण्याची, तसंच जेवणाची व्यवस्था करण्यात
आली आहे. काल हे सर्व स्थलांतरित नागरिक अचानक रस्त्यावर आल्यानं
काही काळ गोंधळ उडाला होता, आम्हाला राजस्थानकडे जाऊ द्यावं अशी त्यांची मागणी
होती.
****
लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत काल
२८२ जणांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातल्या ५९ व्यक्तींचे
नमुने पुण्याच्या प्रयोशाळेत पाठवले होते, त्या सगळ्यांचे अहवाल
नकारात्मक आले आहेत. जिल्ह्यात ४३ जणांना घरात विलगीकरण करुन
ठेवलं आहे.
****
कोरोना विषाणूच्या परिस्थितीमुळे एकही व्यक्ती, मजूर, हमाल, रोजंदारी कर्मचारी उपाशी राहणार नाही याची काळजी
घ्यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. चव्हाण यांनी काल नांदेड इथं कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा
आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातला नियंत्रण कक्ष सतर्क
ठेवून संपर्क करणाऱ्यांची तात्काळ दखल
घेण्यात यावी, त्यांना वेळेत मदत करावी,
जिल्ह्यात कुठेही रक्तदान करता येईल, अशी सोय करावी,
आदी सूचना चव्हाण यांनी दिल्या.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर केंद्र
सरकारनं दोन रूपये किलो गहू आणि तीन रूपये किलो तांदूळ देण्याची भुमिका घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात हे वाटप योग्य त्या
यंत्रणेद्वारे व्हावं अशा सूचना नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल
जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांना केल्या आहेत. ते म्हणाले…
दोन रुपये किलो गहू आणि
तीन रुपये किलो तांदूळ देण्याची भूमिका घेतलेल्या त्यात वाट योग्य ते यंत्रणेमार्फत
झालं पाहिजे माझ्या कानावर काही गोष्टी आल्या की देगलूर नाका भागांमध्ये काही पुढारी
म्हणजे आम्हीचं हे धान्य आणून दिले अशा पद्धतीने वागतायं अशा परिस्थितीत कोणीही पुढारीपण
करायची गरज नाही महसूल यंत्रणा स्वस्त धान्य दुकाने ते याच्या मार्फतचं वाटप करा व
त्या पद्धतीचा मी त्याला सूचना केलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी सर्व स्तरांतल्या
लोकांना धान्य पोहोचले पाहिजे आणि त्याची खबरदारी देखील मान्य जिल्हाधिकारी घेत आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, मुदखेड, धर्माबाद
या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुल शेती केली जाते.
विविध प्रकारच्या फुलांच उत्पादन या भागात घेतलं
जातं. मात्र मागील दहा बारा दिवसांपासून कोरोना
विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे फुल उत्पादक शेतकरी, फुलांचे
व्यापारी, किरकोळ फुल विक्रेते आर्थिक अडचणीत सापडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं २५ कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले
आहेत. शासनानं याची गंभीर दखल घेतली असून, मिरज इथल्या शासकीय रुग्णालयाचं कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आलं आहे.
सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी काल या रुग्णालयाला भेट दिली.
या रुग्णालयातले सर्व निवासी डॉक्टर्स, परिचारिका,
वाहन चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं
काम सुरू करण्यात आलं आहे.
****
जालना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात
काल दोन नवीन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले असून या ठिकाणी सध्या चार रुग्ण उपचार
घेत आहेत. यापूर्वी दाखल
७१ संशयितांचा कोरोना तपासणी अहवाल नकारात्मक आला असून, त्यांना
सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात चार हजार ७८८ जणांना गृह विलगीकरणात
ठेवण्यात आलं असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार केले
जात आहेत.
परभणी इथल्या जिल्हा रुग्णालयातल्या ७६ रुग्णांचे
अहवाल नकारात्मक आले आहेत. जिल्ह्यात ११७ जणांना घरातच विलगीकरण करुन ठेवलं आहे.
****
हिंगोली इथं काल खासगी दूरचित्रवाणीचा वार्ताहर
आणि वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक यांच्यात संचारबंदीवरुन झालेल्या वादानंतरच्या हाणामारीत
दोघेही जखमी झाल्यानं त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल दुपारी शहरातील गांधी चौकात वार्तांकनासाठी
वार्ताहर कन्हैय्या खंडेलवाल उभे असतांना पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्याशी
त्यांचा वाद झाला, आणि त्याचं पर्यवसान
हाणामारीत झालं.
आपण पत्रकार असल्याची चौकशी होण्याआधीच मारहाण
झाल्याचं पत्रकाराचं म्हणनं असून पत्रकारानं सोबत काही जणं आणून आपल्याशी
विणाकारण हुज्जत घातल्याचं पोलिसाचं म्हणनं आहे.
****
जालना जिल्ह्यात भोकरदन, अंबड आणि घनसावंगी भागात काल वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. कोलते पिंपळगाव परिसरात काही वेळ गाराही पडल्या. त्यामुळे गहू, हरभरा, मका आदी पिकांचं नुकसान झालं. आज पहाटे
पाच ते साडेपाच वाजेदरम्यान जिल्ह्यातल्या बहुतांश भागात
मेघ गर्जनेसह पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात सतत चौथ्या दिवशी
मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्याच्या काही भागातही काल पाऊस
झाला.
अमरावती जिल्ह्यातही काल गारपिटीसह जोरदार पाऊस झाला.
अकोला इथंही काही वेळ मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद
जिल्ह्यातही काल पाऊस झाला.
****
राज्यात येत्या ४८ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात
तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात विदर्भ, मराठवाडा
आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट, मेघगर्जना
आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment