Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २३ मार्च २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** राज्यात ३१ मार्चपर्यंत जमाव बंदी लागू; देशभरातली रेल्वे सेवा तसंच खाजगी आणि राज्य परीवहन महामंडळाच्या
बस सेवादेखील ३१ मार्चपर्यंत बंद
** अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तुंची खरेदी -विक्री, औषधी, आणि बॅँका मात्र सुरु राहणार.
** औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर आणि अहमदनगरसह राज्यातल्या दहा तर देशभरातल्या ७५
जिल्ह्यांमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास केंद्र सरकारची बंदी
** कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या जनता संचारबंदीला देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद;
टाळी, थाळी आणि घंटानादानं जनतेनं व्यक्त
केली कृतज्ञतेची भावना
**
आणि
** मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त नागरिकाचा
मृत्यू; राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ७४ वर.
****
राज्यात मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत जमाव बंदी लागू करण्याची
घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली. कोरोना विषाणूसंदर्भात
राज्यातल्या जनतेला त्यांनी काल संबोधित केलं,
त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यामुळे राज्यभरात
आता सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीनी
एकत्र येणं, थांबणं, चर्चा करणं,
तसंच कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता
येणार नाही.
महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरी भागामध्ये १४४ कलम
हे नाईलाजाने लावत आहे याचाच अर्थ असा की कृपा करून पाचपेक्षा अधिक जण एकत्र येऊन आता
गर्दी करू नका टोळक्याने किंवा ग्रुप कुठे फिरू नका सहज फिरायला जाऊ नका आवश्यकता नसेल
तर आपल्या घराबाहेर पडू नका हे संकट लवकरात लवकर पाहिजे पण ३१ मार्च हा पहिला टप्पा
आहे त्याच्या पुढे जर गरज लागली तर आपल्याला तो काळ आणखी वाढवावा लागेल.
नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय, संयमानं शासनाच्या बरोबरीनं या विषाणुचा मुकाबला करावा, असं मुख्यमंत्री म्हणाले. रेल्वे, खाजगी आणि राज्य परीवहन महामंडळाच्या
बसेस बंद करण्यात आल्या असून, फक्त अत्यावश्यक सेवा
देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहणार असल्याचं त्यांनी
सांगितलं. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य,
भाजीपाला, औषधी, वीज पुरवठा
करणारी केंद्रे, वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्था या
काळात सुरु राहतील असं ते म्हणाले. शासकीय कार्यालयात आता केवळ पाच टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील, असं त्यांनी
सांगितलं. गेल्या दोन दिवसात राज्यात कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढली असून, नागरिकांनी गर्दी न
करणं, आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर न पडणं यासारख्या गोष्टी करणं अत्यावश्यक
असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दुसरीकडे केंद्र सरकारनंही देशातल्या ७५ जिल्ह्यांमध्ये
लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी -लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यात राज्यातल्या औरंगाबाद,
अहमदनगर, मुंबई, मुंबई उपनगर, नागपूर, पुणे, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि यवतमाळ जिल्ह्यांचा
समावेश आहे.
****
देशभरातली रेल्वे सेवाही येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल ही घोषणा केली. जीवनावश्यक
वस्तूंसाठी मालगाड्यांची सेवा मात्र सुरू रहाणार आहे. मुंबईतली
उपनगरीय लोकल सेवाही ३१ मार्चपर्यंत बंद रहाणार आहे.
दरम्यान, ज्या प्रवाशांनी २१ मार्च
ते १५ एप्रिल-२०२० दरम्यान धावणाऱ्या रेल्वे मध्ये आरक्षित तिकीट केलं असेल, त्यांना त्यांच्या
तिकिटाचा परतावा मिळणार आहे. यासाठी तिकीट रद्द करण्याच्या नियमात तात्पुरता बदल केला
आहे. मात्र ई तिकीट रद्द करण्यासाठी आहे तेच नियम कायम राहतील. असं दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात काल अभूतपूर्व अशी जनता संचारबंदी पाळण्यात
आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आवाहनाला देशभरात उस्फुर्त प्रतिसाद
मिळाला. कोठेही कोणताही अनुचित प्रकार न होता
ही संचारबंदी लोकांनी पाळली. राज्यातही काल दिवसभर रस्त्यांवर
शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनं वगळता अन्य सर्व वाहतूक पूर्णपणे बंद होती.
औरंगाबाद शहरातल्या सर्व प्रमुख बाजारपेठा कडकडीत
बंद होत्या. शहरासह ग्रामीण
भागातही या संचारबंदीचं जनतेनं पालन केलं. सिल्लोड, कन्नड, गंगापूर या तालुक्यांच्या ठिकाणी बंद पाळण्यात
आला. जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली,
नांदेड, परभणी या जिल्ह्यातही नागरिकांनी जनता संचारबंदीचं शंभर टक्के पालन केलं.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी दोन हात करत असलेल्यांच्या
प्रति आभार व्यक्त करण्यासाठी काल संध्याकाळी पाच वाजता देशभर नागरिकांनी टाळ्या आणि
थाळ्या वाजवल्याचं पाहायला मिळालं. ज्येष्ठ, अपंग नागरिक, तरुण,
लहान मुले, चिमुकले आदींनी घराबाहेर येऊन इमारतीच्या
सज्जेत, खिडकीत येऊन टाळ्या, थाळी,
घंटानादाने अभिवादन केलं. यात अनेक राजकीय नेते,
अभिनेते आणि लोकप्रतिनिधींनीही उत्साहानं भाग घेतला. या अभिवादनाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना
इंडीयम मेडीकल असोसिएशनच्या लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव यांनी, देशाच्या इतिहासात प्रथमच डॉक्टर, परिचारीका, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा असा सन्मान झाल्याची भावना व्यक्त केली. जनतेनं आमचं
मनोबल वाढवल्याचं ते म्हणाले.
****
दरम्यान, जनता संचारबंदी यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या
दिशेनं ही एक सुरुवात असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. जनता संचारबंदी जरी
संपली असली, तरी याचा आपण उत्सव करु नये, असं ते म्हणाले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी घालून दिलेले नियम पाळण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मुंबईत काल आणखी एका ६३ वर्षीय कोरोनाग्रस्त
नागरिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे
राज्यात या विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. मरण पावलेल्या या व्यक्तीला आणखी इतरही आजार होते,
असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता ७४ झाली आहे.
काल मुंबईत सहा तर पुणे इथं चार नवीन रूग्ण सापडले असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. नागरिकांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘मीच माझा
रक्षक’ या संदेशाचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टपाल कार्यालयात
बायोमेट्रीक प्रणालीचा वापर करून तयार केले जाणारे आधार आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे व्यवहार तात्पुरते
थांबवण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात
आजपासून केली जाणार आहे. शिवाय, वयाची ६०
वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो टपाल कार्यालयात व्यवहारासाठी ३१ मार्चपर्यंत
येऊ नये, असंही जाहीर करण्यात आल्याचं डाकघर अधिक्षक बी.
रविकुमार यांनी सांगितलं.
****
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात
संशयित रुग्णांची कठोर तपासणी करण्यात यावी, असे आदेश लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत ११ मार्चपासून परदेशातून
येणारे प्रवासी, मुंबई आणि पुणे त्याचप्रमाणे अन्य ठिकाणाहून
येणारे नागरिक आणि कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांची काटेकोरपणे तपासणी केली जात
आहे.
****
जालना इथं रशिया, युक्रेन आणि दुबईतून परतलेल्या तीन जणांची
माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला मिळाली आहे. खबरदारी म्हणून या
नागरिकांची तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात राहण्यास सांगण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खादगावकर
यांनी दिली.
दरम्यान, जालना बाजार समितीमधली मोसंबी आणि रेशीमकोष बाजारपेठ येत्या ३१
मार्चपर्यंत बंद राहणार आहे. शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी
आणू नये, गैरसोय टाळावी, असं आवाहन सभापती
अर्जुन खोतकर यांनी केलं आहे.
****
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीनं
बीड जिल्ह्यातल्या ३२ जणांना घरातच विलगीकरण केलं आहे. यात परदेशातून आलेल्या १७ जणांचा आणि,
परवा दुबईहून परतलेल्या महिलेसह तिच्या सहवासात आलेल्या १५ जणांचा समावेश
आहे.
****
जागतिक जल दिन काल पाळण्यात आला. या दिनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या नागदरवाडी या गावात जिल्हा
परिषदेच्या निधीतून "जलसंवर्धन प्रशिक्षण केंद्र" उभारण्यात आलं आहे. नांदेड विभागातलं हे पहिलंच प्रशिक्षण
केंद्र आहे. हे केंद्र या भागाला दुष्काळमुक्त करून, जलस्वराज्य निर्माण करेल, असा विश्वास जलमित्र बाबूराव
केंद्रे यांनी व्यक्त केला.
****
नांदेड जिल्ह्यात मुदखेड नगर परिषदेनं काल जनता संचारबंदी काळात डास,
चिलटं यांचं नियंत्रण करण्यासाठी फवारणी केली. नांदेड शहरातही महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी
कचरा साफ केला.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी
सध्या घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. विदेशात जाऊन आलेल्या लोकांबद्दलची आणि कोरोनाविषाणूशी संबधित काही लक्षणं
आढळतात का, याची चौकशी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
No comments:
Post a Comment