Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २२ मार्च २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ तासांच्या जनता संचारबंदीला प्रारंभ;
जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
** महाराष्ट्रात कोरोना विषाणू रुग्णांची
संख्या ६३; औरंगाबादची प्राध्यापक महिला
पूर्णपणे बरी
** राज्यभरात बहुतांश ठिकाणी बाजारपेठा कालपासूनच बंद
** दहावीचा उद्याचा भूगोल विषयाचा
पेपर स्थगित; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या
नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीही पुढे
ढकलल्या
आणि
** जेष्ठ कवी
किशोर पाठक यांचं निधन
****
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाळण्यात
येणारी १४ तासांची जनता संचारबंदी आज सकाळी सात वाजेपासून सुरु झाली. या संचारबंदीला जनतकेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
असून सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने
वगळता अन्य सर्व वाहतूक बंद असल्याचं चित्र दिसून येत आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन करत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सामाजिक
विलगीकरणाच्या माध्यामातून योगदान देण्याचं आवाहन केलं आहे. रात्री
नऊ वाजेपर्यंतच्या या चौदा तासांत घरात थांबण्याबरोबरच, जे लोक
कोरोना संक्रमणाशी दोन हात करत आहेत, त्यांच्या प्रति आभार व्यक्त
करण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजता टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
केलं आहे.
****
महाराष्ट्रात कोरोना विषाणू रुग्णांची संख्या
६३ झाली आहे. आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. अजूनही आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असून, बहुतांश
रुग्ण हे राज्याबाहेरून आले असल्याचं त्यांनी नमूद केलं. या धोक्याचा
सामना करण्यासाठी सर्व वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याचंही
टोपे यांनी सांगितलं. ३१ मार्च पर्यंत जीवनावश्यक वगळून सर्व
कार्यालयं आणि दुकानं बंद राहतील, याचाही त्यांनी पुनरुच्चार
केला. जनतेनं स्वयंशासित राहून कोरोना संसर्ग टाळण्याची गरज आरोग्यमंत्री
टोपे यांनी व्यक्त केली आहे.
****
जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य
रेल्वेनं नांदेड विभागातून सुटणाऱ्या ४३ गाड्या मध्यरात्रीपासून आज रात्री दहा वाजेपर्यंत
रद्द केल्या आहेत. यात १३
एक्सप्रेस आणि ३० प्रवासी गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये नांदेड
बंगळुरू एक्सप्रेस, नगरसोल नरसापूर एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, औरंगाबाद हैदराबाद प्रवासी गाडी,
आणि नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेससह अन्य गाड्यांचा समावेश असल्याचं
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून
राज्यभरात बहुतांश ठिकाणी बाजारपेठा कालपासून बंद आहेत. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं
पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत काल जिल्ह्यातील बहुतांश आस्थापना बंद होत्या.
शहरातली प्रमुख बाजारपेठ असलेला गुलमंडी भाग तसंच जिल्ह्यातल्या सर्व
व्यापारी पेठा बंद होत्या. मात्र, भाजीपाला
आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं.
परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवस
बंद ठेवण्याच्या आदेशाला चांगला प्रतिसाद मिळाला.
लातूर शहरातली मुख्य बाजारपेठ असलेली गंजगोलाई
काल बंद होती.
हिंगोली शहरासह, जिल्ह्यात औंढा नागनाथ, वसमत, जवळा बाजार, सेनगाव,
कळमनुरी, आखाडा बाळापूर, वारंगा, कनेरगाव नाका, कुरुंदा
या सर्व ठिकाणच्या बाजारपेठा बंद काल बंद होत्या. जिल्ह्यात आपत्कालीन
व्यवस्थापन कायदा लागू केलेला असताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन मिनी ट्रॅव्हल्स
विरुद्ध आखाडा बाळापुर पोलिसांनी काल गुन्हा दाखल केला.
नांदेडमध्येही काल कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी जनता संचारबंदीला कालपासूनच
चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धर्माबाद शहरात काल प्रशासनाच्या वतीनं कोरोना जनजागृती रॅली काढण्यात आली.
जालना तालुक्यातून नेपाळ यात्रेसाठी गेलेले ४०
जण काल यात्रा अर्धवट सोडून परत आले. या प्रवाशांची जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून तपासणी करण्यात आली. सर्व प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईन - घरी विलगीकरणात
राहण्याचे शिक्के मारण्यात आले असून, पुढील १४ दिवस त्यांना आरोग्य
यंत्रणेच्या निगराणीखाली घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय
विज्ञान संस्थेत काल २५५ व्यक्तींनी स्वत:हून कोरोनाची तपासणी करून घेतली. यामध्ये
पुणे आणि मुंबई प्रवास करून आलेल्यांची संख्या जास्त होती. त्यापैकी
दोघांचे घशातल्या स्रावाचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे.
लातूर इथं २८ जणांना घरातच विलगीकरण करुन ठेवलं आहे.
दरम्यान. विवाह सोहळा आयोजित केल्याप्रकरणी एका वधू वरांसह
त्यांचे आई-वडील आणि मंडप टाकणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव
लक्षात घेता दहावीची उद्या होणारी भूगोल विषयाची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ही माहिती
दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांची
कार्यशिक्षण विषयाची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षा आता ३१ मार्चनंतर होतील.
परीक्षांबाबतचं सुधारित नियोजन मंडळामार्फत स्वतंत्रपणे कळवण्यात
येईल, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं कळवलं आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगानं २३ मार्च रोजी होणाऱ्या
२०१९ मधल्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती चार एप्रिलपर्यंत
पुढे ढकलल्या आहेत. कोरोना
विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मुलाखतीच्या नव्या तारखा संबंधित उमेदवारांना कळवण्यात आल्या असल्याचंही
आयोगानं म्हटलं आहे. गेल्या १७ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या
या मुलाखती आता अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी केंद्रीय पातळीवरून
आवश्यक उपायोजनांसाठी तातडीनं पाठपुरावा केला जाईल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी
म्हटलं आहे. जावडेकर यांनी काल पुण्याचे विभागीय आयुक्त,
जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, तसंच पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांशी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद
साधत, आवश्यक सूचना दिल्या. ते म्हणाले...
माझं लोकांना आवाहन आहे की ही परिस्थिती आता आलेले
आहेत जगावर आलेलं संकट आहे एक गंभीर आहे १४ तासाचा
कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी करतील याची मला
खात्री आहे कारण हाच स्वयंशिस्तीचा भाग आहेत आणि जनता जावेला सहभागी होते त्याच वेळेला
कुठले रोगावर मात करता येते आपण सगळे मिळून लढू सगळे मिळून जिंकू
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गानं
बाधीत झालेल्या महिला रूग्णाचा नवीन अहवाल नकारात्मक आला आहे. आता औरंगाबाद मध्ये कोरोनाचा एकही रूग्ण
नाही, तरीदेखील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा शल्य
चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी केलं आहे. ते म्हणाले,
औरंगाबादची पहिली पॉझिटिव रुग्ण होती पॉझिटिव पेशंटचे
दोन्ही नमुने निगेटिव आलेत ती पॉझिटिव पेशंट ज्या संस्थेमध्ये कार्यरत होती त्या संस्थेतील
मुलांचे त्यांच्या सोबतच्या स्टाफ चे अशा आपल्या एकंदरीत एकवीस नमुने घेतले होते ते
२१ ते २१ नमुने पर निगेटिव आलेत पेशंटचे रिपोर्ट निगेटिव्ह येत असले त्यामुळेही एकदमच
निर्धास्त होऊन गर्दीत जाणे वगैरे अशा गोष्टी करायला नको
****
प्रसिद्ध कवी किशोर पाठक यांचं अल्पशा आजारानं
काल नाशिक इथं निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी एका अपघातात
जखमी झाल्यामुळे ते आजारी होते. कवी कुसुमाग्रज यांचे ते मानस
पुत्र होते. पाठक यांचे सुमारे २८ कवितासंग्रह प्रकाशित झालेले
आहेत. त्यांना राज्य शासनासह विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त
झाले होते. ‘पालव’ हा त्यांचा कवितासंग्रह
खूप लोकप्रिय ठरला. पाठक यांनी बालकविताही विशेष प्रसिद्ध आहेत.
काल त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा फटका फळबाग असलेल्या
शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या
द्राक्षांची काढणी हंगाम सुरू आहे. मात्र, बाहेर राज्यातून येणारी वाहतूक ठप्प आहे, शिवाय दुकाने,
मॉल्स आणि बाजार बंद असल्यानं द्राक्ष, मोसंबी,
डाळिंब आदी फळांची मागणी घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं
आर्थिक नुकसान होत आहे. जालना तालुक्यातल्या गोंदेगाव इथले शेतकरी
सुभाष चवरे यांना बोली करूनही ऐनवेळी खरेदीसाठी व्यापारीच न आल्यामुळे तोडलेले सुमारे
तीन ट्रॅक्टर द्राक्ष नदीत टाकावे लागले. त्यामुळे सुमारे एक
लाख रुपयांचे अर्थिक नुकसान झाल्याचं चवरे यांनी सांगितले. चार
दिवसांपूर्वी गारपिटीचा द्राक्ष बागेला फटका बसला होता. शासनाने
या नुकसानीचेही पंचनामे करून शेतकऱ्यांनी भरपाई द्यावी, अशी मागणी
त्यांनी केली.
****
No comments:
Post a Comment