Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 24 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****
आयकर
विवरणपत्र भरण्याची मुदत ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
मार्च ते मे या तिमाहीसाठी वस्तू आणि सेवा कर - जीएसटी विवरणपत्र, विवाद से विश्वास
योजनेत सहभाग, तसंच आधार आणि कायम खातेक्रमांक पॅन संलग्नीकरणालाही ३० जूनपर्यंत मुदतवाढ
देण्यात आली आहे. आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठीचं विलंब शुल्क १२ टक्क्यांऐवजी ९
टक्के असेल, तर स्रोतावर वसूल केलेला कर - टीडीएससाठीचा व्याज दर १८ टक्क्यांऐवजी ९
टक्के असेल. विवाद से विश्वास योजनेवरही विलंबासाठीचा दहा टक्के शुल्क आकारणार नसल्याचं,
निर्मला सीतारामन् यांनी सांगितलं. पाच कोटी पेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना
काहीही व्याज किंवा दंड आकारलं जाणार नाही, त्यापेक्षा मोठ्या कंपन्यांवर अंतिम मुदतीच्या
पंधरा दिवसांनंतर ९ टक्के व्याज आकारलं जाणार आहे.
****
कोरोनाग्रस्तांवर
उपचारासाठी सर्व राज्यसरकारांनी विशेष रुग्णालयं निश्चित करावेत, असे निर्देश मंत्रिमंडळ
सचिव राजीव गौबा यांनी दिले आहेत. सर्व बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत तसंच कोणीही
संशयित रुग्ण चाचणी प्रक्रियेतून बाहेर राहणार नाही, यावर बारीक लक्ष ठेवण्याची सूचना
गौबा यांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या
आता एकशे सात झाली आहे. आज मुंबईत पाच तर अहमदनगर जिल्ह्यात एक रुग्ण आढळला.
दरम्यान मुंबईतले बारा रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून,
त्यांना लवकर रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे.
****
कोरोनाचे रुग्ण
बरे होत आहेत ही बाब समाधानकारक असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांपैकी दोन रुग्ण अतिदक्षता कक्षात असून, इतरांची प्रकृती
स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं. मीच माझा रक्षक या संकल्पनेनुसार नागरिकांनी घरातच
थांबावं, धार्मिक स्थळांमध्ये गर्दी टाळावी, असं आवाहनही टोपे यांनी केलं. पुणे मुंबईसह
अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांकडे संशयाने पाहू नका, गावातल्या परिजनांना घरी येण्यास
आळा घालू नका, असं टोपे यांनी म्हटलं आहे.
****
कोरोनाचा नायनाट करण्याची क्षमता भारताकडे असल्याचं, जागतिक
आरोग्य संघटना - डब्ल्यूएचओ ने म्हटलं आहे. भारताने लोकचळवळ राबवून देवी तसंच पोलिओ
सारख्या रोगांचं यापूर्वी पूर्णपणे उच्चाटन केलं आहे. देवी रोगाचं निर्मुलन ही भारताने
जगाला दिलेली अमूल्य भेट असल्याचं, डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे.
****
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीचं
गांभीर्यानं पालन न करणाऱ्यांवर पोलिसांना नाईलाजास्तव कारवाई करावी लागते आहे. औरंगाबाद
शहरात अनेक वाहनचालक तसंच उडाणटप्पू युवकांना पोलिसांनी हुसकावून लावलं. लातूर तसंच
परभणी इथंही अनेक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
हिंगोली शहरात आज
बावीस वाहनं जप्त करण्यात आली. तर अनेक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शहरात विनाकारण
फिरल्यास कारवाईचा इशारा सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिला आहे.
लातूरच्या नागरिकांनी संचार बंदीला शंभर टक्के प्रतिसाद
दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातल्या प्रत्येक
घरात जाउन आशाताई आणि इतर आरोग्य कर्मचारी नागरिकांची विचारपुस करत आहेत.
****
जालना जिल्ह्यात नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं, कोणतीही
अडचण आल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
यांनी केलं आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या असून २९ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात
आले आहेत.
****
उस्मानाबाद तालुक्यातल्या
वाघोली गावात प्रवेश करण्याचा मुख्य रस्ता ग्रामस्थांनी काट्याचं कुंपण घालून बंद केला
आहे. तपासणी झाल्याशिवाय बाहेरगावातून येणारी व्यक्ती गावात प्रवेश करू शकणार नाही
असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
****
नांदेडचे जिल्हाधिकारी
डॉ विपिन ईटनकर यांनी आज नांदेडच्या शासकीय रूग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर त्यांना कोरोनाप्रतिबंधाबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
****
परभणी महापालिकेकडून
सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण केलं जात आहे. मनपा आरोग्य विभागाची पथकं शहराच्या
विविध भागात फवारणी करत आहेत.
****
मुंबईहून मालवाहतूक करणाऱ्या
वाहनातून प्रवास करणाऱ्या १२ जणांना आज बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर इथं अटक करण्यात
आली. मलकापूर पोलिसांनी या सर्वांची तपासणीसाठी रुग्णालयात रवानगी केली आहे
*****
***
No comments:
Post a Comment