Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26
March 2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ मार्च २०२०
सायंकाळी ६.००
****
कोरोना
प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हातावर
पोट असणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे गरीब कल्याण पॅकेज
जाहीर केलं आहे. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या पॅकेजच्या माध्यमातून
पुढच्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दारिद्र्य रेषेखालचे लोक, बांधकाम कामगार, शेतकरी,
मनरेगा कर्मचारी, तसंच महिलांसाठी विविध स्वरुपात मदत जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांवर
उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, आशा कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख
रुपयांचे विमा कवच, ८० कोटी गरीब कुटुंबांना दरमहा पाच किलो गहू किंवा तांदुळ आणि एक
किलो दाळ मोफत वाटप, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आठ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता, मनरेगा कामगारांना दैनिक १८२ रुपयांऐवजी २०२ रुपये
मजूरी, वृद्ध-दिव्यांग तसंच विधवा महिलांना थेट लाभ हस्तांतरणामार्फत नियमित मासिक
अर्थसहाय्याव्यतिरिक्त एक हजार रुपये मासिक मदत, तसंच दारिद्र्य रेषेखालच्या
आठ कोटी तीस लाख उज्ज्वला गॅस जोडणीधारक महिलांना पुढचे तीन महिने गॅस सिलिंडर दिलं
जाणार आहे.
संघटीत क्षेत्रातल्या आस्थापनांमधले कर्मचारी तसंच
नियोक्ता या दोघांचं भविष्य निर्वाह निधी योजनेतलं प्रत्येकी १२ टक्के असं एकूण २४
टक्के योगदान सरकार भरणार आहे. शंभर पेक्षा कमी कामगार तसंच ९० टक्के कामगारांचं मासिक
वेतन पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या कंपन्याना हा निर्णय लागू होणार असल्याचं,
सीतारामन यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या या पॅकेजचं उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी स्वागत केलं असून, संकटाचं वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवीन पॅकेज केंद्रानं
जाहीर करत राहावं, अशी मागणी पवार यांनी केली आहे. या पॅकेजचे लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी
पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं, पवार म्हणाले.
दरम्यान, पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात
झालेल्या एका बैठकीत राज्यात मालवाहू ट्रकवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. जीवनावश्यक
वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांनी अडवू नये, असेही
निर्देश देण्यात आले आहेत. कर्तव्य बजावणारे पोलिस, वैद्यकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांवर
हल्ले करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पवार यांनी दिला आहे. जीवनावश्यक वस्तू घरपोच, सोसायटी
परिसरात देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी
दिले.
शहरात एकाकी राहणारे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी,
आणि बेघरांसाठी भोजनाची सोय करण्याकरता स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं, असं आवाहनही
पवार यांनी केलं आहे.
****
नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहन महसूलमंत्री
बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत
बोलत होते. नियम मोडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे, त्यांना पोलिस
बळाचा वापर करून घरी परत पाठवत असल्याचं थोरात यांनी सांगितलं. लोकांकडून सहकार्याची
अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
****
राज्यात वाहतूक व्यवस्था बंद असल्याने, कोणीही मूळ
गावी जाण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवासाचा प्रयत्न करू नये, असं आवाहन वैद्यकीय
शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. या स्थितीत
सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहावं, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा
सज्ज असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
****
जालना जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांसाठी हेल्पलाईन
सुरु करण्यात आली आहे. ज्यांना अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर जायचं असेल, किंवा
इतर अडचण असेल, त्यांनी 93 56 72 00 79 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत भाजीपाला,
अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक प्रमाणात साठा असून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये
असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी
सर्वेक्षण करून गावकऱ्यांना कोरोना प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन केलं जात आहे. महिला बालकल्याण
विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ हे या कामाचा पाठपुरावा करत आहेत
****
लातूर महानगरपालिकाच्या वतीने शहरात निर्जंतुकीकरण
फवारणी करण्यात येत आहे. औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध भागात औषध फवारणी
करण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीसह तीस गावांना पाणी
पुरवठा महावितरण कंपनीच्या कारवाईमुळे गेल्या तीन ते चार महिन्यापासून ठप्प आहे. ही
पाणीपुरवठा योजना सुरू करावी अशी मागणी जिल्ह्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली
आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी ही पाणीपुरवठा योजना येत्या दोन दिवसात सुरू करण्याचं
आश्वासन दिलं असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे
****
औरंगाबाद इथं उद्या शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या
वतीनं पढण्यात येणारी विशेष नमाज मशीदीऐवजी घरी अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment