Monday, 2 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे सदनाचं काम वारंवार बाधीत झालं. दिवंगत सदस्यांच्या स्मरणार्थ सकाळच्या स्थगितीनंतर सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाल्यावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या खासदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरुन गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत, जोरदार गदारोळ केला. काँग्रेसचे गौरव गोगोई यांच्यासह काही खासदार सत्ताधारी पक्षाच्या बाकांकडे काळे फलक घेऊन धावले. भाजपचे निशिकांत दुबे यांच्यासह काही जणांनी त्यांना विरोध केला, यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाली. काँग्रेस पक्षाच्या काही सदस्यांनी काही कागद फाडून हवेत भिरकावले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी तसंच राहुल गांधी यावेळी सदनात उपस्थित होते. या गदारोळामुळे सदनाचं कामकाज तीन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.

 दरम्यान, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याप्रकाराबाबत खेद व्यक्त करत, सदनात आज झालेल्या प्रकारामुळे आपण व्यथित झाल्याचं म्हटलं आहे. सदनाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी सर्व सदस्यांची असून, प्रत्येकानं तसा संकल्प करावा, असं आवाहन ओम बिर्ला यांनी केलं.

 राज्यसभेचं कामकाजही दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरून झालेल्या गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आदी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केल्यानं, सदनाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं.
****

धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलणार असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, ते आज विधान परिषदेत यासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान बोलत होते. या संदर्भात पक्ष आणि जातीचं राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात धनगर समाजाला आश्वासन देण्याचं आवाहन केलं होतं. माजी मंत्री महादेव जानकर, विनायक मेटे, यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
****

 राज्यातल्या कायमस्वरुपी विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या शाळांना पुढचे २० टक्के अनुदान देण्यासंदर्भातला प्रस्ताव वित्त विभागाकडे असून त्यांच्या मान्यतेनंतर तातडीने हे अनुदान शाळांना दिले जाईल, असं त्यांनी सांगितलं. यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये १४५ कोटी रुपयांची तरतूदही मान्य करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
****

 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बी.एस.फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंत होणार आहे. ३१ मार्च नंतर फक्त बी.एस. सिक्स वाहनांची नोंदणी होणार आहे. वाहनांचे नोंदणी शुल्क, कर यांचा भरणा केलेला असला तरीही ३१ मार्च नंतर बी.एस. फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी केली जाणार नसून ती २० मार्च पर्यंत पूर्ण करावी, असं वाशिम जिल्ह्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी सांगितलं आहे.
****

 परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात सामाजिक कार्यकर्ते कमलाजी कावळे यांनी आज बसस्थानक ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतचा संपूर्ण परिसर स्वच्छ करुन जिंतुरकरांना स्वच्छतेचा संदेश दिला. कावळे हे नागपूर ते परभणी असा प्रवास करत असून सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करून संत गाडगेबाबा आणि राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचं कार्य ते करत आहेत.
****

 राज्य उद्योजकता विकास महामंडळाच्यावतीनं अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातल्या उद्योजकांसाठी औरंगाबाद इथं क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर कार्यक्रम नि:शुल्क असून १८ वर्षांवरच्या उद्योग आधार नोंदणीकृत उद्योजकाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.
*****
***

No comments: