Tuesday, 3 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 राज्याचं नवीन वीज धोरण येत्या तीन महिन्यात निश्चित केलं जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानपरिषदेत दिली. विजेच्या दरात सवलती देण्यासंदर्भात, तसंच वीज गळती रोखण्यासाठी आणि तूट कमी करण्याबाबत ऊर्जा विभाग अभ्यास करत आहे. त्याचा अहवाल तीन महिन्यात मिळेल, असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या जनतेला १०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा सरकारचा विचार असून, अहवाल आल्यानंतरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले
****

सारथी संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज विधानपरिषदेत दिली. मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून, संस्थेकरता आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. भाजपाचे भाई गिरकर यांनी मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला.

 सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर निर्णय दिल्याशिवाय नियुक्तीबाबत निर्णय घेता येणार नाही, असं वडेट्टीवार यांनी याबाबत उत्तर देताना स्पष्ट केलं.
****

       राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा विचार नाही, २००५ साली केंद्र तसंच राज्य सरकारने स्वीकारलेली नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनाच कायम राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज विधान परिषदेत बोलत होते. राज्यशासनाच्या चार लाख कोटी वार्षिक उत्पन्नापैकी सुमारे दीड लाख कोटी रुपये २४ लाख कर्मचाऱ्यांचे पगार तसंच निवृत्तीवेतनावर खर्च होतात, जुनी निवृत्तीवेतन योजना लागू केली, तर सरकारी तिजोरीतला संपूर्ण निधी वेतन आणि निवृत्तीवेतनावर खर्च होईल, इतर कामांसाठी सरकारकडे निधी शिल्लक राहणार नाही, असं पवार यांनी सांगितलं.
****

       महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत आतापर्यत सात लाख ६५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात चार हजार ८०६ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत विधानभवनात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत सप्टेंबर २०१९ पर्यंतचं शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जात आहे. आतापर्यंत ३५ लाख  आठ हजार शेतकऱ्यांची खाती संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, नांदेडसह सहा जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर आणखी पाच लाख शेतकऱ्यांची कर्जखाती जाहीर केली जाणार असल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं.

 या योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या दुसऱ्या यादीत ७० हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्याची माहिती सहकारी संस्थेचे विभागीय सह निबंधक योगिराज सुर्वे यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या एक लाख ७८ हजार ६५३ शेतकरी कर्जखात्यांचा या यादीत समावेश झाला आहे. आजवरच्या यादीत समावेश नसलेल्या शेतकऱ्यांची नावे पुढील यादीत येतील. विशिष्ट क्रमांक मिळालेल्या शेतकऱ्यांनी सामुदायिक सेवा केंद्रावर जाऊन अधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करून घेण्याचं आवाहनही सुर्वे यांनी केलं आहे.
****

 दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी होऊ शकलं नाही. आज सकाळच्या सत्रात झालेल्या तहकुबीनंतर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाल्यावरही विरोधी तसंच सत्ताधारी बाजूच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

 राज्यसभेतही याच मुद्यावरून विरोधी आणि सत्ताधारी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सदनाचं कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं.
****

 औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार औरंगाबाद महापालिकेनं शहरातील बेकायदेशीर फलक हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. आज पोलिस बंदोबस्तात मनपाच्या अतिक्रमण पथकानं मुख्य बाजारपेठेतील फलक काढले. या फलकांविषयीची  माहिती शपथपत्राद्वारे महापालिकेला न्यायालयात सादर करायची आहे.
****

 परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं ओबीसी क्रांती सेनेच्या वतीनं जातनिहाय जनगणनेची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलं आहे.
****

 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अधिकारी रणवीर चव्हाण यांचा मृत्यू झाला.
*****
***

No comments: