Wednesday, 4 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 निर्भया सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला एक दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज फेटाळून लावली. या प्रकरणातल्या अन्य तीन दोषींच्या दया याचिका याआधीच फेटाळल्या गेल्या आहेत. तिहार तुरुंग प्रशासन आता या दोषींना फाशी देण्यासाठी नवी तारीख घेण्यासाठी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात जाणार आहे, तर दिल्ली सरकारनंही स्थानिक न्यायालयाकडे या दोषींच्या फाशीवर अंमलबजावणी करण्यासाठी नव्या तारखेची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.
****

 प्रत्यक्ष कर - विवाद से विश्वास, हे विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकातल्या तरतुदीनुसार, प्रत्यक्ष कराच्या प्रलंबित प्रकरणांमधल्या करदात्यांनी येत्या एकतीस तारखेपर्यंत कराची मूळ रक्कम भरल्यास या रकमेवरचं व्याज आणि दंड माफ करून हे खटले संपवण्यात येतील. ही योजना येत्या तीस जूनपर्यंत लागू राहणार असून एकतीस मार्चनंतर तीस जूनपर्यंत कराची रक्कम भरणाऱ्यांना दहा टक्के अधिक रक्कम भरावी लागेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं हे विधेयक आज लोकसभेत विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच मंजूर झालं.
****

 सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकांचं विलीनीकरण करून त्यांच्या चार बँका करण्याची प्रक्रिया सुरू असून हे विलीनीकरण येत्या एक एप्रिलपासून अस्तित्वात येईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. त्या आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या दहा बँकांपैकी, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेमध्ये, सिंडिकेट बँक कॅनरा बँकेमध्ये, अलाहाबाद बँक इंडियन बँकेमध्ये तर आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या दोन बँका युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहेत.
****

 समाज माध्यमांतून कोरोनाविषयी अफवा किंवा चुकीची माहिती पुरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईम पोलिसांना देण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली. राज्यात या विषाणूचा सध्या एकही रुग्ण नाही, मात्र या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्हा रूग्णालयामधे स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात येतील, असंही त्यांनी जाहीर केलं. या विषाणूवरील नियंत्रणासाठी पुण्यात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. १०४ हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांकही तयार करण्यात आला आहे. नियंत्रणासाठी लागणाऱ्या मास्कसारख्या वस्तूंच्या साठेबाजांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
****

 २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखवत अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडणाऱ्या चौदा पोलिस अधिकाऱ्यांना एका श्रेणीची पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना याबाबतची घोषणा केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 येत्या जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं बुलढाणा जिल्हा प्रशासन या आठवड्यात, शासकीय शाळांमधल्या निवडक हुशार मुलींना एक दिवसासाठी जिल्हाधिकारी पदाची भूमिका करण्याची संधी देण्याचा उपक्रम राबवत आहे. मुलींचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्यात उत्तम कामगिरी करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण व्हावी, हा यामागचा उद्देश असल्याची माहिती बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली आहे.
****

 गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा मोठा कट पोलिसांनी उधळून लावला. खोब्रामेंढा जंगलात साठ ते सत्तर नक्षलवाद्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एका विशेष शिबीरावर पोलिसांनी कारवाई करत स्फोटकं आणि शस्त्रांचा मोठा साठा जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 परभणी जिल्ह्यातल्या सेलू नगरपरिषदेचे अध्यक्ष विनोद बोराडे आणि पालम नगर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांना भारतीय जनता पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. नगर परिषदेमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात प्रस्ताव आणून त्याला समर्थन देण्यावरून पक्षानं ही कारवाई केली आहे.
****
 भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीसाच्या रकमेमध्ये मोठी घट केली आहे. आता ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला वीस कोटींऐवजी दहा कोटी रुपये, दुसऱ्या स्थानावरच्या संघाला साडेबारा कोटींऐवजी सव्वासहा कोटी रुपये बक्षीस मिळेल. उपान्त्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी चार कोटी सदोतीस लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.
*****
***

No comments: