Monday, 2 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 02.03.2020 TIME – 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक०२ मार्च २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्यातल्या अनेक भागात पाऊस; रब्बी आणि फळ पिकांचं मोठं नुकसान
** शहरी नक्षलवादी आणि डाव्यांकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा भारतीय जनता पक्षाचा आरोप  
** विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातल्या कुणबी मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्गात समावेश करायला सरकारला भाग पाडू- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची ग्वाही
आणि
** न्युझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत
****
राज्यातल्या अनेक भागात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे रब्बी आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं.   
मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात पूर्णा, पालम आणि  गंगाखेड तालुक्यात तर लातूर जिल्ह्यात रेणापूर, चाकूर, शिरुर नंतपाळ, आणि उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह काल पाऊस झाला. येरोळ परिसरात झालेल्या पावसानं केळी, आंबा, पपई, चिकू आदी फळझाडांची फळं गळून पडली.
नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात तसंच रोही पिंपळगाव, चिकाळा, मुक्त्यारपूरवाडी इथं गारांसह पाऊस झाला. हिमायतनगर, लोहा तालुक्यांसह  नायगाव तालुक्यातही पाऊस झाला. या पावसामुळे हरभरा, तूर, हू, करडई, सुर्यफुल, ज्वारी पिकांचं नुकसान झालं आहे.
बीड जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीटही झाली. जिल्ह्यातल्या अंबाजोगाई, केज, शिरूर या तालुक्यात रिमझीम पाऊस झाला. या पावसानं  शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेल्या  नुकसानीच्या  भरपाईसाठी, तातडीनं पाहणीद्वारे पंचनामे आणि अहवाल तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी  जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या  आहेत.
जालना जिल्ह्यात वडीगोद्री, शहागड, अंकुशनगर, डोमलगाव, पाथरवाला परिसरात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यातही काल दुपारी  अवकाळी पाऊस तर  काही ठिकाणी  गारपीट झाली. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
****
देशात बेरोजगारीचा आकडा वाढत असताना नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणून सरकार दोन समाजात फूट पाडत असल्याची टीका, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध हरितवाल यांनी केली आहे. औरंगाबाद इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. देशाला खरी गरज राष्ट्रीय बेरोजगारी नोंदणीची  आहे. राष्ट्रीय बेरोजगारी नोंदणीच्या मागणीसाठी भारतीय युवक काँग्रेसच्या वतीनंयंग इंडिया के बोलया अखिल भारतीय भाषण स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढच्या महिन्यात युवक काँग्रेस सरकारला बेरोजगारांचा आकडा देऊन नोकऱ्या उपलब्ध करण्याची मागणी करणार असल्याचं ते म्हणाले.
****
शहरी नक्षलवादी आणि डाव्यांकडून देशात नागरीकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. मुस्लिम आरक्षण हा मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मराठवाड्यातल्या जनतेला पाणी मिळावं यासाठी वॉटर ग्रीडचा जो निर्णय घेण्यात आला, त्यास स्थगिती देऊ नये, असंही पाटील यावेळी म्हणाले.
****
विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातल्या कुणबी मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्ग-ओबीसीत समावेश करायला सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.  कुणबी मराठा सेवा संघ आणि कुणबी युवा संघाच्या वतीनं काल जालना शहरात झालेल्या कुणबी हक्क परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, राहुल पाटील, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये कालपासून ऑपरेशन मुस्कान-८ ही विशेष मोहिम सुरु झाली आहे. यामध्ये शून्य ते १८ वर्ष वयोगटातली हरवलेली, पळवलेली मुलं, मुलांची आश्रय गृहं, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानक, रस्त्यावर भीक मागणारी मुलं, धार्मिक स्थळं, हॉटेल्स, दुकानं या ठिकाणी काम करणारी मुलं, अशा सर्वांना हरवलेली मुलं असं समजून त्यांच्या पालकांचा शोध घेण्यात येणार आहे. तसंच ज्यांच्या पालकांचा शोध लागला नाही, अशा बालकांना बाल सुधारगृहाकडे सोपवण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं. ३१ मार्च पर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे.  
****
लातूर जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या पशु प्रदर्शनाचं उद्घाटन काल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. लातूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातल्या विविध यात्रांमध्ये पशु आणि अश्व प्रदर्शनं भरवली जातात, अशा प्रकारच्या प्रदर्शनांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीच्या रकमेत भरीव वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. देवणी गोवंश लातूर जिल्ह्याचं भूषण असून, त्याच्या संगोपन आणि संवर्धनासाठी शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाईल, असंही ते म्हणाले.
****
जागतिक महिला दिन येत्या आठ मार्चला साजरा होत आहे. या अनुषंगानं महिलांनी आरोग्याची घ्यावयाची काळजी आणि महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देत आहेत, औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या औषधी विभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्या.

सर्व जबाबदार–या बरोबर स्वत: च्या शरीराची काळजी घेणे, स्वत: मनाची काळजी घेणे हे सर्व स्त्रियांसाठी अत्यंत आवश्यक आहे स्त्रियांमध्ये जे काही आजार आहेत जसं आहे काही आजार आहे असं ब्लड प्रेशर, डायबेटिस, थायरॉईड  तर हे सर्व आजार आहेत.तर हे सर्व आजार आणि त्याबरोबरच हार्ट अटॅक चे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आढळते तर हे सर्व होऊ न देण्यासाठी वजन यंत्रणांमध्ये ठेवण्याबरोबरच स्वतःच्या न्यूट्रिशन कडे सुद्धा लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे व या चाळीस वर्षानंतर स्वतःचे ब्रेस्ट एक्झामिनेशन्स हे अतिशय सिम्पल टेस्ट आहे ते आपण दरवर्षी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी करून घेऊ शकतो.
****
नांदेड इथं शंकर दरबार साहित्य संमेलनाचं काल ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार डी. पी. सावंत यावेळी उपस्थित होते. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या संमेलनात पी विठ्ठल आणि सुचिता खल्लाळ यांनी अनुराधा पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली.  माझी कविता ही गाव कुसातल्या महिलांच्या जीवनातील सुख दुःख सांगणारी असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचं ४१वं साहित्य संमेलन २८ आणि २९ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यादेगलूर इथं होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल नांदेड इथं ही माहिती  दिली. समेंलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कादंबरीकार बाबू बिराजदार असणार आहेत.
****
बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या माली पारगाव इथं काल शिवार साहित्य संमेलनाला सुरवात झाली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या या संमेलनाची सुरवात काल सकाळी ग्रंथ दिंडीनं झाली. संमेलनाध्यक्ष डॉ. रमेश गटकळ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, मसापच्या माजलगाव शाखेचे अध्यक्ष मुकुंदराज सोळंके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत.
****
न्युझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत आहे. पहिल्या डावात अवघ्या सात धावांची आघाडी मिळालेला भारताचा संघ दुसऱ्या डावात केवळ १२४ धावाचं करू शकला, त्यामुळे जिंकण्यासाठी न्युझीलंडला केवळ १३२ धावांचं आव्हान मिळालं आहे. दुसऱ्या डावात न्युझीलंडनं शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत बिनबाद ८० धावा केल्या होत्या. 
दोन सामन्यांच्या या मालिकेत यजमान न्युझीलंड एक-शुन्यनं आघाडीवर आहे.
****
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं राज्यभरात आरक्षण बचाव अभियान राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात काल सकाळी औरंगाबाद इथून झाली. यावेळी राष्ट्रीय समन्वयक मनोज बागडी, प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे उपस्थित होते. मराठवाड्यात हे अभियान तीन दिवस राबवलं जाणार आहे.  
****
लातूर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१९ च्या पीकविम्यापोटी ७०९ कोटी ८० लाख रुपये निधी शासनाकडून मंजुर झाला आहे. गेल्यावर्षी झालेल्या परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी त्यावेळी जिल्हाभरात नुकसानीची पाहणी करुन केंद्राकडे निधीची मागणी केली होती.
****



No comments: