Tuesday, 3 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 03.03.2020 TIME – 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांकमार्च २०२० सकाळी ७.१० मि.
****
** कांद्याच्या निर्यातीवरची बंदी १५ मार्चपासून उठवण्याची केंद्र सरकारची घोषणा; किमान निर्यात मूल्यदेखील हटवले
** दिल्लीतल्या हिंसाचारावरून संसदेच्या दोन्ही सदनाचं काम स्थगित
** धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानपरीषदेत आश्वासन
** राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ
आणि
** औरंगाबाद शहरातले सर्व बेकायदेशीर फलक तीन दिवसात हटवण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे महानगरपालिकेला आदेश
****
कांद्याच्या निर्यातीवरची बंदी १५ मार्चपासून उठवण्याची घोषणा केंद्र सरकारनं काल केली. देशात टंचाईमुळे कांद्याच्या भावात वाढ होत असल्याच्या कारणानं सरकारनं सहा महिन्यापूर्वी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. विदेश व्यापार महासंचालनालयानं किमान निर्यात मूल्यदेखील हटवण्याची घोषणा केली आहे. निर्यातीसाठी कोणत्याही अटी नसल्यामुळे सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात करण्यास निर्यातदार मुक्त असल्याचं महासंचालनालयानं  आपल्या निर्णयात म्हटलं आहे. राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा दरातल्या घसरणीच्या विरोधात आंदोलन सुरू केलं असून काल देशातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारपेठेत सरासरी एक हजार ४५० रूपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळाला.     निर्यात बंदी हटवल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी आशा वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली.
****
दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काल लोकसभा आणि राज्यसभेत झालेल्या गोंधळामुळे दोन्ही सदनाचं काम स्थगित करण्यात आलं. लोकसभेत दुपारी दोन वाजता कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या खासदारांनी हौद्यात उतरुन गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत, जोरदार गदारोळ केला. यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या गदारोळामुळे सदनाचं कामकाज तीन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.
राज्यसभेतही काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आदी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केल्यानं, सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
दिल्लीतल्या निर्भया सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या सर्व चार आरोपींना होणारी फाशी, पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देश दिल्ली न्यायालयानं दिले आहेत. आरोपी पवनकुमार गुप्ता यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया अर्ज काल दाखल केला, या अर्जावर निर्णय झाला नसल्यामुळे फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचे निर्देश दिल्ली न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधिशांनी दिले. पवन गुप्ता यानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळून लावल्यानंतर, त्यानंतर त्यानं काल राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. पूर्वीच्या आदेशानुसार या प्रकरणातल्या आरोपींना आज सकाळी सहा वाजता फाशी दिली जाणार होती.
****
धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलणार असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, ते काल विधान परिषदेत यासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान बोलत होते. या संदर्भात पक्ष आणि जातीचं राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात धनगर समाजाला आश्वासन देण्याचं आवाहन केलं होतं. माजी मंत्री महादेव जानकर, विनायक मेटे, यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
****
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. जळगाव, बीड, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा या जिल्ह्यांमधील १२९ गावांमधील अंदाजे ८८२ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती असल्याचं ते म्हणाले. कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्याकडून संयुक्त पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल,  असंही ते म्हणाले.
****
राज्य विधानपरिषदेत काल २४ हजार ७१९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. आगामी अर्थसंकल्पात समाजातल्या विविध घटकांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती तरतूद केली जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. 
****
मराठी नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंताला नटसम्राट दिवंगत डॉक्टर श्रीराम लागू यांच्या नावानं पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
***
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यभरातून या परीक्षेला १७ लाख, ६५ हजार ८९८ विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेदरम्यान नकलांचे प्रकार होऊ नये म्हणून ‘गैर मार्गाशी लढा’ या उपक्रमाअंतर्गत, २७३ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद शहरातले सर्व बेकायदेशीर फलक तीन दिवसात हटवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं महानगरपालिकेला दिले आहेत. यासंदर्भातल्या एका जनहित याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान काल खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी हे आदेश दिले. तीन दिवसात किती फलक हटवले, त्यासाठी किती खर्च आलायाची माहिती शपथपत्राद्वारे न्यायालयात सादर करावी, असंही न्यायालयानं सांगितलं. यासंदर्भातली पुढची सुनावणी परवा गुरुवारी होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरात सामाजिक कार्यकर्ते कमलाजी कावळे यांनी काल बसस्थानक ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतचा संपूर्ण परिसर स्वच्छ करुन जिंतूरकरांना स्वच्छतेचा संदेश दिला. कावळे हे नागपूर ते परभणी असा प्रवास करत असून सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करून संत गाडगेबाबा आणि राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचं कार्य ते करत आहेत.
****
आठ मार्च हा जागतिक महिला दिन. महिलांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी तसंच समाजात मान मिळवण्यासाठी पोलीस दलात यावं असं आवाहन औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी यानिमित्त केलं आहे. त्या म्हणाल्या -

सुट्टीच्या दिवशीपण आपल्याला जर ड्युटीला बोललं आपल्याला जावं लागतं आपले जवळ–जवळ आपलं कम्फर्ट विसरुन कामाला जावं लागतं डिपार्टमेंटच्या सर्व लोकांची काळजी घ्यायची असते. बाहेर पब्लिकला पण आपल्याला बोलायचं असतं एकदरीत आपली सगळी सिस्टीम मोस्टली रनिंग अंड फंक्शनल असली पाहिजे. एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होतो स्वावलंबी होतो तिला जो आत्मविश्वास येतो ते आत्मविश्वासाने सगळेच आदर करतात आपण आपली प्रगती आपल्या कुटुंबाची प्रगती ते म्हणतात ना एक मुलगी शिकली तर ती पुढच्या पाच पिढ्या अडाणी होण्यापासून वाचवते.

****
भारताविरूद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना काल न्युझीलंनं सात गडी राखून जिंकला. याबरोबरच दोन सामन्यांची ही मालिकाही दोन-शून्यनं जिंकली. जिंकण्यासाठी भारतानं दिलेलं १३२ धावाचं आव्हानं न्युझिलंडनं तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
****
हत्तीरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी ‘ हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम सार्वत्रिक औषधोपचार मोहिम-२०२०चं’ उद्घाटन काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. राज्यात नांदेडसह सहा जिल्ह्यात येत्या वीस मार्च पर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे.
****
राज्य उद्योजकता विकास महामंडळाच्यावतीनं अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी औरंगाबाद इथं क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सात दिवस चालणाऱ्या या शिबिरात कौशल्य विकास, डिजिटल मार्केटिंग, नेतृत्वगुण विकास, उद्योग विस्तारासाठी नवनवीन संधी आदींसह उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
****
परभणी इथं बचत गटांमार्फत सर्वच प्रभागात प्लास्टिक बंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. बचत गटातील महिला या स्वच्छता दूत बनून प्रभागांत प्लास्टिक बंदीसह स्वच्छतेविषयी जनजागृती करत आहेत. विशेषत: नागरिकांजवळ प्लास्टिक आढळून आल्यास बचत गटाच्या महिलांमार्फत दंडही आकारण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी सूचित केलं आहे.
****
अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली दाखल ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचा तपास आणि कायदेशीर प्रक्रिया योग्यरित्या तत्परतेने पूर्ण करावी, असे निर्देश औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिले आहेत. जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीची बैठक काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात पालवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****


No comments: