आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****
कोविड १९ या करोना व्हायरसमुळे होणाऱ्या रोगाच्या
जगभरात पसरत चाललेल्या साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं नागरिकांसाठी काही
दक्षतेचे उपाय जारी केले आहेत. यात, वैयक्तिक स्वच्छता पाळणं, वारंवार साबणानं हात
धुणं, शिंकणाऱ्या आणि खोकणाऱ्या व्यक्तींनी स्वत:चं तोंड रुमालानं झाकून घेणं आणि इतरांनी
अशा व्यक्तीचा निकट संपर्क टाळणं, असे दक्षतेचे उपाय करण्यास सांगितलं आहे. प्राण्यांच्या
संपर्कात न येण्याचं तसंच कच्च मांस सेवन न करण्याचं आवाहनही आरोग्य मंत्रालयानं केलं
आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या साथ रोगाचा सामना
करण्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे. भारतात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यापासून ते
तत्पर वैद्यकीय उपचार पुरवण्यापर्यंत विविध मंत्रालयं आणि राज्यं एकत्र काम करत आहेत,यामुळे
साथीला घाबरण्याचं कारण नसून, यापासून वाचण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं सांगितल्याप्रमाणे
छोटे पण महत्त्वाचे उपाय करण्याची गरज आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
या रोगाच्या संभाव्य साथीच्या पार्श्वभूमीवर देशात
औषधांचा तुटवडा पडू नये, यासाठी सरकारनं पॅरासिटॅमॉल आणि ब जीवनसत्व यासह सव्वीस औषधांच्या
निर्यातीवर कालपासून बंदी घातली आहे.
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आज
विधान परिषदेत, करोनाच्या संभाव्य साथीसाठी राज्यानं योजण्याचे उपाय, या विषयावर चर्चा
सुरू आहे.
****
ललित कला अकादमीच्या एकसष्टाव्या वार्षिक पुरस्कारांचं
वितरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या
सोहळ्यात एकूण पंधरा कलावंताना पुरस्कार देण्यात येणार असून त्यामध्ये मुंबईच्या रतनकृष्ण
सहा आणि सागर वसंत कांबळे तसंच सोलापूरच्या तेजस्वी नारायण सोनावणे या कलावंतांचा समावेश
आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या काही मोठ्या सहकारी संस्थांकडे
कर्जस्वरूपात अडकून पडलेले सुमारे सहाशे कोटी रुपये वसूल करण्यासाठी जिल्हा सहकारी
बँकेनं हाती घेतलेली लिलाव प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी संबंधित संस्थांनी जिल्ह्याच्या
पालक मंत्र्यांकडे केली आहे. या संस्थांना आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी काही अवधी
मिळावा, असं त्यांनी म्हटलं आहे. यावर पालकमंत्री जयंत पाटील यांनी परवा मुंबईत यासंदर्भात
एक बैठक बोलावली आहे.
****
No comments:
Post a Comment