Thursday, 5 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 05.03.2020 TIME – 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांकमार्च २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात कोरोना विषाणूचा सध्या एकही रुग्ण नाही-आरोग्यमंत्री राजेश टोपे
** मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत सरकारची भूमिका सकारात्मक; अधिवेशनानंतर योजनेच्या सर्व मुद्यांवर अभ्यास करणार
** सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकांचं विलीनीकरण येत्या एक एप्रिलपासून अंमलात येणार
आणि
** बीड जिल्ह्यातल्या माजलगाव नगरपालिकेत भ्रष्टाचारप्रकरणी  नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह तिघांना अटक
****
राज्यात कोरोना विषाणूचा सध्या एकही रुग्ण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. मात्र या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्हा रूग्णालयामधे स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं. नियंत्रणासाठी पुण्यात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. १०४ हा नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक तयार करण्यात आला असून, नियंत्रणासाठी आवश्यक मास्क आणि इतर वस्तूंच्या साठेबाजांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. त्याचबरोबर या आजारा विषयी समाज माध्यमांतून अफवा किंवा चुकीची माहिती पुरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईम पोलिसांना देण्यात आले असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
****
मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे, ते काल विधान सभेत मराठवाडा वॉटर ग्रीड विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. या ग्रीडसाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होईल, त्यामुळे पाणी आणणं हे अधिक खर्चिक होणार असल्याचं ते म्हणाले. अधिवेशन संपल्यानंतर याबाबत संबंधित विभाग, तज्ज्ञ अधिकारी तसंच आमदारांची बैठक घेऊन, योजनेच्या सर्व मुद्यांवर अभ्यास करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

या चर्चेदरम्यान लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी, लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधलं. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी, पश्चिम वाहिन्यांमधलं पाणी मराठवाड्यात आणण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया कधी राबवणार, असा प्रश्न विचारला. सुरेश वरपूडकर यांनी, परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या जायकवाडी तसंच निम्न दुधना कालव्यांतून पाणी सोडण्याची मागणी केली. तर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी, मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी अर्थसंकल्पात तरतूद करून, पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्याची मागणी केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल नियंत्रक आणि महालेखापाल - कॅगचा अहवाल विधानसभेसमोर मांडला. महसूल तसंच सार्वजनिक उपक्रमांबाबतचा हा अहवाल असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा खामगाव -जालना रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल विधानसभेत सांगितलं. या रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण करुन, प्रकल्पाचं  अंदाजपत्रक तयार करण्यात येईल, नंतर तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, असं परब यांनी सांगितलं.
****
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखवत, अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडणाऱ्या चौदा पोलिस अधिकाऱ्यांना, एका श्रेणीची पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानभवन परिसरात, पत्रकारांशी बोलताना याबाबतची घोषणा केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय कला अकादमी पुरस्कार प्रदान केले. यामध्ये सोलापूरच्या तेजस्विनी सोनवणे आणि मुंबईचे सागर कांबळे, रतनकृष्ण साहा, दिनेश पांड्या यांच्यासह १५ जणांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया येत्या एक एप्रिलपासून अंमलात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दहा बँकांपैकी, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेमध्ये, सिंडिकेट बँक कॅनरा बँकेमध्ये, अलाहाबाद बँक इंडियन बँकेमध्ये तर आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या दोन बँका युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहेत.
****
प्रत्यक्ष कर - विवाद से विश्वास, हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकातल्या तरतुदीनुसार, प्रत्यक्ष कराच्या प्रलंबित प्रकरणांमधल्या करदात्यांनी, येत्या एकतीस तारखेपर्यंत कराची मूळ रक्कम भरल्यास, या रकमेवरचं व्याज आणि दंड माफ करून हे खटले संपवण्यात येतील. ही योजना येत्या तीस जूनपर्यंत लागू राहणार असून, एकतीस मार्चनंतर तीस जूनपर्यंत कराची रक्कम भरणाऱ्यांना, दहा टक्के अधिक रक्कम भरावी लागेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं हे विधेयक काल लोकसभेत विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच मंजूर झालं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव नगरपालिकेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी  नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह तिघांना काल अटक करण्यात आली. नगरपालिकेतला विकास निधी बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याच्या गुन्ह्यात तत्कालिन मुख्याधिकारी आणि लेखापालाला अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबावरुन नगराध्यक्ष चाऊस यांनाही ताब्यात घेण्यात आलं. माजलगाव नगरपालिकेत चौदाव्या वित्त आयोगातून आलेला जवळपास पाच कोटी ५७ लाख रुपयांचा निधी कामं न करता हडप केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर आर्थिक आणि स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. स्थानिक न्यायालयानं सर्व आरोपींना सहा मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
नांदेड इथल्या संशयित कोरोना विषाणूच्या रुग्णाचा तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे. लोहा तालुक्याच्या कळेगाव इथला २५ वर्षीय तरुण सौदी अरेबियाबेहरीन शहरात कामासाठी गेला होता, तो पुन्हा देशात परत आला असून त्याला सर्दी, ताप आल्यानं नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू नगरपरिषदेचे अध्यक्ष विनोद बोराडे आणि पालम नगर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांना भारतीय जनता पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. नगर परिषदेमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात प्रस्ताव आणून त्याला समर्थन देण्यावरून पक्षानं ही कारवाई केली आहे.
****
स्वमग्न, बहुविकलांग मुलांच्या मातांनी मिळून स्वयंसिध्द ही संस्था सुरू केली आहे. येत्या आठ मार्चला साजर्या होणाऱ्या महिला दिनाच्या अनुषंगानं, संस्थेच्या संचालक अर्चना जोशी यांनी, बहुविकलांग मुलांच्या पालकांनी आपलं मुलं ही एक संधी म्हणून बघण्याचं आवाहन केलं.

मतीमुलांची शाळा सेवा भावनेने चालत होती वैद्यानिक दृष्टीकोन नव्हता. त्या मुलांचे मुल्यमापन करणं त्या नंतर शैक्षणिक कार्यक्रम ठरवणं त्याचं मुल्यमापन करणं त्याप्रमाणे राबनं काही खास tricks मी introduce केल्या चांगलं काम सुरु केलं हळूहळू मुलं वाढायला लागली. पालकांना सुद्धा वाटायला लागली आपलं मुलांमध्ये सुधारणा होऊ लागली special child मुलांच्या पालकांना सांगू इच्छीते की तुम्ही आपलं मुलं special आहे म्हणुन खचून जाऊ नका या मुलांच्या समस्या सोडविणं सोप काम नसलं तरी अशक्य तरी नाही आहे. सर्व पालकांना आपलं special मुलं आपल्या आयुष्यात  मिळालेल एक chance आहे हे समजून काम करावं
****
लातूर इथं येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिनी भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलं आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधातल्या संघर्षात पुरुषांचा सकारात्मक सहयोग असावा, या जाणिवेतून हा मोर्चा काढणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
****
नांदेड इथल्या नियोजित जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारनं सुमारे दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशी पाच मजली इमारत बांधण्यात येणार आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे दोन्ही सामने आज होणार आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड सामना सकाळी साडे नऊ वाजता, तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना दुपारी दीड वाजता होणार आहे. अंतिम सामना येत्या रविवारी आठ मार्चला होणार आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा मोठा कट पोलिसांनी उधळून लावला. खोब्रामेंढा जंगलात साठ ते सत्तर नक्षलवाद्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एका विशेष शिबिरावर पोलिसांनी काल कारवाई करत स्फोटकं आणि शस्त्रांचा मोठा साठा जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****


No comments: