Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date
– 04
March 2020
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
दिल्ली
हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेचं कामकाज आज सलग तिसऱ्या दिवशीही ठप्प झालं. लोकसभेचे
कामकाज सुरू होताच, कांग्रेस, तृणमूल
कांग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि डाव्या पक्षांच्या
खासदारांनी दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावर चर्चेच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू
केली. या मुद्यावर अकरा मार्च रोजी सदनात चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं, संसदीय
कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं, मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच
राहिल्यानं, तालिका अध्यक्षांनी सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर
दिवसभरासाठी तहकूब केलं.
राज्यसभेतही कांग्रेस, तृणमूल
कांग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी याच मुद्यावरून घोषणाबाजी केली. सभापती
व्यंकय्या नायडू यांनी, या मुद्यावर सरकार अकरा मार्चला चर्चा घेणार असल्याचं सांगितलं,
मात्र विरोधी सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं, सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब
केलं.
****
मागच्या सरकारनं सुरू केलेल्या लोकोपयोगी योजनांबाबत
सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे, ते
आज विधान सभेत मराठवाडा वॉटर ग्रीड विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. या ग्रीडसाठी
मोठ्या प्रमाणावर वीजेचा वापर होईल, त्यामुळे पाणी आणणं हे अधिक खर्चिक होणार असल्याचं
पवार म्हणाले. अधिवेशन संपल्यानंतर याबाबत संबंधित विभाग, तज्ज्ञ अधिकारी तसंच आमदारांची
बैठक घेऊन, योजनेच्या सर्व मुद्यांवर अभ्यास करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
या चर्चेदरम्यान लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी
लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधलं. गंगापूरचे आमदार प्रशांत
बंब यांनी पश्चिम वाहिन्यांमधलं पाणी मराठवाड्यात आणण्यासंदर्भात निविदाप्रक्रिया कधी
राबवणार, असा प्रश्न विचारला. सुरेश वरपूडकर यांनी, परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या जायकवाडी
तसंच निम्न दुधना कालव्यांतून पाणी सोडण्याची मागणी केली. तर माजी मंत्री बबनराव लोणीकर
यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी अर्थसंकल्पात तरतूद करून, पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी
निकाली काढण्याची मागणी केली.
दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मराठवाडा
वॉटर ग्रीड योजनेच्या अनुषंगानं बोलताना, सरकारनं नदीजोड प्रकल्पाबाबत आपली भूमिका
स्पष्ट करण्याची सूचना केली. याबाबत बोलताना अजित पवार यांनी संबंधित विभाग आणि तज्ज्ञांशी
चर्चा करून, भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नियंत्रक आणि महालेखापाल
- कॅग चा अहवाल आज विधानसभेसमोर मांडला. महसूल तसंच सार्वजनिक उपक्रमांबाबतचा हा अहवाल
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण सध्या राज्यात
नाही, त्यामुळे या आजाराबाबत काळजी करण्याचं कारण नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे
यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत या विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. चीनमध्ये
सुमारे दीडशे प्रकारच्या प्राण्यांचं मांस खाल्लं जातं, याच मार्गाने या आजाराचा संसर्ग
झाल्याचं टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी कोरोना
विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचारांसाठी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्याचे
निर्देश दिले आहेत. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांना मदत म्हणून
जागतिक बँकेनं बारा अब्ज अमेरिकी डॉलरचा सहाय्यता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली.
****
क्रिप्टो करन्सी अर्थात क्रिप्टो चलनावर भारतीय रिझर्व्ह
बँकेनं लावलेला प्रतिबंध सर्वोच्च न्यायालयानं आज उठवला.२०१८ मध्ये रिझर्व्ह बँकेनं
या चलनाचे व्यवहार करण्यास बँकांना बंदी घातली होती.या निर्णयाला क्रिप्टो एक्स्चेंजसह
काही संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, त्यावर न्यायालयानं हा निर्णय
दिला आहे.
****
नांदेड इथल्या नियोजित जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या
नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारनं सुमारे दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर
केला आहे.या निधीतून अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशी पाच मजली इमारत बांधण्यात येणार
आहे.
****
लातूर इथं येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिनी भारतीय
स्त्री शक्ती संघटनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलं आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या
विरोधातल्या संघर्षात पुरुषांचा सकारात्मक सहयोग असावा, या जाणिवेतून हा मोर्चा काढणार
असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment