Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date
– 05
March 2020
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
संसदेत आज करोना
विषाणूचा प्रादुर्भाव आणि उपाय यावर चर्चा झाली. सकाळी कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षाच्या
सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच तालिका अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास
पुकारला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी, वीजजोडणीपासून वंचित गावांचा मुद्दा
उपस्थित केला, दरम्यान, गदारोळ वाढत गेल्यामुळे तालिका अध्यक्षांनी सदनाचं कामकाज बारावाजेपर्यंत
स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी
सदनाला या आजाराच्या प्रादुर्भावाबद्दल सद्यस्थितीची माहिती दिली. सरकारद्वारे या आजाराचा
संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबतही त्यांनी सदनाला माहिती दिली.
विविध पक्षांच्या सदस्यांनी याबाबत आपली मतं तसंच सूचना मांडल्या.
राज्यसभेतही
कोरोना विषाणू संसर्गाशी लढा देण्यासंदर्भात चर्चा झाली. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन
यांनी या आजाराचा प्रादुर्भाव आणि केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली.
या विषयावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांसह अनेक विरोधी बाकांवरच्या अनेक
सदस्यांनी आपली मतं तसंच सूचना मांडल्या. मात्र सभापती व्यंकय्या नायडू यांनी, शून्यकाळ
पुकारताच विरोधी सदस्यांनी गदारोळ सुरू केला. या गदारोळातच सभापतींनी शून्य प्रहराचं
कामकाज सुरू ठेवलं, मात्र वारंवार सूचना देऊनही सदस्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवल्यानं,
सभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
नागरिकांनी कोरोना
विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी केलं आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत विधानसभेतही आज चर्चा झाली, या
चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात आज या विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका नसला, तरीही
राज्यातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर यासंदर्भात खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या
असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. होळी, धुलिवंदन, आणि रंगपंचमीचा सण काळजीपूर्वक साजरा
करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी
या चर्चेला प्रारंभ केला. या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी सभा संमेलनं,
तसंच उत्सवांची आयोजनं टाळावीत, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं. अशा आयोजनांना उपस्थित
राहण्याचं, तसंच गर्दीच्या ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं, असंही ते म्हणाले. अनेक
सदस्यांनी या विषयावर आपापली मतं व्यक्त केली.
****
आर्थिक सर्वेक्षण
अहवाल आज विधानसभेसमोर सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अहवाल विधानसभेसमोर
मांडला. हा अहवाल विधीमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं,
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं.
****
नांदेडच्या शंकराराव
चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचं रॅगिंग होत असल्याचा
मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. सरकारनं हे प्रकार
थांबवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी फडणवीस यांनी केली.
राज्यात अनेक
गृहनिर्माण संस्थांमध्ये घरांच्या छतावर बसवण्याच्या सौर ऊर्जा संयंत्रावरचं अनुदान
मिळत नसल्याचं, सदस्य अतुल भातखळकर यांनी निदर्शनास आणून दिलं. त्याबाबत कार्यवाही
करून अनुदान तातडीनं मिळवून देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
धुळे नंदुरबार
स्थानिक संस्था मतदार संघातून विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणुकीची अधिसूचना आज जारी
करण्यात आली. या जागेसाठी तीस मार्च रोजी निवडणूक तर मतमोजणी एकतीस मार्चला घेण्यात
येणार आहे. माजी मंत्री अमरिश पटेल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष सोडून
भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, त्यावेळी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा
दिल्यामुळे ही जागा रिकामी झाली आहे.
****
बेटी बचाव बेटी
पढाओ योजनेसह उत्कृटष्टन काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, नांदेड जिल्हा परिषदेच्याल
महिला आणि बाल विकास समितीच्या वतीनं, जागतिक महिला दिनानिमित्त यशोदामाता पुरस्काराने
गौरवण्याबत येणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास समितीच्याक सभापती
सुशीला पाटील बेटमोगरेकर यांनी ही माहिती दिली.
****
ऑस्ट्रेलियात
सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत
आणि इंग्लंड संघातला आजचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. उपांत्य फेरीतला दुसरा
सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज दुपारी दीड वाजता होणं अपेक्षित
आहे. अंतिम सामना येत्या रविवारी आठ मार्चला होणार आहे.
****
No comments:
Post a Comment