Thursday, 5 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 05.03.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०५ मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरसकट सर्वांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांनी संसर्ग टाळण्यासाठी सुती हातरुमाल वापरावा, वापरलेला हातरुमाल पुन्हा वापरण्यापूर्वी गरम पाण्यात अर्धा तास भिजवून त्यानंतर धुवून वापरावा, असं सरकारनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण, त्यांच्या संपर्कात येणारे लोक आणि अशा रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी यांच्याशिवाय इतरांनी मास्क वापरण्याची गरज नाही, असं या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या बहुचर्चित कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा प्रकरणातला प्रमुख सूत्रधार सुधीर मोहिते याला पुण्यात अटक करण्यात आली. त्याच्यावर पाच कोटी ब्याऐंशी लाख सव्वीस हजार रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी न्यायालयानं त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मोहिते यानं पाच वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून कोंबडीपालन व्यवसायातून होणाऱ्या आर्थिक फायद्याचं आमिष दाखवून एकशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं या तपासात उघडकीस आलं आहे.
****
नवजात बालकांचा संसर्गजन्य आजारांपासून बचाव होण्यासाठी राज्य शासनाच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातल्या शासकीय आरोग्य केंद्र तसंच रुग्णालयांना बारा हजार एकशे दोन बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत हे किट देण्यात आले असून त्यात नवजात बालकांसाठी कपडे, वापरानंतर नष्ट होणारे नॅपकिन, खेळणी अशा विविध साहित्याचा समावेश आहे.
*****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीवर पावसाचं सावट पसरलं आहे. दोन उपांत्य सामन्यांपैकी भारत विरुद्ध इंग्लंड सामना सकाळी साडे नऊ वाजता सुरू होणार होता, परंतु पावसामुळे सामना अजून सुरू होऊ शकलेला नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातला दुसरा उपांत्य सामना दुपारी दीड वाजता होणं अपेक्षित आहे. अंतिम सामना येत्या रविवारी आठ मार्चला होणार आहे.
****

No comments: