Monday, 8 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.06.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ८ जून २०२० सायंकाळी ६.००
****

Ø औरंगाबाद इथं कोरोना विषाणूग्रस्त दोन कैदी कोविड सुश्रुषा केंद्रातून पसार
Ø औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ हजार ६९ वर
Ø अंबाजोगाई इथं कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
आणि
Ø अंबडचे माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचं निधन
****

 औरंगाबाद इथं कोरोना विषाणूग्रस्त असलेले दोन कैदी कोविड सुश्रुषा केंद्रातून पसार झाले आहेत. सय्यद सैफ सय्यद असद आणि अक्रमखान अयाजखान अशी या दोघांची नावं आहेत. दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत असलेल्या या दोघा कैद्यांनी रविवरी रात्री खिडकीचे गज वाकवून, चादरीच्या सहाय्याने खाली उतरून पलायन केलं, सुरक्षा व्यवस्थेवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन हे दोघे पसार झाल्याचं, मध्यवर्ती कारागृहाकडून सांगण्यात आलं आहे. या दोन्ही कैद्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं असून, नियंत्रण अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

 किले अर्क परिसरात उभारण्यात आलेल्या या कोविड सुश्रुषा केंद्रात, १९ कैद्यांवर उपचार सुरू आहेत.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत आज दुपारनंतर आणखी चार रुग्णांची वाढ झाली. यामध्ये पंढरपूर इथले तीन तर मिलकॉर्नर परिसरातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आज दिवसभरात ४९ रुग्ण आढळल्यानं, जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या २ हजार ६९ झाली आहे. यापैकी १०४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, १ हजार २२४ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ७४१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडे चार हजारावर संशयितांचे नमुने तपासण्यास आले असून, त्यापैकी आतापर्यंत १९२ जण कोरोना विषाणूने बाधित आढळले होते, यापैकी ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १३१ जण बरे होऊन घरी परतले आहेत.
****

 सातारा जिल्ह्यातील कोरोनाविषाणू बाधितांची संख्या १० ने  वाढली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांची एकूणसंख्या ६३१ झाली आहे. आतापर्यंत २६ जणांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे.
****

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५ व्यक्तिंना कोरोनाविषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाविषाणू बाधितांची एकूण संख्या १२६ झाली आहे. यपैकी २२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला आहे .
****

 सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर शहरातले पाच रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गामुक्त होऊन घरी परतले आहेत. आता शहरात एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

 दरम्यान, जिल्ह्यात आज २ जणांना कोरोनाविषाणूची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ८२ झाली असून ३१ रुग्णांना प्रकृती सुधारल्यानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. आतापर्यंत ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४५ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

****

 गडचिरोली जिल्ह्यात आणखी एकाला कोरोनाविषाणूचा संसर्ग झाला आहे. हा रुग्ण मुंबईहून आलेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून २७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून १६ जणांवर उपचार सुरु आहे.
****

 धुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात ५६ रुग्ण कोरोना विषाणू बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २४८ झाली आहे. आतापर्यंत ११२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण नियंत्रण क्षेत्रांची संख्या ७१ झाली आहे.

 दरम्यान, शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयाला आजपासून कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्यात आलं आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 सर्व घटकांना मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, परिस्थिती सुरळीत होईल, असा विश्वास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते. जनतेकडून गोळा झालेल्या करातून सरकारचं कामकाज चालत असत, मात्र टाळेबंदीच्या काळात कर संकलन झालेलं नाही, विविध मार्गाने पैसा उभा करण्याचं प्रयत्न सरकार करत आहे, प्रसंगी कर्ज काढून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार केले जातील, असंही पाटील यांनी सांगितलं.
****

 औरंगाबाद इथलं कोविड सुश्रुषा केंद्र येत्या आठवडाभरात तयार होईल, असं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितलं आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या या रुग्णालयात अडीचशे खाटांची व्यवस्था असेल. या रुग्णालयासाठी साठ आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, इथल्या आरोग्य सुविधांबाबत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाला प्रस्ताव पाठवल्याचं, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं. सहा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात सर्व गरजेची उपकरणं परवा दहा जूनपर्यंत दाखल होतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
****

 बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेचं जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. या प्रयोगशाळेत बीड सह आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या कोरोना संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करता येईल. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी याची मदत होईल असा विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातल्या संशयितांचे नमुने आतापर्यंत लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आ. संजय दौंड, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****

 अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयातल्या परिचारिकांनी कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केलं. राज्याच्या मुख्य सचिवांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये यासंदर्भात दिलेल्या आदेशाची आरोग्य विभाग पायमल्ली करत असल्यानं याच्या निषेधार्थ कास्ट्राईब संघटनेच्या वतीनं संघटनेचे महासचिव एस टी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पगार कपातीचा निर्णय मागे घ्यावा अशीही मागणी या परिचारिकांनी केली आहे.

 गोंदिया इथंही बंधपत्रित ४९ परिचारिकांनी याच मागणीसाठी आज एक दिवसीय काम बंद आंदोलन केलं.
****

 बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं शेगाव मार्गावर असलेल्या एका हॉटेलमधल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून १८ जणांना अटक केली आहे. या कारवाईत मोबाईल, चारचाकी, दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण १३ लाख ४७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींमध्ये हॉटेलचा संचालक योगेश जाधव याच्यासह आणखी १८ जणांचा समावेश असून या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात केलसुला गावातल्या महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. यापूर्वी सेनगाव तहसील कार्यालयात निवेदन देऊनही प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही. आज या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून, उपोषणाचा इशारा दिला आहे.
****

 परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात कावलगाव शिवारात गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूची चोरी करणाऱ्या तस्करांविरूध्द पोलिसांनी आज धडक कारवाई केली. यामध्ये एक टेम्पो, दोन ट्रॅक्टर, वाळू उपसा करणारी बोट, असा एकूण २१ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****

 जालना जिल्ह्यातल्या अंबडचे माजी आमदार अण्णासाहेब उढाण यांचं आज निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. १९६७ ते ७२ या काळात त्यांनी अंबड मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. घनसावंगी तालुक्यात कंडारी या गावी राहत्या घरीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी कंडारी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पहिलं वर्ष यशस्वी ठरलं असून, कोरोना विषाणू संसर्गाविरूध्द लढतांना अनेक योजनांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मदत केली असल्याचं, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात रोजगार गेलेल्या गोरगरीब दिड लाख लोकांना अन्नधान्याची पाकिटं, तसंच कम्युनिटी किचन या उपक्रमातून एक लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती चिखलीकर यांनी दिली.
****

 परभणी जिल्ह्यात ५ लाख नागरिकांना आर्सेनिक अल्बम-30  या औषधीचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचं, आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सांगितलं आहे. परभणी शहरात प्रभाग क्रमांक ४ च्या भारतीय बाल विद्या मंदिर इथं शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात ते बोलत होते.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...