Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 June
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०२०
सायंकाळी ६.००
****
Ø
देशातला कोरोना विषाणू बाधित
रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर. २४ तासांत आठ हजारांहून अधिक रुग्ण घरी.
Ø
भारत-पाकिस्तान
सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये या वर्षात आतापर्यंत दोन हजार वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन.
Ø
हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत
सिंह राजपूत यानं मुंबईत केली आत्महत्या.
Ø
पेट्रोल
आणि डिझेलच्या दरात सलग आठव्या दिवशी वाढ.
****
देशातला कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचा
दर ५० टक्क्यांवर गेला आहे. गेल्या २४ तासांत आठ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असल्याचं
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. आतापर्यंत
एक लाख ६२ हजार ३७८ रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. सध्या देशात एक लाख ४९
हजार ३४८ जणांवर उपचार सुरू आहेत.
भारतीय औषध संशोधन परिषदेनं कोरोना संसर्गाची चाचणी
करण्याच्या क्षमतेतही वाढ केली असून, या चाचण्या करण्याची परवानगी मिळालेल्या शासकीय
प्रयोगशाळांची संख्या ६४६, तर खासगी प्रयोगशाळांची संख्या २४७ वर गेली आहे. गेल्या
२४ तासांत एक लाख ५१ हजारांहून अधिक जणांचे नमुने तपासण्यात आल्याचंही या पत्रकात म्हटलं
आहे.
****
भारत-पाकिस्तान सीमेच्या जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण
रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून एक जानेवारीपासून आतापर्यंत दोन हजार ४७ वेळा शस्त्रसंधीचं
उल्लंघन करण्यात आलं आहे. यात मार्च महिन्यात सर्वाधिक ४११ वेळा पाकिस्तानी सैन्यानं
गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत. संरक्षण दलांच्या विश्लेषणानुसार, गेल्या वर्षीपेक्षा
हे प्रमाण ६९ टक्क्यांनी वाढलं आहे. यात जानेवारी महिन्यात ३६६ वेळा, एप्रिलमध्ये ३८७
वेळा, तर मे महिन्यात ३८२ वेळा सीमेवर गोळीबार झाला. जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच
हा आकडा १४४ इतका झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
काश्मीरच्या नियंत्रण रेषेलगत असलेल्या दहशतवाद्यांच्या
प्रशिक्षण तळांवर दीडशे ते अडीचशे दहशतवादी, तर जम्मू परिसरातली आंतरराष्ट्रीय सीमा
आणि नियंत्रण रेषेलगतच्या तळांवर सव्वाशे ते दीडशे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचा
अंदाज सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे. या घुसखोरांना वाट मोकळी करून देण्यासाठीच पाकिस्तानी
सैन्याकडून गोळीबार केला जात असल्याचं सुरक्षा दलांनी म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणूच्या
प्रादुर्भावाच्या संकटात आघाडीवर राहून योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना
वाळीत टाकण्याचे प्रकार निंदनीय असून, त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहित
करावं, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णालयात काम करुन घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना विलगीकरणात
ठेवावं, अशा मागणीची याचिका
वसई-पालघर
इथल्या रहिवाशांनी
दाखल केली होती, ती फेटाळून लावताना न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि अमैद सय्यद यांच्या
खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत.
****
हिंदी चित्रपट अभिनेता
सुशांत सिंह राजपूत यानं मुंबईत वांद्रे इथं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या
आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून
अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त आणि प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली आहे.
३४ वर्षीय सुशांतनं
छोट्या पडद्यावरील मालिकांमधून आपल्या ित्रपटांतून सुरुवात केली होती. २०१३ साली ‘काइ पो चे’ या ित्रपटांतून त्यानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर
पुरस्कारदेखील मिळाला होता. याशिवाय, एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, राबता,
छिछोरे, पीके, शुद्ध देसी रोमान्स्, डिटेक्टीव ब्योमकेश बक्षी अशा चित्रपटांतही त्यानं
काम केलं
होतं. वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी सुशांत प्रसिद्ध होता.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग आठव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल प्रतिलिटर ६५ पैशांनी महागलं, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६४ पैसे वाढ झाली.
****
सोलापूरचे माजी आमदार युनूस शेख यांचं आज सकाळी निधन झालं. ते ऐंशी वर्षांचे होते.
तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. स्थायी समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. १९९० झाली ते विधान परिषदेवर
निवडून गेले.
****
अकोला जिल्ह्यात काल दोन, तर आज पाच जणांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. तर बारा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
गेल्या आठ दिवसांत १७
जणांचा अकोल्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एक हजार सात झाली आहे. तर मृतांचा आकडा एकावन्नवर पोहोचला
आहे. सध्या अकोल्यात ३३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
अमरावती इथं आज ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३३३ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत कोरोनामुक्त झाल्यानं २३७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या
६६ रुग्ण उपचार घेत आहेत. अमरावतीमध्ये
आतापर्यंत कोरोना विषाणूच्या
संसर्गामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला
असून, पावसाची वार्षिक
सरासरी आठ टक्क्यांवर
पोहोचली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळामुळे नुकसानही झालं आहे. या पावसामुळे मलकापूर शहरात मोठं
नुकसान झालं.
शहराचा विद्युत पुरवठा
त्यामुळे खंडीत झाला असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून
पडली आहेत. मलकापूर तालुक्यतल्या
जांभूळधाबा इथला एक शेतकरी पावसादरम्यान नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. धाड भागात
वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
बुलडाणा शहरानजीक चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलवड नजीक पैनगंगा नदीवरील
पुलाचं काम सुरू असल्यानं नदीपात्रात उभारलेला पर्यायी कच्चा पूल रात्री पडलेल्या पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे बुलडाणा-धाड
मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
****
वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथल्या ४ जणांना कोरोना
विषाणूची
बाधा झाल्याचं आज स्पष्ट झालं. हे सर्वजण अमरावती इथल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातले आहेत. वाशिम जिल्ह्यात
सध्या ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
*****
औरंगाबाद जिल्ह्यात
आज दिवसभरात ११६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोनाबाधितांची
संख्या दोन हजार ७४२ झाली आहे. यामध्ये सकाळी ११३, तर दुपारी अबरार कॉलनी, कोहिनुर
कॉलनी आणि अजब नगर इथला प्रत्येकी एक असे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी एक हजार
४५१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, १४३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला आहे. आता औरंगाबादमध्ये एक हजार १४८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं
कळवलं आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये ४० महिला आणि ७६ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
****
पैठणच्या जायकवाडी जलाशयातून
औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनीवरील फारोळा पंपगृहाचा वीज पुरवठा
आज सकाळपासून सात तास बंद होता. महावितरणनं दुरुस्तीच्या कारणास्तव हा विद्युत पुरवठा
बंद ठेवल्यामुळे शहर आणि सिडकोच्या पाणी वितरणावर परिणाम होणार असल्याचं महापालिकेनं जारी केलेल्या
प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
आज जागतिक रक्तदान दिन. या निमित्तानं लातूर इथं
दिव्यांगांनी
रक्तदान केलं. लातूर इथं दिव्यांगांच्या सर्व प्रवर्गांसाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या सक्षम संस्था, केंद्र
सरकारच्या सामजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. दिव्यांग
नागरिक आणि त्यांच्या पालकांनी रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला. अकोला शहरातही दोन ठिकाणी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीनं घेतलेल्या शिबीराला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी
आज रक्तदान केलं.
****
लातूर महापालिकेचा अखर्चित राहिलेला १५ कोटी रुपयांचा निधी विकास कामांवर खर्च
करण्याकरिता मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याचं महापौर विक्रांत गोजमगुंडे
यांनी म्हटलं आहे. २०१७-१८
या वर्षासाठी मूलभूत सोयी सुविधा विकास योजनांतर्गत १० कोटी रुपये, तसंच विशेष रस्ता अनुदान योजनेत ५ कोटी रुपयांचा
निधी लातूर शहर महानगरपालिकेला मिळाला होता. मात्र तत्कालीन परिस्थितीत
निर्णयाच्या अभावामुळे हा निधी अखर्चित राहिलेला होता. २ वर्ष उलटूनही निधी खर्च न
झाल्याने राज्य शासनानं हा निधी वापराकरिता स्थगिती दिलेली होती.
****
लातूर शहरातल्या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिऑपॅथिक
गोळ्यांच्या वाटपाला आज पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातून जाणाऱ्या
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे कोर्टा आणि चोंडी गावाजवळ पावसाचं पाणी अडून शेतीचं
मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे सोयाबीन आणि हळद पिकांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली
आहे.
*****
No comments:
Post a Comment