Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 June
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जून २०२०
सायंकाळी ६.००
****
Ø शैक्षणिक वर्षास प्रारंभ,
जुलैपासून शाळा, महाविद्यालय सुरू होणार
Ø कोरोना विषाणूच्या रुग्णांवर
उपचारांसाठी `प्लाझ्मा पेढी` उभाणार - मंत्री अमित देशमुख यांची घोषणा
Ø औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणूचे नवे छप्पन्न रुग्ण
आणि
Ø जालना, लातूरमधे मुसळधार
पाऊस
****
राज्यातलं
शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण,
तसंच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु
करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन आणि, डिजिटल शिक्षण पद्धतीच्या अवलंबाचे
पथदर्शी प्रकल्प तातडीनं राबवण्यास सुरूवात
करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा
गायकवाड यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश
दिले. शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु झालं पाहिजे या विधानाचा त्यांनी
यावेळी पुनरुच्चार केला. मोठ्या संख्येनं रुग्ण नसलेल्या भागात
नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून, ६
वी ते ८ वीचे वर्ग ऑगस्टपासून, तिसरी
ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून, आणि पहिली तसंच दुसरीचे
वर्ग शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरू करण्याचे आदेश
यावेळी देण्यात आले. अकरावीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या
दहावीच्या निकालानंतर सुरु करण्यात यावे, असं शिक्षण विभागानं यासंदर्भात जारी
केलेल्या आदेशात म्हटलं आहे. शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत तिथं विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी
शाळा व्यवस्थापन समिती, गावातली कोविड प्रतिबंध समिती तसंच स्थानिक पदाधिकाऱ्याशी
चर्चा करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
****
कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी
`प्लाझमा` उपचारपध्दती उपयुक्त ठरत असून रक्तपेढी प्रमाणे `प्लाझ्मापेढी` तयार केली
जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. त्यांना
आज कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर सांगली इथं बैठक घेतली. त्यानंतर
ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालयात आधुनिक सुविधा
दिल्या जाणार असून या सुविधांना अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा दर्जा मिळण्यासाठी
केंद्रीय आरोग्य खात्याकडे प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
`ट्रॉमा सेंटर` आणि कर्करोग उपचारांसाठी लागणारी यंत्रणा सांगलीतील रुग्णालयात बसवली
जाणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे ५६ रुग्ण आज आढळले. सकाळच्या सत्रात ५०
रुग्ण आढळल्यानंतर दुपारी ६ रुग्णांची
वाढ झाली आहे. यात प्रत्येकी ३ महिला आणि पुरुष रुग्ण आहेत. जिल्ह्यातील
एकूण रुग्ण संख्या २ हजार ८१२ झाली
आहे. यापैकी १ हजार ५०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात १५० जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार १६० रुग्णांवर
उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे चौदा रुग्ण आज आढळले. शहरातील भाग्यनगर परिसरात यातील
दोन रुग्ण आढळले
आहेत. त्यामुळे या भागाचं जिल्हा आरोग्य विभाग तसंच नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून
निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे.
****
पालघर
जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे ११ रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या
आता १ हजार ९११ झाली आहे. या पैकी ६१ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ८७८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या
९७२ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
****
सांगली जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे
दोन नवे रुग्ण आढळल्यानं जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या २४९ झाली आहे.
यातील १२५ रुग्णांना उपचारानंतर बरे
झाल्यावर घरी सोडण्यात आलं
असून सध्या ११६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोना
विषाणूमुळे आतापर्यंत ८ मृत्यू झाले आहेत.
*****
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढायला महाराष्ट्र
विकास आघाडी सरकारचं गैरव्यवस्थापन कारणीभूत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष
शेलार यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं दुसऱ्या कार्यकाळातील
पहिलं वर्ष पूर्ण केल्याबद्दल एका ॲपच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते
बोलत होते. राज्य सरकारनं केरळ प्रमाणे उपाय योजले असते तर विषाणूचा प्रादूर्भाव रोखता
आला असता, अशी टीकाही शेलार यांनी केली.
****
पंतप्रधान
नरेद्र मोदी सरकारनं दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात
कोरोना विषाणू संकट, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली असून अनेक ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतूल भातखळकर यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
हिंगोली
इथं राजपत्रिक अधिकारी महासंघानं आज कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. जिल्ह्याचे निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना चुकीची वागणूक देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर
निलंबनाची कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला
विविध संघटनांनी पाठींबा दिल्यामुळे जिल्ह्यात पोलिस विभाग वगळता सर्वच कार्यालयांचं
कामकाज आज ठप्प झालं होतं. पोलिस विभागानं संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास हिंगोलीमधे बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा या आंदोलकांनी
दिला आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात खरीप हंगामासाठी लागणारी बि -बियाणं शेतकऱ्यांना गावातच
उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाच्यावतीनं गावातच बीजप्रक्रिया आणि बीज प्रात्यक्षिकं
घेतली जात आहेत. उस्मानाबाद हा अनियमित पावसाचा
जिल्हा असल्यामुळे पेरणीसाठी सरी-वरंबा पद्धतीनं म्हणजेच बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी
करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे.
****
बुलडाणा
जिल्ह्यामधे पुनररचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली. येत्या
३ वर्षांसाठी या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. अधिसूचित क्षेत्रात फळ पीक घेणारे
सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र असतील, असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
पालघर जिल्हयातल्या प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदाराला ठाण्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली
आहे. चंद्रकांत पवार असं या तहसिलदाराचं नाव असून रस्ता बांधकाम कंपनीच्या वाहनांवर
कोणतीही कारवाई न करण्यासाठी दरमहा ३ लाख रुपये
द्यावेत अन्यथा या लाचेच्या रक्कमेच्या बदल्यात त्याच्या फार्म हाऊला जाणारा रस्त्याचं डांबरीकरण करावं अशी मागणी पवार यानं तक्रारदाराकडे
केली होती.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात आज दुपारी
तीन वाजेच्या सुमारास जोरदार
पाऊस झाला. तालुक्यातल्या नांजा, जैनपूर
कोठारा, तांदुळवाडी, सुभानपूर, मालखेडा, आव्हाणा, पेरजापूर,
सेलू, पारध, राजूर,
सिपोरा बाजार जवखेडा, हसनाबाद या भागात दीड
तास पाऊस झाल्यामुळे शेतांमधून पाणी वाहिलं. जालना शहरातही
पावसाची भुरभुर सुरू आहे.
****
लातूर
जिल्ह्यात आज सरासरी ५ पूर्णांक ४१ शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत झालेला हा पाऊस जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या १३ पूर्णांक
६५ टक्के झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं
दिली आहे.
****
परभणी
जिल्ह्यातील गंगाखेड पोलिस ठाण्याचे हवालदार सुरेश पाटील यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाच्या पथकानं एक हजार रुपयांची लाच स्विकारतांना अटक केली. तक्रारदार आणि त्याच्या
भावातील शेतीसंबंधित प्रकरण मिटवण्यासाठी तक्रारदाराकडं एक हजार रुपयांच्या लाचेची
हवालदार पाटील यानं मागणी केली होती.
****
परभणी
शहरात आज महापालीकेच्यावतीनं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग समिती
अंतर्गत मास्क न लावणं तसंच शारिरिक अंतर न राखण्याबाबत २८ नागरिकांविरुद्ध दंडात्मक
कारवाई केली आहे. यावेळी २ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
****
सोलापूर जिल्ह्यातील रिक्त झालेल्या नोकऱ्या महास्वयंम
पोर्टलव्दारे भरल्या जाणार आहेत. यासाठी शासनाच्या `रोजगार डॉट महास्वयंम
डॉट जिओव्ही डॉट इन` या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं
आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे.
****
दिग्दर्शक
कांचन नायक यांचं आज पुणे इथं अल्पशा
आजारानं निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. नायक यांनी दिग्दर्शीत केलेल्या
`कळत
नकळत` या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार राष्ट्रीय पारितोषिकं आणि नऊ राज्य पारितोषिकं मिळाली आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांचे दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील व्यंकटेश विद्यालयाचे संस्थापक जयंत दत्तात्रय
राखे यांचं आज औरंगाबादमधे निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. ते
१९६७-६८ पासून
पुढे औरंगाबाद शहरातील
सरस्वती भुवन इथं सेवानिवृत्त होईपर्यत गणित विषयाचे तज्ञशिक्षक म्हणून कार्यरत होते.
*****
No comments:
Post a Comment