Friday, 18 September 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 18 SEPTEMBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 September 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकरी स्वतंत्र होणार मात्र विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल - पंतप्रधानांचा दावा

** केंद्रीय मंत्री आणि खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करणारं विधेयक संसदेकडून मंजूर

** महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती तीन आठवड्यात सादर करा- मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

** औरंगाबाद जिल्ह्यात आज नऊ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

** नांदेड इथं ११० तर लातूर इथं चारशे खाटांच्या कोविड कक्षाचं लोकार्पण

आणि

** पैठणच्या नाथसागर धरणातून ८९ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग; सावधानतेचा इशारा

****

कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकरी स्वतंत्र होणार असून, विरोधक मात्र खोटं बोलून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये रेल्वे प्रकल्पाच्या उद्धाटन समारंभात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते आज बोलत होते. लोकसभेनं संमत केलेली ही विधेयकं राज्यसभेत मांडली जाणार आहेत. हा प्रस्तावित कायदा ऐतिहासिक असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळेल, त्या ठिकाणी विकण्याचं स्वातंत्र्य मिळेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने कृषी सुधारणेसाठी आणलेल्या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होऊन शेतकरी स्वावलंबी होइल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. या सुधारणांमुळे शेतकऱ्याची दलालाच्या जाचातून सुटका होईल तसंच त्यांच्यासमोरच्या अन्य अडचणीही दूर होतील, असं शहा यांनी म्हटलं आहे.

****

खासदारांच्या वेतनात तसंच निवृत्तीवेतनात एका वर्षासाठी ३० टक्के कपात करणारं विधेयक संसदेनं आज मंजूर केलं. लोकसभेनं मंगळवारी संमत केलेलं हे विधेयक आज राज्यसभेतही मंजूर झालं. केंद्रीय मंत्र्यांच्या वेतनात तसंच भत्त्यात ३० टक्के कपात करणारं विधेयकही राज्यसभेनं आज मंजूर केलं. कोविड प्रादुर्भावासाठी होणारा खर्च भरून काढण्यासाठी खासदार तसंच मंत्र्यांच्या वेतनात कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

****

दरम्यान, कर सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान गदारोळ झाल्यानं, लोकसभेचं काम आज वारंवार स्थगित झालं. पीएम केअर निधीसंदर्भात बोलताना, वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेवरून संतप्त झालेल्या विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उभं राहून घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याचा इशारा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला. त्यानंतरही गदारोळ थांबला नाही, त्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांना प्रथम अर्ध्या तासासाठी आणि त्यानंतर तालिका अध्यक्षांना तीन वेळा सदनाचं कामकाज स्थगित करावं लागलं.

****

गूगलने प्ले स्टोअरवरून पेटीएम हे ॲप काढून टाकलं आहे. क्रीडा स्पर्धांवर सट्टा चालवल्याच्या कारणावरून ही कारवाई केल्याचं गूगलकडून सांगण्यात आलं आहे. मात्र जे लोक पेटीएम वापरत आहेत, त्यांच्या व्यवहारांवर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही, तसंच त्यांचे पैसेही सुरक्षित असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी घेताना, न्यायमूर्ती के के तातेड यांनी, पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ पोहोचेल, अशा रितीने या योजनेची अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये दोन लाखापर्यंतचं थकित कर्ज असलेले शेतकरी या योजनेला पात्र असतील, असा निकष असलेल्या या योजनेसाठी ३५ लाख शेतकरी पात्र असताना, आतापर्यंत फक्त १५ लाख शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळाला असल्याचा दावा शेलार यांनी या याचिकेत केला आहे. या प्रकरणी राज्य सरकारनं तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणासंदर्भात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीने आज मुंबईतून चार जणांना अटक केली. या चौघांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर अंमलीपदार्थ तसंच ४ लाख ३६ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. अंमली पदार्थांमध्ये जवळपास एक किलो चरस आणि अर्धा किलो गांजाचा समावेश आहे. एनसीबीने आतापर्यंत या प्रकरणी बारापेक्षा अधिक लोकांना अटक केली असून, यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा समावेश आहे.

****

मुंबईतल्या इंदू मिल इथं प्रस्तावित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सभारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत पायाभरणीचा कार्यक्रम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. या कारणावरुन कुणीही राजकरण करु नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन घेण्यात येणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज नांदेड इथं  पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील उर्वरित विद्यापीठात ९० ते ९५ टक्के ऑनलाईन परीक्षा आयोजित केल्या जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज नऊ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ८४७ जणांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी कोविड बाधा झालेले नवे २६ रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातील कोविडबाधित रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८८१ झाली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ६ हजार ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

*****

परभणी महानगर पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक जलालोद्दीन काझी यांचं आज सकाळी औरंगाबाद इथं निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. काझी यांना अर्धांग वायूचा तीव्र झटका आल्यानं त्यातच त्यांचं निधन झालं.

****

नांदेड शहरात डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयालात आज १० हजार लीटर द्रवरूप प्राणवायू प्रकल्पाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या रुग्णालयातील अतिरिक्त ११० खाटांच्या कोविड सुश्रूषा केंद्राचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

लातूरच्या महाराष्ट्र वैद्यकीय विद्यान आणि संशोधन संस्थेचं यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय लातूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत असल्याचं, राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी, चारशे खाटांच्या स्वतंत्र कक्षाचं लोकार्पण देशमुख यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणातून आज सकाळी वाढवण्यात आलेला विसर्ग दुपारनंतर कमी करण्यात आला. आज सकाळी धरणाचे वक्राकार २७ दरवाजे उघडून ९९ हजार १३६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होतं. दुपारनंतर हा विसर्ग ८९ हजार ६०४ घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला असून, नदी काठालगतच्या नागरीकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या धरणात ४१ हजार ९३० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे.

***

नांदेड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे हदगाव तालूक्यातल्या पैनगंगा आणि कयाधू नद्यांना पूर आले आहेत. या पुरामुळं शेतपिकांचं नुकसान झालं असून या नुकसानीचं तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशा मागणीचं निवेदन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी आज जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना दिलं.

दरम्यान, या पावसामुळे धर्माबाद, भोकर, ऊमरी, बिलोली, नायगाव, देगलूर आणि मुखेड या तालुक्यात नदी नाल्यांना पूर आला असून शेतात पाणी शिरलं आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते वाहतुक ठप्प झाली आहे.

****

परभणी जिल्ह्यात येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत “माझे कुटुंब - माझी जबाबदारी” ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी आज याबाबतच्या आढावा बैठकीत दिले. या मोहिमेत प्रत्यक्ष गृहभेटी देण्यासाठीच्या आरोग्य पथकात एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्वयंसेवक असतील, एक पथक दररोज ५० घरांना भेटी देऊन, घरातल्या सर्व सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासणी करेल. तसंच ताप, खोकला, दम लागणे अशी कोविडसदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची कोविड-19 अँटीजेन चाचणी करुन पुढील उपचार केले जाणार आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे. ****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...