Saturday, 19 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात आंदोलन करून विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करीत असल्याचा पंतप्रधानांचा आरोप.

·      पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेशासाठी बालकाचं वय तीन वर्ष तर इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्ष पूर्ण असणं आवश्यक.

·      महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची सविस्तर माहिती सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश.

·      राज्यात आणखी २१ हजार ६५६ कोविड बाधितांची नोंद, ४०५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात काल ४६ बाधितांचा मृत्यू तर नव्या एक हजार ६०६ रुग्णांची नोंद.

आणि

·      स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया संघटनांचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष, प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे यांचं निधन.

****

कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात आंदोलन करून विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करीत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये रेल्वे प्रकल्पाच्या उद्धाटन समारंभात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते काल बोलत होते. नवे कायदे शेतकऱ्यांना दलाल आणि अन्य प्रकारच्या अडथळ्यापासून मुक्त करील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रस्तावित कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिकार प्राप्त होतील तसंच नव्या तंत्रज्ञानाचा त्यांना लाभ होईल. असं ते म्हणाले.

****

पूर्व प्राथमिक तसंच इयत्ता पहिलीत प्रवेशासाठीच्या वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे. आता प्ले-ग्रूप किंवा नर्सरीत प्रवेशासाठी बालकाचं वय तीन वर्ष पूर्ण तर इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी बालकाचं वय सहा वर्ष पूर्ण असणं आवश्यक असेल. यापूर्वीच्या नियमात वयाची पाच वर्ष पूर्ण केलेलं बालक पहिल्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं, मात्र शालेय शिक्षण विभागानं काल जारी केलेल्या निर्णयात आता वयाची सहा वर्ष पूर्ण केलेलं बालकच पहिल्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असेल, असं स्पष्ट नमूद केलं आहे. २०२१-२२ म्हणजेच पुढच्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. शाळा प्रवेशासाठी ३० सप्टेंबर हा मानिव दिनांक घोषित करण्यात आला असून, वयोमर्यादेच्या या नियमात पंधरा दिवसांची शिथिलता देण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना आहे.

****

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी घेताना, न्यायमूर्ती के के तातेड यांनी, पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ पोहोचेल, अशा रितीने या योजनेची अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये दोन लाखापर्यंतचं थकित कर्ज असलेले शेतकरी पात्र असतील, असा निकष असलेल्या या योजनेसाठी, ३५ लाख शेतकरी पात्र असताना, आतापर्यंत फक्त १५ लाख शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळाला असल्याचा दावा शेलार यांनी या याचिकेत केला आहे. या प्रकरणी राज्य सरकारनं तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे.

****

ग्रामीण भागातल्या सुक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कर्जांमध्ये अडकलेल्या महिलांना त्यामधून बाहेर काढून, महिलांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता एक राज्यस्तरीय अभ्यासगट नियुक्त करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. हा अभ्यासगट येत्या तीन महिन्यात अंतरिम अहवाल सादर करेल. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

****

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईत इंदू मिल इथं प्रस्तावित स्मारकातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सभारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत पायाभरणीचा कार्यक्रम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या कारणावरुन कुणीही राजकारण करु नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयानं काल याबाबतचे आदेश जारी केले. राज्यातल्या सर्व निवृत्तीवेतन धारकांसाठी लागू असणार आहेत.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ.शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास मान्यता देण्याचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली काल विद्यापीठात परीक्षेबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी, विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातल्या १०० मुलींसाठी शासकीय वसतीगृह, आर्थिकदृष्ट्या मागास १०० विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, तसंच शासकीय अध्यापक महाविद्यालयास विद्यापीठ परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव मांडले. शिक्षणमंत्री सामंत यांनी या प्रस्तावांना मान्यता देण्यात येत असल्याचं सांगितलं.

दरम्यान, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असल्याचं, सामंत यांनी काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यातल्या उर्वरित विद्यापीठात ९० ते ९५ टक्के ऑनलाईन परीक्षा आयोजित केल्या जाणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सेट-नेट-पीएचडी पात्रता धारक संघर्ष समितीच्या वतीनं राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयातली तासिका तत्वावरची शिकवण्याची पद्धत शंभर टक्के बंद करून प्राध्यापकांच्या नोकर भरतीची प्रक्रिया २०० बिंदू नुसार करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सामंत यांना देण्यात आलं.

****

केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. बाजारात कांद्याचा दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटल झाल्याशिवाय निर्यातबंदीचा निर्णय केला जाऊ नये, गरज असेल तर किमान निर्यात मूल्य लागू करावं, यातूनही शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील, असं पटेल यांनी म्हटलं आहे.

****

कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस समितीनं निदर्शनं केली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

****

राज्यात काल दिवसभरात आणखी २१ हजार ६५६ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या ११ लाख ६७ हजार ४९६ झाली आहे. काल ४०५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३१ हजार ७५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल २२ हजार ७८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत आठ लाख ३४ हजार ४३२ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ८८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ४६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ६०६ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात १३ बाधितांचा मृत्यू झाला, तर नव्या ३१३ रुग्णांची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ३०३ रुग्ण आढळून आले. बीड जिल्ह्यात काल सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवे १७८ रुग्ण आढळले. नांदेड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला, नांदेड जिल्ह्यात नव्या २८३, तर परभणी जिल्ह्यात ८८ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर आणखी २७५ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ११९ रुग्णांची भर पडली. हिंगोली जिल्ह्यात ४६ नव्या रुग्णांची नोंद झाली. 

****

मुंबईत दोन हजार २६७ नवे रुग्ण आढळले तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे शहरात एक हजार ८७५ नवे रुग्ण आढळले तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये एक हजार ५३५ नवे रुग्ण आढळले तर १३ जणांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये एक हजार सातशे तीन नवीन रुग्ण आढळले तर ४५ बाधितांचा मृत्यू झाला. सांगलीत एक हजार दहा रुग्ण आढळले तर ३४ जणांचा मृत्यू झाला. साताऱ्यात ९६२, रत्नागिरी १६८, सिंधुदुर्ग ३७, वाशिम ४३, अहमदनगर ६९७, गोंदिया १३५, गडचिरोली ५५ तर अमरावती २४४ नवे रुग्ण आढळले.

****

ऊर्जा मंत्री नितीन राऊत अणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची चाचणी करून घेत काळजी घ्यावी, असं आवाहन दोन्ही मंत्र्यांनी केलं आहे.

****

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी युवक संघटनांचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष, लातूर इथले प्राचार्य डॉ.विठ्ठल मोरे यांचं काल निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. ज्येष्ठ विचारवंत असलेल्या मोरे यांनी, विविध शोषित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमी लढा दिला. मोरे हे प्राध्यापकांच्या मुक्टा आणि एमफुक्टो या संघटनांचे पदाधिकारी होते, तसंच विद्यापीठाच्या सिनेट, व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष होते. राज्यशास्त्र या विषयातील योगदानाबद्दल त्यांना प्राध्यापक दत्ता चौगुले स्मृती पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार आणि स्वामी विवेकानंद भूषण पुरस्कार मिळाले आहेत.

****

परभणी महानगर पालिकेतले ज्येष्ठ नगरसेवक जलालोद्दीन काझी यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ५८ वर्षांचे होते. काझी यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आल्यानं त्यातच त्यांचं निधन झालं.

****

नांदेड शहरात डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात काल दहा हजार लीटर द्रवरूप प्राणवायू प्रकल्पाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाला. या रुग्णालयातील अतिरिक्त ११० खाटांच्या कोविड सुश्रूषा केंद्राचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं.

लातूर इथंही पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी, चारशे खाटांच्या स्वतंत्र कक्षाचं लोकार्पण करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या नाथसागर धरणातून काल सकाळी वाढवण्यात आलेला विसर्ग दुपारनंतर कमी करण्यात आला. धरणातून सध्या ७५ हजार ५५६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. प्रशासनानं नदी काठालगतच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या धरणात ५२ हजार ८४२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे.

****

नांदेड शहरातल्या गोदावरी काठावर असलेल्या गोवर्धन घाट इथं पाणी पातळी वाढल्यास इतर ठिकाणी काय सुविधा उपलब्ध करता येतील, याबाबत नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाली तर गोदावरी नदीकाठच्या सुमारे ३३७ गावांवर या पूराचा परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन चव्हाण यांनी काल संबंधित विभाग प्रमुखांची आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन विविध उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. जायकवाडी, माजलगाव, येलदरी, सिध्देश्वर या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक संभाव्य धोका नांदेड शहराच्या सखल भागात तसंच गोदावरी काठच्या गावात होऊ शकतो, असं ते म्हणाले. या अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून, त्याचे त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

****

नांदेड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे हदगाव तालुक्यातल्या पैनगंगा आणि कयाधू नद्यांना पूर आले आहेत. या पुरामुळं झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशा मागणीचं निवेदन डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी काल जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांना दिलं.

दरम्यान, या पावसामुळे धर्माबाद, भोकर, उमरी, बिलोली, नायगाव, देगलूर आणि मुखेड या तालुक्यात नदी नाल्यांना पूर आला असून शेतात पाणी शिरलं आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे.

जिल्हाधिकारी ईटनकर यांनी काल मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या आणि घरांच्या नुकसानीची पाहणी केली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन दिलं आहे. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर सर्वदूर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दिला जाणारा राज्य पातळीवरील भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांना आज औरंगाबाद इथं प्रदान केला जाणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कार्यक्रमात हा बदल करण्यात आला असून, प्राचार्य बोराडे यांच्या औरंगाबाद इथल्या निवासस्थानी हा कार्यक्रम होणार आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली. यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र आणि २५ हजार रुपये असं या पुरस्काराचं आहे.

****

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीच्या सभापतीपदी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सरीता बिरकिले यांची, तर उपसभापती पदी नगरसेविका ज्योत्स्ना गोडबोले यांची निवड झाली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात शेलगाव इथं काल पोषण अभियानाचा प्रारंभ झाला. बालकांच्या पोषणामध्ये कोणतीही कमतरता पडू नये आणि त्यांची प्रतिकार शक्ती वाढवावी, या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येत आहे. या माध्यमातून अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीसांच्या मार्फत संपूर्ण गावामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. 

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ आणि गंगाखेड तालुक्यात जनता संचारबंदी पाळण्यात येत आहे. दोन्ही तालुक्यात संचारबंदीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद हमीभाव खरेदी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे. जिल्ह्यात सात खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून, नोंदणी सुरु झाली आहे.   

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...