Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या
घटनापीठाचा नकार
** राज्यात कोविड लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित;
लसीकरण पूर्वतयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा
** मराठवाड्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा
मृत्यू
आणि
** पार्थिव पटेलची क्रिकेटच्या
सर्व प्रकारातून निवृत्ती
****
मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या
घटनापीठानं नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं ९ सप्टेंबर रोजी आरक्षणावर दिलेल्या
स्थगितीसंदर्भात आज घटनापीठासमोर सुनावणी झाली, या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या २५
जानेवारीला होणार आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांनी आपापले मुद्दे १८ जानेवारीपर्यंत
सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्याची सूचना घटनापीठानं केली आहे.
दरम्यान, आजच्या या सुनावणीनंतर राज्य सरकारनं या प्रकरणी
आपली भूमिका स्पष्ट करावी, असं खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
सरकारी वकील मुकुल रोहितगींसह सर्व सहकाऱ्यांनी न्यायालयात जोमाने बाजू मांडली, पण
त्याच वेळी पुढची तारीख मागण्याचं कारण समजलं नाही, असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारला.
या प्रकरणातले एक याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत, राज्य सरकारने
सुपर न्युमररी पद्धतीचा वापर करावा, शिक्षण तसंच नोकऱ्यांसाठी नव्या जागा निर्माण करण्याची
मागणी केली आहे. सरकारने टाळेबंदीपूर्वीच या विषयावर गांभीर्यानं प्रयत्न करायला हवे
होते, असंही पाटील यांनी नमूद केलं.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू
मांडण्यात कमी पडत असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी
आज परभणी इथं जिंतूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे या मार्गावरची
वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.
****
कोविड लसीकरणासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या
अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक झाली. यावेळी राज्यात लसीकरणासाठी
सुरु असलेल्या पूर्वतयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव
डॉ.प्रदीप व्यास यांनी याबाबतचं सादरीकरण केलं.
राज्यात कोविड लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात
आला आहे. त्यानुसार, पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातले आरोग्यसेवक कर्मचारी,
कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचंही
लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे.
दुसऱ्या गटात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल,
गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा
आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या गटात ५० वर्षावरील व्यक्ती तसंच
ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे.
लसीकरणासाठी
विकसित केलेल्या को-विन पोर्टलवर आतापर्यंत ९० हजारांहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी
झाली आहे. सुमारे दोन लाख ६० हजार शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार
आहे. राज्यात लसीच्या साठवणुकीसाठी राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर
३४, महामंडळांची २७ शीतगृह उपलब्ध असून ३ हजार १३५ साखळी केंद्र उपलब्ध आहेत. निवडणूक
मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहीमेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं
पालन करण्याचं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
यांनी केलं आहे.
****
प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक
शाळांमध्ये शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षणमंत्री
वर्षा गायकवाड यांनी ट्विटर च्या माध्यमातून ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला असून, पवित्र पोर्टलद्वारे
६ हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.
दरम्यान, सध्यातरी पहिली ते आठवीपर्यंतच्या
शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव नसल्याचं गायकवाड यांनी
स्पष्ट केलं आहे.
****
सुधारित कृषी कायदे शेतकरी हिताचे असून
शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समितीत विकण्याचं बंधन या कायद्यानं काढून टाकल्याचं,
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात
टाकळी कोलते इथल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण दानवे यांच्या हस्ते आज झालं.
त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्याला आपला शेतमाल मर्जीप्रमाणे योग्य भावात कुठेही विक्री
करण्याचं स्वातंत्र्या या कायद्यांनी दिल्याचं दानवे यांनी नमूद केलं.
****
सुधारित कृषी कायदे रद्द केले तर शेतकऱ्यांना
व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल, असं स्पष्ट मत, धर्मनिरपेक्ष जनता
दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ रेवण भोसले यांनी व्यक्त केलं आहे. ते आज
उस्मानाबाद इथं बोलत होते. 'एक देश एक बाजार' या कृषी धोरणामुळे शेतकऱ्याला आपला शेतमाल
स्थानिक बाजार समितीच्या बाहेर देशभर कुठेही विकण्याचं स्वातंत्र्य मिळालं असल्याचं
भोसले यांनी सांगितलं,
****
औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे
यांना कोविड संसर्ग झाला आहे. खैरे यांनी आज याबाबत माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्या
सर्वांनी तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन खैरे यांनी केलं आहे. आपली प्रकृती ठीक असून
खबरदारीचा उपाय म्हणून, खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचं खैरे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद
रेल्वे स्थानकावर आज दिल्लीहून २३१ प्रवाशांची तर विमानतळावर ३४ प्रवाशांची RTPCR
चाचणी करण्यात आली
****
बीड जिल्ह्यात शासकीय तसंच खाजगी वैद्यकीय
क्षेत्रातील १५ हजार कार्यरत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कोविड लसीकरणासाठी
राष्ट्रीय प्रणालीवरील कार्यवाहीसाठीची माहिती तातडीने पूर्ण करावी अशी सूचना बीड जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केली आहे. कोविड लसीकरणा बाबत
जिल्हा कृती समितीची आज बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
विभागात आज दोन अपघातात चार जणांचा
मृत्यू झाला.
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात दोन
भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. आलमला इथं आज सकाळच्या सुमारास ही दुर्घटना झाली.
शेतातल्या विहिरीमध्ये दोर लावून मोटार पाण्यात सोडत असताना, तोल जाऊन एक भाऊ विहिरीत
पडला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या भावाचाही बुडून मृत्यू झाला. शरण गुरूनाथ
बिराजदार आणि राहुल गुरूनाथ बिराजदार अशी या दोघांची नावं आहेत.
****
जालना - सिंदखेडराजा मार्गावर भरधाव
कंटेनर रस्त्यालगतच्या घरात घुसल्याने दोन मुलींचा आज मृत्यू झाला. नाव्हा शिवारात
आज दुपारी ही दुर्घटना झाली.
****
अहमदनगर जिल्ह्यात दौड रस्त्यावर ट्रक
आणि मोटारसायकलच्या अपघातात दुचाकीस्वार चौघेजण जागीच ठार झाले. आज सकाळी साडे दहा
वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मयत चौघे लोणीव्यंकनाथ इथले रहिवासी असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
क्रिकेटपटू पार्थिव पटेलने सर्व प्रकारच्या
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिवने एका पत्रातून ही माहिती दिली. १७ व्या
वर्षी क्रिकेट संघात समावेश झालेला पार्थिव पटेल हा सर्वात कमी वयाचा यष्टिरक्षक आहे.
पार्थिवने २५ कसोटी, तर ३८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत ९३४ धावा, ६२ झेल आणि
१० वेळा फलंदाजांना यष्टिचित केलं आहे तर एकदिवसीय सामन्यात ७३६ धावा, ३० झेल, तर ९
वेळा यष्टिचित केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या साखर कारखान्यांनी
रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपीची काही टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, त्यांनी
उर्वरित रक्कम १५ डिसेंबर २०२० पर्यंत शेतकऱ्यांना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी
मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. साखर कारखानदार, शेतकरी आणि शेतकरी संघटनेसोबत झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. कारखानदारांनी ताठर भूमिका न घेता सामंजस्याची भूमिका घ्यावी.
शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली
****
परभणी
जिल्ह्यात महाबीजचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सातवा
वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा यांसह इतर मागण्यांसाठी महाबीज कर्मचारी महासंघानं
परभणी इथं विभागीय कार्यालयासमोर आज निदर्शनं केली.
****
सोलापूर
जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातल्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्यासाठी शासनाने हेलिकॉप्टरची
व्यवस्था करुन द्यावी अशी मागणी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केली आहे. निंबाळकर
यांनी करमाळा तालुक्यात बिबट्याने हल्ला केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची आज विचारपूस
केली, नागरिकांना दक्ष राहण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
****////****
No comments:
Post a Comment