Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
·
राष्ट्रीय
सुरक्षेचा प्रश्न असल्यास भारत कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज - संरक्षणमंत्र्यांचं
प्रतिपादन
·
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत पत्रकार मा गो वैद्य यांचं नागपूर इथं निधन
·
कोविडच्या पार्श्वभूमीवर परभणी इथला हजरत सय्यद शाह तुराबुल हक ऊर्स - रद्द
आणि
·
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या
पहिल्या क्रिकेट कसोटीत भारताचा आठ गड्यांनी पराभव; भारतीय संघाकडून निच्चांकी धावसंख्येचा
विक्रम
****
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्यास भारत कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी
सज्ज असल्याचं प्रतिपादन, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज हैदराबाद
इथं दुंडिगल एअरफोर्स अकादमीच्या पदवीदान समारंभात बोलत होते. बदलत्या काळासोबत देशाला
असलेले धोके आणि युद्ध रनणीतीमध्येही आता बदल होत आहे, मात्र केंद्र सरकार सीमेवर कुठलीही
कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत पत्रकार, माधव गोविंद उपाख्य
मा गो वैद्य यांचं आज दुपारी नागपूर इथं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. १९४३ सालापासूनच
संघाचे सक्रिय स्वयंसेवक असलेल्या वैद्य यांनी, १९६६पासून अनेक वर्षे पत्रकारिता केली.
पत्रकारिता तसंच सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
त्यांच्या पार्थिव देहावर उद्या नागपूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी वैद्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
शाश्वत विकासासाठी मराठवाड्यातल्या
चारही विद्यापीठांनी एकत्रित येऊन किमान समान कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन,
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केलं आहे.
‘महात्मा गांधी मिशन‘च्या
३८ व्या स्थापना दिनानिमित्त आज मराठवाड्यातल्या कुलगुरुंच्या परिषदेत ते बोलत होते.
दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या परिषदेत
‘मराठवाडयाच्या शाश्वत विकासात विद्यापीठांची भूमिका’ या विषयावर मान्यवर कुलगुरुंनी
विचार मांडले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण, स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उध्दव भोसले, ‘एमजीएम‘विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुधीर
गव्हाणे, विश्वस्त प्राचार्य डॉ.प्रताप बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेत सहभागी
झाले. हे विचार मंथन म्हणजे, सर्वांगिण विकासाच्या दृष्टीनं विद्यापीठांनी टाकलेलं
पहिलं आश्वासक पाऊल आहे. ही सुरुवात अत्यंत सकारात्मक तसंच आशादायक असल्याचं मत डॉ.सुधीर
गव्हाणे यांनी व्यक्त केलं.
****
कोरोना विषाणू
संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद जिल्ह्यातले
लोककलावंत जालिंदर केरे यांनी केलं आहे.
****
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेसच्या अध्यक्षा
सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे काही
सूचना केल्या आहेत. या सूचना म्हणजे वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना असून यातून
सरकारवर दबाव टाकण्याचा काँग्रेसचा कोणताही प्रयत्न नाही असं, काँग्रेसच्या अनुसूचित
जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट
केलं आहे. ते आज नागपूरात पत्रकार परिषदेत बोलत होते. गांधी यांनी केलेल्या या सूचनांमध्ये
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचं वितरण, शासकीय कंत्राटं- प्रकल्प उद्योग-व्यवसायात प्राधान्य
देणं, शासकीय नोकरीतील अनुशेष कालबद्ध कार्यक्रम राबवून दूर करणं, शिक्षण, तंत्र शिक्षण
आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं, आदी सूचनांचा समावेश आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या १३ महिन्यांच्या कारकिर्दीतले आठ ते नऊ महिने हे
कोविड प्रादुर्भावाशी लढा देण्यात गेले, आता स्थिती पूर्ववत होत असल्यानं, या सूचना
केल्याचं राऊत यांनी सांगितलं.
****
५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या विविध भाषांमधल्या
चित्रपटांची घोषणा आज करण्यात आली. सांड की आंख आणि छिछोरे या हिंदी चित्रपटांसह प्रवास
या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
यांनी याबाबत माहिती दिली. हा महोत्सव येत्या जानेवारी महिन्यात गोव्यात होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड
इथल्या एका ६५ वर्षीय पुरुष कोविड बाधिताचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सात नवे
रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत.जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या
आता ४४ हजार ७९६ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या
४३ हजार ५४ झाली असून ५६६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक
हजार १८२ कोविड बाधितांचा मृत्यू झाला आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात
१४ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १२
हजार ८७८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ३३ रुग्णांना आज सुटी देण्यात
आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १२ हजार २४७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या
कोविड बाधित असलेल्या २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी जिल्हा प्रशासनानं यंदा हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांचा ऊर्स
रद्द केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव अद्यापही संपलेला नाही, या विषाणू संसर्गाची
दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं, जिल्हा
प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ जानेवार ते १५ फेब्रुवारी दरम्यान हा ऊर्स होणार
होता.
****
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा आठ गडी राखून
पराभव झाला, ॲडलेड इथं झालेल्या या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं अत्यंत
सुमार फलंदाजी करत, आजवरच्या निच्चांकी धावसंख्येचा विक्रम नोंदवला. दुसऱ्या डावात
भारताचे सर्व फलंदाज अवघ्या ३६ धावात तंबुत परतले. गेल्या ६५ वर्षांत जगातल्या कोणत्याही
क्रिकेट संघानं कसोटी सामन्यात केलेली ही निच्चांकी धावसंख्या आहे. भारतीय फलंदाजांपैकी
मयंक अग्रवालनं सर्वाधिक ९ धावा केल्या, हनुमा विहारीनं ८, तर कर्णधार विराट कोहलीनं
४ धावा केल्या. फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी फक्त
९० धावांचं लक्ष्य होतं, ते त्यांनी दोन गड्यांच्या बदल्यात सहज साध्य केलं. मालिकेतला
पुढचा कसोटी सामना पुढच्या शनिवारी २६ तारखेला मेलबर्न इथं होणार आहे.
****
चारित्र्याच्या संशयावरून
गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला परभणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली
आहे. लक्ष्मण काशीनाथ चांडाळ असं या
इसमाचं नाव असून, त्याने ११ ऑगस्ट २०१८
रोजी पत्नी कांचन हिची डोक्यात
दगड घालून हत्या केली होती.
****
अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या
नाटयशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ संपदा
कुलकर्णी यांची रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण
मंडळाच्या सदस्यपदी फेर नियुक्ती झाली आहे. याबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेतल्या
सर्व पदाधिकारी, संचालक, तसंच प्राध्यापक वर्गानं डॉ कुलकर्णी यांचं
अभिनंदन केलं आहे
//**********//
No comments:
Post a Comment