Friday, 18 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी 70:30 कोटा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या

** जयप्रकाश दांडेगावकर यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड

** औरंगाबाद तसंच जालन्यात प्रत्येकी दोन कोविडबाधितांचा मृत्यू

आणि

** ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारतीय संघाची दुसऱ्या डावात ६२ धावांची आघाडी

****

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ७०:३० कोटा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय योग्य असल्याचं सांगत, या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं, फेटाळून लावल्या आहेत. आमदार डॉ राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या या अध्यादेशाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात मराठवाड्याबाहेरच्या काही पालकांनी चार याचिका दाखल केल्या होत्या. खंडपीठाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत, कोटा रद्द करण्याचा शासन निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. या निर्णयाचं आमदार पाटील यांनी स्वागत केलं आहे.

****

कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या सोयीकरता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलं असून, त्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरता या पोर्टलवर अर्ज करायचा आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणं आवश्यक आहे.

****

 केंद्र शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण कार्यक्रमासाठी सन २०२०-२१ साठी २ हजार ३ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देऊन तातडीने निधी द्यावा, अशी मागणी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. ठाकूर यांनी आज केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची दिल्लीत भेट घेऊन ही मागणी केली. कोविड परिस्थितीमुळे लाभार्थी संख्येत वाढ झाल्यानं सुधारित आराखडा करणं आवश्यक होतं, पूरक पोषण कार्यक्रम सुरळीत ठेवण्यासाठी हा निधी वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

****

राज्याचे माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. महासंघाच्या संचालक मंडळाच्या २१४ व्या शिखर बैठकीत एकमतानं दांडेगावकर यांची निवड झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून समावेश झाल्यानं, त्यांनी महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दांडेगावकर हे सध्या राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी केलं आहे. 

   ****

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातल्या तिघा पर्यटकांचा आज दुपारी आंजर्ले इथल्या समुद्रात बुडून मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातल्या औंध इथून सहा पर्यटक दापोली तालुक्यात आले होते. आज दुपारी हे पर्यटक आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानं हे सर्वजण समुद्रात बुडाले. त्यातल्या तिघांना वाचवण्यात स्थानिकांना आलं, तर इतर तिघांचे मृतदेह थोड्या वेळाने किनाऱ्याला लागल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

प्लास्टर ऑफ पॅरीस - पीओपीच्या मूर्तींबाबत अभ्यास करुन तोडगा काढण्यासाठी अभ्यासगट नियुक्त केला जाणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही मागणी मान्य केली असल्याची माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. पीओपी वापरावर आणलेली बंदी, केंद्र सरकारने कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एक वर्षासाठी शिथिल केली होती. पुढच्या गणेशोत्सवात ही बंदी कायम होणार होती, या पार्श्वभूमीवर मूर्तीकार, आणि कारखानदारांच्या शिष्टमंडळाने आज आमदार शेलार यांच्या नेतृत्वात जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली. पीओपी मूर्तींवर बंदीमुळे गणेश मूर्तीकार तसंच कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे, शाडू मातीच्या मूर्तीला अनेक मर्यादा आहेत, नव्या तंत्रज्ञानानुसार पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळवता येते, त्याचा वापर करुन पर्यावरण पूरक पीओपीची मूर्ती घडवता येते, या आणि अशा अनेक मुद्यांकडे या शिष्टमंडळाने पर्यावरण मंत्र्यांचं लक्ष वेधलं. या पार्श्वभूमीवर अभ्यास गट स्थापन करुन मध्यममार्ग काढावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली, ती जावडेकर यांनी मान्य केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३३७ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभरात ३९ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १२ हजार ८६४ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १२ हजार २१४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या कोविड बाधित असलेल्या ३१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता एक हजार १८० झाली आहे. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज पाच नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या आता ४४ हजार ७०३ झाली आहे. जिल्ह्यात आातापर्यंत ४२ हजार ९८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

****

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघानं आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दुसऱ्या डावात ६२ धावांची आघाडी घेतली आहे, आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर भारतीय संघ २४४ धावांवर सर्वबाद झाला, त्यानंतर खेळायला आलेला ऑस्ट्रेलियाचा संघही १९१ धावांतच तंबूत परतला. आज सायंकाळी दुसऱ्या डावाचा खेळ थांबला तेव्हा भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ चार धावांवर बाद झाला होता, तर मयंक अग्रवाल पाच धावांवर खेळत होता.

****

राज्यातल्या शैक्षणिक संस्थामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबाद जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये जिल्ह्यातल्या सर्व संघटना सहभागी झाल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांनी दिली आहे.

//************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 19 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...