Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
**
कोविड लस उत्पादनासाठी येत्या काही आठवड्यात औषध कंपन्यांना
परवाना जारी करण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संकेत
**
मराठा आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीवर सर्वोच्च न्यायालयाच्या
घटनापीठासमोर आज सुनावणी
**
सुधारित कृषी कायद्यांच्या विरोधात विविध पक्ष संघटनांच्या
भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
**
कृषी कायद्यांच्या विरोधातलं आंदोलन निश्चितच शेतकऱ्यांचं
आंदोलन नाही - भाजपची टीका
**
शेतीसाठी दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न करू -कृषीमंत्री
दादा भुसे यांचं आश्वासन
**
राज्यात काल चार हजार २६ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात १४ मृत्यू तर नव्या २६७
रुग्णांची नोंद
आणि
**
औरंगाबाद जिल्ह्यातली सर्व पर्यटनस्थळं उद्या १० डिसेंबर
पासून पर्यटकांसाठी खुली होणार
****
कोविड लस उत्पादनासाठी येत्या काही
आठवड्यात संबंधित कंपन्यांना परवाना जारी करण्याचे संकेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
दिले आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती
दिली. लसीचं उत्पादन आणि प्रत्येक नागरिकापर्यंत लसीचं वितरण, यासाठीचा आराखडा तयार
असल्याचं, त्यांनी सांगितलं. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादच्या भारत बायोटेक
सह, अमेरिकेतल्या फायजर कंपनीनं लसीच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी, केंद्र सरकारकडे
अर्ज केला आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी
आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास, सध्या अस्तित्वात असलेली शीतगृहांची साखळी कार्यक्षम
आहे, असंही राजेश भूषण यांनी सांगितलं. लसीकरण ही फक्त केंद्र किंवा राज्य सरकारची
जबाबदारी नसून, जनतेनंही यात पूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
****
सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग-
एसईबीसी अंतर्गत मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अंतरिम स्थगितीवर,
आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या स्थगितीमुळे विद्यार्थी
प्रवेश प्रक्रिया तसंच नोकर भरती प्रक्रियाही थांबली होती. मात्र आजच्या सुनावणीत कायद्याच्या
चौकटीमध्ये आरक्षणावरची स्थगिती उठेल, आणि समाजाला हक्काचा न्याय मिळेल, अशी आशा मराठा
आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी वर्तवली आहे.
****
सुधारित कृषी कायद्यांच्या विरोधात
विविध पक्ष संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला, काल संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं दिसून
आलं. अनेक संघटनांनी बंदला पाठिंबा जाहीर करत विविध मार्गांनी या कृषी कायद्यांना विरोध
केला, तर अनेक संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होत नसल्याचं जाहीर करत, आपले दैनंदिन
व्यवहार सुरू ठेवले.
औरंगाबाद शहरात बंदला अल्प प्रतिसाद
दिसून आला. जिल्ह्यात पैठण, सिल्लोड आदी शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला, वैजापूर
तालुक्यात मात्र व्यवहार सुरळीत सुरु होते. औरंगाबाद शहरात दिल्ली दरवाजा परिसरात आंदोलन
करणाऱ्या डाव्या पक्षांचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
बीड जिल्ह्यातली बस वाहतूक काल सकाळी
बंद होती, मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून बसगाड्यांची ये-जा सुरू होती. बीड शहरासह जिल्ह्यातल्या
बाजारपेठा काल उशीरा उघडल्या, भाजी मंडई देखील सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
लातूर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेची
दुकानं वगळता, इतर आस्थापना बंदमध्ये बहुतांशी सहभागी असल्याचं दिसून आलं. काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह विविध शेतकरी आणि कामगार संघटना, या बंदमध्ये सहभागी
झाल्या होत्या. लातूर शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं गांधी चौकात निदर्शनं करण्यात
आली, जिल्हाभरात बँकांचे व्यवहार, तसंच एसटी महामंडळाची वाहतूक तुरळक स्वरूपात सुरू
होती.
परभणी शहरासह जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला. भाजीपाला विक्रेत्यांपासून व्यापारी वर्गही या बंदमध्ये सहभागी झाल्यानं
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना जिल्ह्यासह शहरात या बंदला संमिश्र
प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकी फेरी काढण्यात
आली. वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं मामा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बदनापूर,
जाफराबाद, घनसावंगी, राजूर इथं बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. जालना बस आगारातून धावणाऱ्या
लांब पल्याच्या बस काल बंद ठेवण्यात आल्या होत्या.
उस्मानाबाद
मध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातली बहुतांश दुकानं बंद होती, एसटी महामंडळाची
वाहतूक मात्र सुरळीत सुरु होती.
हिंगोली
जिल्ह्यात औंढा इथं काल महाविकास आघाडीच्या वतीनं औंढा हिंगोली मार्गावर रस्ता रोको
करण्यात आला, जिल्ह्यात व्यापारी प्रतिष्ठानं मात्र काल सुरू होती.
नांदेड
जिल्ह्यातही कालच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
राज्यात सोलापूर, सांगली, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, अहमदनगर आदी जिल्ह्यातूनही बंदला
संमिश्र प्रतिसाद मिळाला, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात भारत बंदचा फज्जा उडाल्याचा
दावा, भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला. मुंबई, रत्नागिरी जिल्ह्यातही फारसा
प्रतिसाद मिळाला नाही.
****
कृषी कायद्यांविरोधातलं शेतकऱ्यांचं
आंदोलन आता जनतेचं आंदोलन झालं आहे, हे कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही,
असं प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
काल मुंबईत थोरात यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले
अनेक सदस्य, या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
कृषी कायद्यांच्या विरोधात कालचं आंदोलन निश्चितच शेतकऱ्यांचं
आंदोलन नाही, अशी टीका, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी
केली आहे. ते काल कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. हा बंद यशस्वी झाला आहे का,
याचा विचार करण्यापेक्षा, या आंदोलनात वास्तवात किती शेतकरी रस्त्यावर उतरले, हे पाहणं
आवश्यक असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल
दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना, या मुद्यावर फक्त राजकारण सुरु असून,
शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप केला.
****
हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात नाहीत, मात्र ज्यांचा
या कायद्यांना विरोध आहे, त्यांनी आगामी अधिवेशनात आपले मुद्दे मांडावेत, असं केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापुरात पत्रकार
परिषदेत बोलत होते. शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका न घेता सरकारला बदल सुचवावेत, तडजोडीची
भूमिका घ्यावी, असं आवाहन आठवले यांनी केलं आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन अभिनेत्री
भार्गवी चिरमुले यांनी केलं आहे.
****
आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५८
शस्त्रक्रिया समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ, इंडियन मेडिकल असोसिएशननं येत्या ११ डिसेंबरला
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. संघटनेच्या
राज्य कार्यकारिणी सदस्या डॉ ज्योती चिडगुपकर यांनी सोलापुरात ही माहिती दिली. या शस्त्रक्रियांच्या
समावेशाबाबतची सूचना मागे घ्यावी, मिक्सोपॅथीला प्रोत्साहन देण्याच्या विचारात असलेल्या
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सर्व चार समित्या बरखास्त कराव्या, आदी मागण्या आय एम
ए नं केल्या आहेत.
****
शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी
प्रयत्न करू, असं आश्वासन ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलं आहे. ते काल अहमदनगर
जिल्ह्यातल्या राहुरी इथं एका कार्यक्रमात ऑनलाईन माध्यमातून बोलत होते. शेतकऱ्यांना
दिवसा आठ तास वीज देण्यासह, ठिबक सिंचनासाठी ८० ते ९० टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव
विचाराधीन असून, त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.
'विकेल ते पिकेल' या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून वाटचाल
करणं शेतकऱ्यांच्या हिताचं ठरणार असल्याचं भुसे यांनी नमूद केलं.
****
सातारा जिल्ह्यातल्या कराड जनता सहकारी
बॅंकेचा बॅंकींग परवाना रिजर्व्ह बँकेनं रद्द केला आहे. सहकार आयुक्तांनीही बँकेची
दिवाळखोरी जाहीर करून, बँक अवसायनात गेल्याचं जाहीर केलं आहे. बँकेच्या पाच लाख रुपयांपेक्षा
कमी ठेवी असलेल्या ठेवीदारांचे पैसे तीन महिन्यात परत केले जाणार आहेत.
****
विधान
परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे
नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांनी काल सदनाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे
नाईक-निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली.नागपूर, आणि पुणे पदवीधर मतदारसंघ तसंच
पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदारांनाही
काल शपथ देण्यात आली.
****
राज्यात काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या
काल बदल्या करण्यात आल्या. लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची अकोला इथं महाराष्ट्र
बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली झाली असून, परभणी जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांची लातूर जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात
आली आहे. औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त एस टी टाकसाळे यांची परभणी जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
****
राज्यात
काल चार हजार २६ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१८ लाख ५९ हजार तीनशे सदुसष्ट झाली आहे. काल ५३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४७ हजार ८२७ झाली आहे.
तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल सहा हजार ३६५ रुग्ण
बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ३७ हजार ८० रुग्ण,
कोरोना विषाण मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ४२ शतांश टक्के इतका झाला
आहे. सध्या राज्यात ७३ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल १४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २६७ रुग्णांची नोंद झाली.
बीड
जिल्ह्यात पाच कोविडबाधितांचा मृत्यू झाला. लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी
तीन रुग्णांचा, तर औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा
मृत्यू झाला.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल नवे ७३ कोविडग्रस्त रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ४९, लातूर ४५, बीड
३१, जालना २८, हिंगोली १५, उस्मानाबाद १४, तर परभणी जिल्ह्यात काल १२ नव्या रुग्णांची
नोंद झाली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातली अजिंठा, वेरूळ
आणि दौलताबादच्या किल्ल्यासह सर्व पर्यटनस्थळं, उद्या १० डिसेंबर पासून पर्यटकांसाठी
खुली होणार आहेत. त्यादृष्टीनं संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे
निर्देश, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या
आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
या सर्व पर्यटनस्थळी दर दिवशी सकाळच्या सत्रात एक हजार
आणि दुपारच्या सत्रात एका हजार अशा एकूण दोन हजार पर्यटकांना, दररोज मर्यादित प्रवेश
दिला जाईल. पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून, पर्यटकांना ऐन वेळेवर
तिकिट काढता येणार नाही.
गाईड, दुकानदार, स्थानिक कारागीर, हॉटेल
चालक, वाहतुक व्यावसायिक या सर्व संबंधितांची, कोविड चाचणी त्या-त्या पर्यटनस्थळाच्या
ठिकाणी करण्याची सुविधा, संबंधित यंत्रणेनं तातडीनं उपलब्ध करून द्यावी, पर्यटनस्थळी
टुरिस्ट गाईड यांनी पर्यटकांकडून संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करून
घ्यावं, वेरूळ अजिंठा इथं प्रवासी वाहतूक बसच्या
फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या संत
ज्ञानेश्वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून, देश-विदेशातल्या पर्यटकांना तिथे आकर्षित
करण्यासाठी लोकांकडून नावीन्यपूर्ण कल्पना मागवाव्यात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी म्हटलं आहे. ते काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. उद्यानाच्या विकासासाठी
जागतिक स्तरावरील सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
काल दिले. रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे या बैठकीला उपस्थित होते. या भागात
मुबलक पाणी असून, परिसराचा विकास झाल्यास छोटे मोठे उद्योग आणि परंपरागत व्यवसायांना
बळकटी येईल, असा विश्वास भुमरे यांनी व्यक्त केला.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन परभणीचे
उपमहापौर भगवान वाघमारे यांनी केलं आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कालच्या
तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतीय संघावर बारा धावांनी विजय
मिळवला. यजमान संघानं प्रथम फलंदाजी करत, भारतासमोर १८७ धावांचं आव्हान ठेवलं, या लक्ष्याचा
पाठलाग करताना, भारतीय संघ मात्र निर्धारित षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात, १७४ धावाच
करू शकला. भारतानं ही मालिका दोन एक अशी जिंकली आहे. दरम्यान, या दोन्ही देशांदरम्यान
चार कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे, या मालिकेतली पहिली कसोटी १७ डिसेंबरला
होणार आहे.
****
जालना-औरंगाबाद मार्गावर कार आणि दुचाकीच्या
धडकेत दुचाकीस्वार पती पत्नीचा मृत्यू झाला, बदनापूर इथल्या पाथ्रीकर महाविद्यालयासमोर
काल सकाळी हा अपघात झाला. रामेश्वर चव्हाण आणि इंदुबाई चव्हाण, अशी मृतांची नावं असून,
ते सिंदखेडराजा तालुक्यातल्या गारखेड इथले रहिवासी आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघात
नकाशावरचे शेतरस्ते मोकळे करण्यासाठी, प्रशासनानं धडक मोहीम हाती घ्यावी, अशी सूचना
आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. पवार यांनी औसा तसंच निलंगा इथं मनरेगा कामा संदर्भात
आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. येत्या ३१ मार्चपर्यंत नकाशावरील सर्व शेतरस्ते
अतिक्रमण मुक्त करावेत, असं पवार म्हणाले.
//***********//
No comments:
Post a Comment