Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
केंद्र
सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांविरोधात संयुक्त शेतकरी आघाडीनं आज पुकारलेल्या ‘भारत
बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
औरंगाबाद
शहरात बंदला अल्प प्रतिसाद दिसून येत आहे, मात्र जिल्ह्यात इतर ठिकाणी बंद पाळण्यात
येत आहे. लाडसावंगी इथं सर्वच व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवण्यात आली आहेत. पैठण शहरात
औषधी दुकानं वगळता इतर सर्व व्यापार बंद आहेत. सिल्लोड तालुक्यातल्या शिवना इथं बाजारपेठ
पूर्णपणे बंद आहे. वैजापूर तालुक्यात मात्र व्यवहार सुरळीत सुरु आहेत.
उस्मानाबाद
मध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शहरातली सर्व दुकानं कडकडीत बंद असून, शाळा
महाविद्यालयं तसंच एसटी महामंडळाची वाहतूक सुरळीत सुरू आहे.
बुलढाणा
जिल्ह्यातल्या मलकापूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या
नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आज सकाळी चेन्नई-अहमदाबाद ही रेल्वेगाडी रोखून आंदोलन केलं.
मुंबईच्या
काही भागात उस्फुर्त बंद पाळण्यात येत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच नवी
मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या पाचही मार्केटमध्ये कृषी मालाची आवक आणि
खरेदी विक्री बंद आहे. अहमदनगर जिल्ह्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. राळेगण सिद्धी इथं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बंदला
पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे.
धुळे
तालुक्यातल्या कापडणे-देवभाने चौफुली इथं शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि
मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको करत चक्काजाम
आंदोलन केलं. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत
सनेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजीत भोसले यांना तसंच कार्यकर्त्यांना,
पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला.
यवतमाळ
मध्ये भारत बंद ला जोरदार प्रतिसाद मिळत असून, संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. सातारा जिल्ह्यातल्या
बाजारपेठा पूर्णपणे बंद असून, किरकोळ स्वरूपात खाजगी वाहतूक सुरू आहे. रायगड जिल्ह्यातही
बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
अकोला
इथं महाविकास आघाडीच्या वतीनं कृषी विधेयकाच्या प्रतीचं दहन करण्यात आलं,
तसंच शहरात रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन करण्यात आलं. रत्नागिरी आणि भंडारा
जिल्ह्यात मात्र बंदला प्रतिसाद मिळाला नाही.
****
या
‘भारत बंद’ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह अनेक राजकीय पक्ष तसंच
शेतकरी संघटना बंद मध्ये सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य बॅंक कर्मचारी महासंघ,
तसंच औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षकेत्तर कर्मचारी
सेवक संघ बंद पाळत आहे.
तर
शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, अखिल भारतीय व्यापारी महासंघ तसंच अखिल भारतीय वाहतुकदार
संघटना, आणि औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघही या बंदमध्ये सहभागी झाले नाही.
****
दरम्यान,
या सुधारित कृषी कायद्याबद्दल विरोधी पक्ष शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचा आरोप
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. या मुद्यावर केवळ राजकारण सुरु असल्याचं
ते आज दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
****
देशात
काल दिवसभरात २६ हजार ५६७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३८५ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९७ लाख तीन हजार ७७० झाली आहे. देशात आतापर्यंत
या विषाणू संसर्गानं एक लाख ४० हजार ९५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ३९ हजार
४५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९१ लाख ७८ हजार ९४६
रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन लाख ८३ हजार ८६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल दहा
लाख २६ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत जवळपास १४ कोटी ८८ लाख
चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
मानवी
तस्करीला अधिक प्रभावीपणे आळा घालता यावा, यासाठी राज्यातल्या मानवी तस्करी विरोधी
केंद्रांची संख्या वाढवून ती ३४ वे नेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यात
सध्या १२ मानवी तस्करी विरोधी केंद्र कार्यरत असून, सुरु होणाऱ्या नवीन केंद्रांपैकी
आठ केंद्र विदर्भात असतील. या नवीन केंद्रांसाठी एकूण २७५ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात
आल्याचं सरकारनं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. देशभर नोंदवल्या गेलेल्या
मानवी तस्करीच्या एकूण गुन्ह्यांपैकी सर्वात जास्त गुन्हे महाराष्ट्रातले असून, मानवी
तस्करीला बळी पडणाऱ्यांची सुटका करण्यात देखील महाराष्ट्र प्रथम स्थानी असल्याचं राष्ट्रीय
गुन्हे नोंदणी संस्थेनं म्हटलं आहे.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सिडनी इथं होणार
आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या
मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment