Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
·
महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना
प्रतिबंध करण्यासाठीच्या शक्ती विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.
·
पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष
सुरू करण्याबाबत कोणताही विचार नाही - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून
स्पष्ट.
·
मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यास
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा नकार; या प्रकरणी महाविकास आघाडी सरकार गंभीर नसल्याचा
भाजपचा आरोप.
·
आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री
विष्णू सावरा यांचं निधन.
·
राज्यात काल चार हजार ९८१ नवे कोविडग्रस्त;
मराठवाड्यात नव्या २०६ रुग्णांची नोंद.
·
कोविड प्रादुर्भावाच्या काळातही उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या दहा हजारावर महिलांना प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ.
आणि
·
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी
नव्या जलवाहिनीच्या कामाचा शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
****
महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना
प्रतिबंध करण्यासाठी शक्ती विधेयकाला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या विधेयकात
बलात्कार, ॲसीड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा
प्रस्तावित केली आहे. ॲसीड हल्ला प्रकरणात दंडाची तरतूद असून, ती रक्कम पीडितेला वैद्यकीय
उपचार तसंच प्लास्टिक सर्जरीसाठी देण्याचं या विधेयकात प्रस्तावित आहे.
मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी
करावयाच्या करारांसाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा, तसंच त्यामध्ये एकसमानता आणण्याचा
निर्णय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत घेतला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजनेच्या संयोजनातून, शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्याचा निर्णयही, काल घेण्यात
आला. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून, प्रत्येक ग्रामपंचायत तसंच त्या
ग्रामपंचायतीतली घटक गावं समृद्ध करणं, हे या योजनेचं उद्दीष्ट आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र
२०२० च्या प्रारुप विधेयकाला कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
राज्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा
प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही विचार नसल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा
गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. त्या काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या. लहान मुलांना
शारीरिक अंतर राखणं तसंच आरोग्य विषयक सूचनांचं पालन करणं सहज शक्य नाही. स्थानिक प्रशासन
आणि आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच याबाबत विचार करता येईल, असं गायकवाड यांनी सांगितलं.
दरम्यान, प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च
माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला
आहे. पवित्र पोर्टलद्वारे सहा हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत
असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.
****
कोरोना लसीकरणासंदर्भात राज्याचे मुख्य
सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक
झाली. राज्यात कोविड लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार,
पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातले आरोग्यसेवक कर्मचारी, कामगार आणि एकात्मिक
बालविकास प्रकल्पातल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचंही लसीकरणासाठी
नऊ गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. दुसऱ्या गटात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र
कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांसह, आपत्ती व्यवस्थापन
स्वयंसेवकांचा आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या गटात ५० वर्षावरील
व्यक्ती तसंच ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे.
लसीकरणासाठी विकसित केलेल्या को-विन
पोर्टलवर आतापर्यंत ९० हजारांहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सुमारे दोन लाख
६० हजार शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यात लसीच्या साठवणुकीसाठी
पुरेशा संख्येत शीतगृहं उपलब्ध आहेत. राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर
३४, तर महामंडळांची २७ शीतगृहं उपलब्ध असून ३ हजार १३५ साखळी केंद्र उपलब्ध आहेत. निवडणूक
मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहीमेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी केलं आहे.
****
देशभरात सार्वजनिक ठिकाणी वाय फाय नेटवर्क
सेवा कार्यन्वित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या
बैठकीनंतर दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.
पीएम वाणी असं या योजनेचं नाव असेल. चालू आर्थिक वर्षात आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेसाठी
एक हजार ५८४ कोटी रुपये निधीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. सुमारे ५८
लाख ५० हजार कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
****
मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्यास
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं ९ सप्टेंबर
रोजी आरक्षणावर दिलेल्या स्थगितीसंदर्भात काल घटनापीठासमोर सुनावणी झाली, या प्रकरणी
पुढची सुनावणी येत्या २५ जानेवारीला होणार आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांनी आपापले
मुद्दे १८ जानेवारीपर्यंत सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्याची सूचना घटनापीठानं केली
आहे.
दरम्यान, कालच्या या सुनावणीनंतर राज्य
सरकारनं या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले
यांनी म्हटलं आहे. या प्रकरणातले एक याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी काल पत्रकार परिषद
घेत, राज्य सरकारने सुपर न्युमररी पद्धतीचा वापर करावा, शिक्षण तसंच नोकऱ्यांसाठी नव्या
जागा निर्माण करण्याची मागणी केली आहे. सरकारने टाळेबंदीपूर्वीच या विषयावर गांभीर्यानं
प्रयत्न करायला हवे होते, असंही पाटील यांनी नमूद केलं.
मराठा आरक्षण सुनावणीत महाविकास आघाडी
सरकार गंभीर नसल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
काल झालेल्या सुनावणीत सरकारची कोणतीही तयारी दिसून आली नाही. वकिलांना आवश्यक कायदेशीर
माहिती न पुरवणं तसंच ज्येष्ठ मंत्र्यांनी गैरहजर राहणं, असे प्रकार कालही दिसून आले,
असं सांगत पाटील यांनी, महाविकास आघाडी सरकारच्या कचखाऊ धोरणाचा निषेध नोंदवला.
****
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार
सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडत असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या
संतप्त कार्यकर्त्यांनी काल परभणी इथं जिंतूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं. या
आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.
****
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एनसीबीनं
काल मुंबईतून रिगल महाकाल या ड्रग विक्रेत्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून मोठ्या
प्रमाणावर अंमली पदार्थ तसंच रोकड जप्त करण्यात आली आहे. रिगल याला न्यायालयानं दोन
दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने या प्रकरणात केलेली ही विसावी अटक आहे.
****
आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री
तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सावरा यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ७६ वर्षांचे
होते. गेली दोन वर्ष ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. ते पालघर जिल्ह्यातून सहा वेळा
विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज पालघर जिल्ह्यात वाडा इथं
अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
राज्यात काल चार हजार ९८१ नवीन कोविड
बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ६४ हजार तीनशे अठ्ठेचाळीस
झाली आहे. काल ७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे
झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४७ हजार ९०२ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक
५७ शतांश टक्के इतका आहे. काल पाच हजार १११ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात
आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ४२ हजार १९१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ४५ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ७३ हजार
१६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सात कोरोना विषाणू
बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २०६ रुग्णांची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात काल तीन तर जालना आणि
उस्मानाबाद जिल्ह्यात दोन कोविडग्रस्तांच्या मृत्यूंची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात
काल ६७ नवे रुग्ण, लातूर ३७, बीड ३४, उस्मानाबाद २५, जालना १८, नांदेड १४, तर परभणी
जिल्ह्यात काल ११ नवे रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवीन कोविड बाधित रुग्ण
आढळला नाही
****
औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे
यांना कोविड संसर्ग झाला आहे. खैरे यांनी काल याबाबत माहिती दिली. आपल्या संपर्कात
आलेल्या सर्वांनी तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. आपली प्रकृती ठीक
असून खबरदारीचा उपाय म्हणून, खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचं खैरे यांनी सांगितलं.
दरम्यान, औरंगाबाद रेल्वे स्थानकावर
काल दिल्लीहून २३१ प्रवाशांची तर विमानतळावर ३४ प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात आली
****
जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राथमिक
शिक्षक रणजितसिंह डिसले यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे. डिसले हे नुकतेच मुंबईत
राज्यपाल तसंच अनेक मान्यवरांना भेटून बार्शीत परतले आहेत, काल त्यांची रॅपिड अँटिजेन
चाचणी करण्यात आली, त्यातून ते कोविडग्रस्त झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
****
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दहा हजार ६६९ महिलांना कोविड काळातही आरोग्य सेवा पुरवण्यात
आली, त्यामुळे जिल्ह्यात रुग्णालयातल्या प्रसुतीच्या प्रमाणात वाढ होऊन माता-बालक मृत्यूच्या
प्रमाणात घट झाली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत गरोदर मातांना गावातल्या आशा
आरोग्य स्वयंसेविकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भधारणा नोंदणी, रक्त लघवी तपासणी,
रक्तातलं हिमोग्लोबीन तसंच रक्तदाब यांचं नियमित निदान करून नियमित औषध उपचार घेण्याचा
सल्ला दिला गेला. लॉकडाऊन काळातही कोरोना विषयक काळजी घेऊन रूग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका,
रुग्णालयात प्रसुती, माता आणि बाळांचं लसीकरण या सेवा दिल्या गेल्या. गरोदर मातांनी
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेचे आभार मानले आहेत.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर,
उस्मानाबाद
****
औरंगाबाद जिल्ह्यातली अजिंठा, वेरूळ
आणि दौलताबादच्या किल्ल्यासह सर्व पर्यटनस्थळं, आजपासून पर्यटकांसाठी खुली होणार आहेत.
पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून, पर्यटकांना ऐन वेळेवर तिकिट
काढता येणार नाही. पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकिटं घेता येणार
आहेत. या सर्व पर्यटनस्थळी दर दिवशी सकाळच्या सत्रात एक हजार आणि दुपारच्या सत्रात
एका हजार अशा एकूण दोन हजार पर्यटकांना, दररोज मर्यादित प्रवेश दिला जाईल. पर्यटनस्थळी
पर्यटकांनी संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे.
****
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या
नव्या जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी १२ डिसेंबरला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या
हस्ते होणार आहे. उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल ऑनलाईन
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पाणीपुरवठा योजनेसह शहरातल्या मिटमिटा परिसरात
प्राणी संग्रहालयासाठी सफारी पार्क, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक
तथा स्मृतीवन आणि शहरात सुरू असलेल्या तसंच प्रलंबित १५२ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा
शुभारंभही मुख्यमंत्री करणार असल्याचं पालकमंत्री देसाई यांनी सांगितलं.
१ हजार ६८० कोटी रुपये खर्चाची ही नवी
पाणी पुरवठा योजना, राज्यातली सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना ठरेल. औरंगाबाद शहराची
सन २ हजार ५२ पर्यंतची लोकसंख्या ३३ लाख गृहीत धरुन, पाणी उपसा आणि शहरातल्या सर्व
वसाहतींना पाणी वितरणाचं नियोजन या माध्यमातून करण्यात येणार आहे. या योजनेचा संपूर्ण
निधी राज्य सरकार देणार असून, पाणीपुरवठा खाजगी कंत्राटी कंपन्यांना देणार नसल्याचं,
देसाई यांनी स्पष्ट केलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे शिक्षक आमदार विक्रम काळे
यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात दोन
भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. आलमला इथं शेतातल्या विहिरीमध्ये दोर लावून मोटार
पाण्यात सोडत असताना, तोल जाऊन एक भाऊ विहिरीत पडला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात
दुसऱ्या भावाचाही बुडून मृत्यू झाला.
****
जालना - सिंदखेडराजा मार्गावर भरधाव
कंटेनर रस्त्यालगतच्या घरात घुसल्याने दोन मुलींचा मृत्यू झाला. नाव्हा शिवारात काल
दुपारी ही दुर्घटना झाली.
****
अहमदनगर जिल्ह्यात दौड रस्त्यावर ट्रक
आणि मोटारसायकलच्या अपघातात दुचाकीस्वार चौघेजण जागीच ठार झाले. काल सकाळी साडे दहा
वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
****
जालना इथले ज्येष्ठ कवी प्राध्यापक
लक्ष्मीकांत प्रामाणिक यांचं काल औरंगाबाद इथं वार्धक्यानं निधन झालं. प्रामाणिक हे
मराठवाडा साहित्य परिषदेचे सभासद होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं
अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
परभणी जिल्ह्यात महाबीजचे कर्मचारी
कालपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा यांसह इतर
मागण्यांसाठी महाबीज कर्मचारी महासंघानं परभणी इथं विभागीय कार्यालयासमोर निदर्शनं
केली.
****
‘विकेल ते पिकेल’ अभियानातंर्गत काल
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाबाबत जिल्हास्तरीय
एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत नाबार्ड, स्मार्ट प्रकल्प, एक जिल्हा
एक उत्पादन, अन्न प्रक्रिया योजना, बँक कर्ज मंजुरीसाठी लागणारी कागदपत्रं, आदींबाबत
मार्गदर्शन करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यातल्या वडवणीचे तहसीलदार
श्रीकिसन सांगळे याला तीस हजार रुपये लाच घेताना काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं
रंगेहाथ पकडलं. वाळू वाहतूक करणारे वाळुचे ट्रॅक्टर सोडवण्यासाठी सांगळे यानं लाच मागितली
होती. सांगळेसह, तलाठी शेजाळ, कोतवाल बिडवे या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
अटक केली आहे. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment