Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
·
शासकीय रुग्णालयांमधल्या रुग्णांना
मोफत रक्त देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
·
शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना
लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द.
·
सुधारित कृषी कायद्यांमधल्या आक्षेप
असणाऱ्या तरतुदींवर चर्चेला सरकार तयार - केंद्रीय कृषीमंत्री.
·
प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं
काल पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन.
·
दिव्यांग आरक्षणाच्या अंमलबजावणीकडे
लक्ष देण्याची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची सूचना.
·
सामाजिक कार्यासाठीचा ‘नातू पुरस्कार’
डॉ. दिवाकर कुलकर्णी आणि सविता कुलकर्णी यांना जाहीर.
आणि
·
राज्यात काल तीन हजार ८२४ नवे कोविडग्रस्त;
मराठवाड्यात १२ मृत्यू, तर नव्या १७९ रुग्णांची नोंद.
****
राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांमधल्या
रुग्णांना मोफत रक्त देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश
टोपे यांनी काल ही घोषणा केली. उद्या शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
राज्यातल्या रक्तपेढ्यांमध्ये रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, आरोग्यमंत्री टोपे
आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं, रक्तसंक्रमण
परिषदेच्या शिबीरात रक्तदान केलं, त्यानंतर ते बोलत होते. मोफत रक्त देण्याचा हा उपक्रम
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याचंही, आरोग्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं. राज्यात सुमारे ३४४ रक्त पेढ्या कार्यरत असून, त्यामध्ये काही दिवस
पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोविड संसर्ग प्रादुर्भावामुळे रक्तदान शिबिरांच्या
आयोजनावर मर्यादा येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, येत्या १३ ते २० डिसेंबर दरम्यान, स्वाभिमान
सप्ताह साजरा केला जाणार असून, त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचं आयोजन
करण्यात येणार असल्याची माहिती, टोपे यांनी दिली. नागरिकांनी वर्षातून किमान दोन वेळा
रक्तदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
कोयना विद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी
शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. काल
कोयना विद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातल्या विद्युत गृहाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी
केली, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी धरणाची सविस्तर माहिती जाणून
घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई-पुणे
द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाचीही
काल प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी त्यानंतर प्रकल्प कार्यालयात एका सादरीकरणाद्वारे
सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली.
****
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक
तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होण्यास अडथळा असणारी
अधिसूचना, रद्द करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ही माहिती
दिली. शालेय शिक्षण तसंच क्रीडा विभागाने याच वर्षी १० जुलै रोजी, खासगी शाळा कर्मचारी
नियमावली १९८१ मधल्या, सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी केली होती, ही अधिसूचना
रद्द केल्यानं सर्व शिक्षक आमदार तसंच प्रतिनिधींनी, राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
****
नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी जागतिक
दर्जाची सुविधा असलेलं बिझनेस इनक्युबेटर सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापन होत आहे. उद्योग
विभाग आणि अमेरिकेत न्यूर्याक इथलं कॉर्नेल विद्यापीठ, यांच्यात काल याबाबतचा सामंजस्य
करार करण्यात आला. या उपक्रमात निवड झालेल्या उद्योजकांना कोणतेही शुल्क न आकारता प्रशिक्षण
तसंच मार्गदर्शन मिळणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.
“कॉर्नेल महा 60” या उपक्रमांतर्गत
राज्यभरातून निवड झालेल्या ६० प्रशिक्षणार्थी उद्योजकांना, सुमारे वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर,
कॉर्नेल विद्यापीठाकडून पदविका प्रमाणपत्र मिळेल. उद्योगासंबंधी मार्गदर्शन तसंच उद्यम
भांडवल निधीसारखी साधनं देखील उद्योजकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. हा प्रकल्प
प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांसाठी राबवला जाणार आहे.
****
हज यात्रेसाठी अर्ज सादर करायला येत्या
दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास
नक्वी यांनी ही माहिती दिली. अर्ज सादर करण्याची मुदत काल संपणार होती, मात्र आता ती
महिनाभरासाठी वाढवण्यात आली आहे. नक्वी यांनी हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि
इतर अधिकाऱ्यांसोबत काल आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. हज यात्रेसाठीची
अर्जप्रक्रिया शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीनं राबवल्याबद्दल, नक्वी यांनी हज समितीची प्रशंसा
केली.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन पाणीपुरवठा राज्य मंत्री संजय बनसोडे
यांनी केलं आहे.
****
सुधारित कृषी कायद्यांमधल्या ज्या तरतुदींबद्दल
शेतकऱ्यांना आक्षेप आहे, त्यावर खुल्या दिलानं चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं,
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं बातमीदारांशी
बोलत होते. शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या बंधनातून मुक्त करण्याची सरकारची इच्छा
असल्यानं, शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊनच केंद्र सरकारनं कृषी सुधारणा केल्या आहेत,
या कायद्यांमुळे बाजार समित्या आणि किमान आधारभूत दरावर कसलाही परिणाम होणार नाही,
शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजक बळकावणार नाहीत, याचा तोमर यांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र,
गुजरात, हरयाणा, पंजाब, कर्नाटक या राज्यांमधे बऱ्याच वर्षांपासून कंत्राटी शेती होते,
मात्र तिथं कधीही असा प्रकार घडलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
या कायद्यासंदर्भात सरकारनं दिलेले
प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावले असून, कायदे रद्द करण्याच्या मागणीवरच शेतकरी
नेते अडून बसल्याचं, तोमर यांनी सांगितलं.
****
नक्षलग्रस्त भागातल्या हुतात्मा पोलिसांच्या
पाल्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय नोकरीच्या धर्तीवर, देशासाठी लढा देणाऱ्या हुतात्मा
सैनिकांच्या पत्नी तसंच पाल्यांना, शासकीय नोकरीत थेट नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाच्या
विचाराधीन आहे. माजीसैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. ते
काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. माजी सैनिक आणि हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांना
नियमाप्रमाणे जमिनींचं वाटप करण्यासाठीच्या कार्यवाहीबाबतचा अहवाल पुढील तीन महिन्यात
सादर करावा, अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या.
****
प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं
काल पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ४७ वर्षांचे होते. अभियंता असलेल्या
भिडे यांनी अनेक नाटकं, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले. ‘मुळशी पॅटर्न’, ‘रानभूल’,
‘त्या रात्री पाऊस होता’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘पाऊलवाट’, ‘देऊळ बंद’, ‘कलम ३०२’, ‘साने
गुरुजी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘हरिशचंद्राची फॅक्टरी’, हे त्यांचे
गाजलेले चित्रपट आहेत. भिडे यांना दोन वेळा
राज्य नाट्य पुरस्कार तसंच व्ही. शांताराम पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
****
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री
विष्णू सावरा यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी पालघर जिल्ह्यातल्या वाडा इथं अंत्यसंस्कार
करण्यात आले. विष्णू सावरा यांचं परवा संध्याकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं होतं.
पालघर जिल्ह्यातून त्यांनी सहा वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं. विधानसभेतले
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसंच जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी
तसंच कार्यकर्त्यांनी, सावरा यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
****
केंद्र सरकारनं दिव्यांगांना शिक्षण
तसंच नोकरीत दिलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची सूचना, केंद्रीय सामाजिक
न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि दिव्यांग
सशक्तीकरण विभाग आणि लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं, काल लातूर जिल्ह्यातल्या ८ हजार
७९७ दिव्यांगांना, उपयोगी उपकरणं तसंच साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात
दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री गहलोत बोलत होते. केंद्र सरकारने
दिव्यांगाच्या कल्याणासाठी उच्च शिक्षणात पाच टक्के तर नोकऱ्यांमध्ये ३ ऐवजी ५ टक्के
आरक्षण दिलं असल्याचं गहलोत यांनी नमूद केलं.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे, खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी
मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा ‘नातू
पुरस्कार’ यंदा औरंगाबादचे डॉ. दिवाकर कुलकर्णी आणि सविता कुलकर्णी या दाम्पत्याला
जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्कारचं स्वरुप आहे. उस्मानाबाद
जिल्ह्यात यमगरवाडी इथं शैक्षणिक कार्यात भरीव योगदान देणारे उमाकांत मिटकर यांना
‘सेवाव्रती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं
स्वरुप आहे. येत्या नऊ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्काराचं
हे ३१ वं वर्ष आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातली सर्व पर्यटन स्थळं
शासनाच्या नियमांचं पालन करत कालपासून उघडण्यात आली. काल पहिल्याच दिवशी पर्यटकांचा
चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र ऑनलाईन नोंदणी न केलेल्या पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात
आला. पर्यटकांनी पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकिटं घेऊनच पर्यटन
स्थळांना भेट देण्याचं आवाहन, संबंधितांकडून करण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात अनियंत्रितपणे मुद्रा
कर्ज वाटपामुळे बँका अडचणीत आल्याचा आरोप, आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे.
मुद्रा कर्ज वाटप प्रकरणी बँक अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी, बँक अधिकारी,
अग्रणी बँक अधिकारी यांच्यावर वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणीही
दुर्राणी यांनी, परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली आहे.
****
राज्यात काल तीन हजार ८२४ नवीन कोविड
बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ६८ हजार एकशे बहात्तर
झाली आहे. काल ७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे
झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४७ हजार ९७२ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक
५७ शतांश टक्के इतका आहे. काल पाच हजार ८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात
आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ४७ हजार १९९ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ५२ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ७१ हजार
९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १२ कोरोना विषाणू बाधित
रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १७९ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा, लातूर
जिल्ह्यात तीन, बीड जिल्ह्यात दोन, तर जालना जिल्ह्यात एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ५६ नवे रुग्ण
आढळले, नांदेड जिल्ह्यात ३९, लातूर ३२, बीड २७, परभणी ११, उस्मानाबाद सात, जालना सहा,
तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला नवीन एक रुग्ण आढळला.
औरंगाबाद रेल्वे स्थानकावर १९७ प्रवाशांची
तर विमानतळावर ४० प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले
यांनी केलं आहे.
****
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, औरंगाबाद इथं उद्या शनिवारी लोकअदालतीचं
आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ, जिल्हा आणि सत्र न्यायालय
तसंच जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावरच्या न्यायालयांमध्ये, सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय
लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या लोकअदालतीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन,
दाखलपूर्व तसंच प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड करण्याचं आवाहन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे
अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, श्रीपाद टेकाळे यांनी केलं आहे. ज्येष्ठ
नागरिक किंवा प्रत्यक्ष सहभाग घेणं शक्य नसलेल्या नागरिकांना, दूरदृश्य संवाद प्रणाली
- व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा वॉट्सॲप कॉलद्वारे यात सहभागी होता येईल, मात्र त्यांनी
आजच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयाला संपर्क करून, आपल्या नावाची नोंद
करणं आवश्यक आहे.
****
परभणी जिल्ह्यात काळ्या बाजारात विक्रीच्या
हेतुने साठवून ठेवलेला १६४ पोती तांदुळ पोलिसांनी जप्त केला. जिंतूर तालुक्यात बोरी
इथं बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या तांदळाची बाजारभावानुसार किंमत सुमारे
सव्वा लाख रुपये असून, या प्रकरणी शेख जवरोद्दीन शेख बशीरोद्दीन याला ताब्यात घेतलं
आहे.
दरम्यान, परभणी इथं काल एस टी बसनं
आलेल्या एका प्रवाशाकडून पोलिसांनी सुमारे ५४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. अहमद
अलीम असं या प्रवाशाचं नाव असून, तो तीन बॅगमधून हा गुटखा घेऊन आला होता.
****
अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या
एकनाथवाडी शिवारात ६ लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. विष्णू अनिल डोंगरे,
बाळासाहेब भानुदास खेडकर, शहादेव रावसाहेब खेडकर, या तिघांच्या शेतात ही झाडं लावलेली
होती.
****
No comments:
Post a Comment