Saturday, 19 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.12.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

तांत्रिक विघातक प्रगतीसमोर माध्यमं आणि पत्रकारिता यांचं भविष्य आणि बातम्यांचं पावित्र्य याबाबत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली असून, विश्वासार्ह पत्रकारिता सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं आहे. एम.व्ही.कामत स्मृती व्याखानमालेंतर्गत “पत्रकारिता : भूतकाळ,वर्तमान आणि भविष्य” या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. वृतपत्र स्वातंत्र्य, सेन्सॉरशिप, वृत्तांकनाच्या निकषांचं उल्लंघन, पत्रकारितेच्या मुल्यांची घसरण, पीत पत्रकारिता, लाभकारी पत्रकारिता, बनावट आणि पेड न्यूजद्वारे अपप्रचार आणि खोटी माहिती, इंटरनेटमुळे निर्माण झालेला अडथळा यासारख्या बाबी आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या भविष्याबाबतही उपराष्ट्रपतींनी यावेळी चिंता व्यक्त केली.

****

भारत हा सौर ऊर्जेच्या वापरात जगात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं, ऊर्जा विभागाचे महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. ऊर्जा सप्ताहानिमित्त काल लातूर इथल्या केशवराज विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध उपक्रम सादरीकरणावेळी ते बोलत होते. घर, शाळा तसंच परिसरातील ऊर्जाबचत जाणीव जागृती करून राष्ट्र निर्माण कार्यात सहभाग घ्यावा असं आवाहन, कुलकर्णी यांनी यावेळी केलं.

****

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला काल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठार केलं. करमाळा तालुक्यात राखुंडे वस्ती जवळ ही कारवाई करण्यात आली. या बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात करमाळा तालुक्यात तिघांचा बळी गेला आहे. तालुक्यात आणखी काही बिबटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

****

नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस रेल्वेगाडी दिल्ली ते अमृतसर दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. आज नांदेडहून सुटणारी ही गाडी दिल्लीपर्यंत धावणार आहे, उद्या ही गाडी दिल्लीहूनच नांदेडकडे परतीच्या प्रवासाला निघणार असल्याचं, रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ॲडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात २० षटकांत नऊ बाद ३६ धावा झाल्या होत्या. काल ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात आला. भारत ८९ धावांनी आघाडीवर आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...