Monday, 22 March 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र दिनांक २२ मार्च २०२१

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

दिनांक २२ मार्च २०२१

****

जागतिक जल दिन आज पाळण्यात येतो. पाण्याचं आणि पाणी बचतीचं महत्व अधोरेखित करणं, जगभरात जल संकटाच्या बाबतीत जागरुकता निर्माण करणं आणि २०३० पर्यंत सगळ्यांसाठी पाणी आणि स्वच्छता सेवा सुनिश्चित करण्यासाठी नागरीकांना प्रेरित करणं, हा या दिनाचा उद्देश आहे. पाण्याचं महत्व समजणं, हा यंदाचा जल दिनाचा विषय आहे. 

जागतिक जल दिनाच्या निमित्तानं जलशक्ती अभियान - कॅच द रेन या अभियानाचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. “पाऊस जेव्हा आणि जिथे पडेल त्यानुसार जलसंचय” या संकल्पनेसह हे अभियान देशभरात राबवलं जाईल. याची अंमलबजावणी मान्सूनपूर्व आणि मान्सून कालावधीत म्हणजे २२ मार्च २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत होईल. पावसाच्या पाण्याची योग्य साठवण सुनिश्चित करण्यासाठी हवामान आणि मातीच्या स्थितीनुसार अनुकूल वर्षासंचयन संरचना तयार करण्यासाठी सर्वांना उद्युक्त करणं हा यामागचा हेतू आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात मनिहाल क्षेत्रात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली, त्यादरम्यान ही चकमक झाली.

****

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत राष्ट्रीय बँक पायाभूत सुविधा आणि विकास विधेयक २०२१ मांडणार आहेत. वित्तीय पायाभूत सुविधा आणि विकासासाठी राष्ट्रीय बँक स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे.

****

 

मराठवाड्यात काल नव्या चार हजार ४१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३१ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ११, नांदेड जिल्ह्यातल्या नऊ, जालना चार, परभणी तसंच लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ४३२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९२७, जालना ५२७, लातूर ३७७, बीड ३६६, परभणी २२१, उस्मानाबाद ११७ तर हिंगोली जिल्ह्यात ७४ नवे रुग्ण आढळून आले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...