Saturday, 22 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.10.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 October 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.

****

सरकारचा सर्वाधिक भर तरुणांच्या कौशल्य विकासावर असून, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी देशात मोठी मोहीम सुरू असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. रोजगार मेळावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दहा लाख कर्मचाऱ्यांच्या भरती मोहिमेचा दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केल्यानंतर ते आज बोलत होते. यावेळी पहिल्या टप्प्यात देशभरातल्या ७५ हजार युवक-युवतींना नियुक्तीची पत्र सुपूर्द करण्यात आली. देशातल्या युवा वर्गासाठी विविध धोरणांना अधिक सोपं बनवलं जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी सरकारद्वारे केल्या जात असलेल्या विविध कामांची यावेळी माहिती दिली. रोजगार उपलब्धतेमुळे भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर आली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. 

****

दरम्यान, केंद्र सरकारच्या या योजनेच्या धर्तीवर राज्यातही अशा प्रकारे रोजगार योजना राबवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होते. लवकरच राज्यात पोलीस दलातल्या १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्येत दिवाळीनिमित्त होणार्या भव्य दिपोत्सवात सहभागी होणार आहेत. आयोध्या भेटीत ते भगवान रामलल्लांचं दर्शन घेतील आणि पूजा करतील तसंच रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या जागेची पाहणी करणार आहेत.

****

सरसेना अध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्यासह, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी पुण्यातल्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी - एनडीए मधल्या, हट ऑफ रिमेंबरन्स इथं देशसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या एनडीएच्या माजी विद्यार्थ्यांना आदरांजली वाहिली. यावेळी चौहान यांनी एनडीए मधल्या प्रशिक्षणाचा आढावा घेऊन, सुधारणा आणि संयुक्त उपक्रमांना चालना देण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

****

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात हासोरी परिसरात सौम्य भूकंपाच्या नोंदी झाल्या. त्यावर उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आढावा बैठक घेतली. नागरिकांसाठी तात्पुरता निवारा उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळा खोल्यांसाठी तातडीने आराखडा तयार करून निधी मागणी प्रस्ताव सादर करावा. तात्पुरत्या वर्ग खोल्यां उभारण्यासाठी जागेचा शोध घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारीनी यावेळी दिल्या.

****

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांनी वंचित, उपेक्षित तसंच गरजूंसाठी काल दिवाळी साहित्याचं वाटप केलं. दिवंगत मेटे हे दरवर्षी दिवाळी फराळ तसंच आवश्यक साहित्याचं वाटप करत. त्यांची ही परंपरा खंडित होऊ नये, या हेतुने ज्योती मेटे यांनी बीड शहरालगत असलेल्या वस्तीवर दिवाळी साहित्याचं वाटप केलं.

****

दिवाळी दरम्यान होणारी प्रवाशांची  गर्दी  लक्षात  घेवून  दक्षिण  मध्य  रेल्वेनं हुजूर साहिब नांदेड ते हडपसर दरम्यान आणखी एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी २५ तारखेला संध्याकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी नांदेड इथून सुटेल आणि पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, अहमदनगर, दौंड कोर्ड लाईन मार्गे हडपसर इथं दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी हडपसर इथून २६ तारखेला दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल आणि नांदेडला दुसर्या दिवशी सकाळी साडे चार वाजता पोहोचेल.

****

इजिप्त इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल कनिष्ठ गटात भारताच्या सागर डांगी, वरुण तोमर आणि सम्राट राणा यांच्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं. तर सागरनं वैयक्तिक रौप्यपदक आणि वरुण तोमरनं कांस्य पदक जिंकलं.

****

ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ मध्ये मध्ये उद्या भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे अडीच फूट उंचीवर स्थिर करुन एकूण ४७ हजार १६० घनफूट प्रतीसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे.

****

मान्सून काल विदर्भाच्या उर्वरित भागातूनही माघारी फिरला असून, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अजूनही मान्सूनचं अस्तित्व कायम आहे. येत्या ४८ तासात मान्सून संपूर्ण देशाचा निरोप घेईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...