Friday, 21 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.10.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 21 October 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २१ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यास प्रारंभ

·      भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरची पदं भरण्यासाठी, टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची मदत घेणार, रिक्त ७५ हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

·      मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी दोन हजार ८०० बचत गट निर्माण करण्याचा निर्णय

·      राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील ३० जून पर्यंतचे खटले मागे घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

·      उस्मानाबादमधील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येत्या १५ नोव्हेंबर पासून प्रवेश प्रक्रिया

आणि

·      राज्यातल्या ४३ पोलिस अधिक्षक स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, परभणी, हिंगोली, नांदेड, आणि लातूरला नवे पोलिस अधिक्षक

 

 

सविस्तर बातम्या

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत, ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा प्रारंभ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झाला. सुमारे अडीच हजार कोटी रुपये याअंतर्गत जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाच वेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीमुळं बळीराजानं खचून जाऊ नये. राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. योजनेतर्गत सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. ते म्हणाले......

Byte….

२०१७-१८, १८-१९ आणि १९-२० मध्ये ज्यांनी पिक कर्ज घेतलं होतं, आणि वेळेवर ज्यांनी पेमेंट केलं होतं, त्या सगळ्यांना आपण शासनाच्या माध्यमातून पन्नास हजार हा प्रोत्साहनपर जाहीर केला होता. आणि जवळजवळ नऊ लाख शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये नोंदणी केली होती. त्यांच्यातल्या जवळजवळ आठ लाख खातेदारांना त्याच्यापैकी व्हॅलिडिटी आलेलं आहे. त्याच्यातल्या सात लाख लोकांना ज्यांचं थंब इंप्रेशन, व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे.

****

भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर या बँकेच्या मालमत्तांचं शासनाकडे हस्तांतरण केलं जाणार आहे. शासनाच्या या निर्णयानुसार बँकेच्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची एकूण ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्ज माफ होणार असून, राज्यातली सुमारे ६९ हजार हेक्टर जमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे.

****

राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरची पदं भरण्यासाठी, टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची मदत घ्यायचा निर्णय, राज्य मंत्रीमंडळानं काल घेतला. यामुळे गट ब मधली अराजपत्रित, गट क आणि गट ड मधल्या ७५ हजार पदांच्या भरतीचा मार्ग सोपा झाला आहे. यापूर्वी विविध भरती परीक्षेत झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस- आय ओ एन, आय बी पी एस या कंपन्यांना नामनिर्देशनानं काम सोपवण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे यापूर्वीच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतली तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरची सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीनं या संस्थांमार्फत घेण्याचाही निर्णय झाला.

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पंधरा जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी दोन हजार ८०० बचत गट निर्माण करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळानं घेतला आहे. यासाठीच्या अठरा कोटी ५९ लाख रुपये इतक्या खर्चासदेखील यावेळी मान्यता देण्यात आली. मराठवाड्यातल्या औरंगाबाद, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, लातूर आणी बीड जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या अंतर्गत प्रती जिल्हा २०० प्रमाणे बचत गटांची निर्मिती महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. तसंच औरंगाबाद, नांदेड, परभणी यासह वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, नागपूर या पाच शहरांमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक महिलांसाठी स्वंयसहाय्यता बचत गट स्थापन करण्यात आलेले आहेत. या बचत गटातल्या एक हजार पाचशे महिलांना राज्य कौशल्य विकास संस्था आणि महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

****

राज्यातल्या `माता सुरक्षित तर घर सुरक्षित` या विशेष मोहिमेत महिलांना तपासणीसाठी नेण्याकरता, तसंच औषधांसाठी प्रती जिल्हा दोन कोटी रुपये निधी देण्यास, काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या अंतर्गत राज्यातल्या सुमारे चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहे. या मध्ये १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रीया यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम १५ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

****

राज्यात ज्या साखर कारखान्यांची ऊस गाळप क्षमता १२५० मेट्रीक टन आहे, अशा साखर कारखान्यांना आपली क्षमता अडीच हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवण्यासाठी भाग भांडवल पुरवण्याचा निर्णयही, मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

राजकीय आणि सामाजिक आंदोलनामुळे गेल्या ३० जून पर्यंत दाखल झालेले खटले मागे घेण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यापूर्वी हे खटले मागे घेण्यासाठी  गेल्या ३१ मार्च पर्यंतची कालमर्यादा होती. ती आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान न झालेल्या तसंच जिवीतहानी न झालेले खटले मागे घेण्याची कार्यवाही यात केली जाईल.

****

नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात, 'महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन - मित्र' स्थापन करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे शासनाला दर्जेदार सल्ला आणि धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार आहे. अशा संस्थेची स्थापना करण्याबाबत निती आयोगाकडून प्राप्त सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मित्र’ ला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ आणि दैनंदिन कामकाजासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळ असेल.

ऐच्छिकरित्या वाहनं भंगारमध्ये काढणाऱ्यांना व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. यामुळे भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

****

`फाईव्ह जी` तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगानं वाढवण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण तयार करण्यात आलं आहे. भारतीय टेलीग्राफ नियमांप्रमाणं राज्याचं हे दूरसंचार धोरण सुसंगत करण्यात आलं आहे. यासंदर्भातला निर्णय काल घेण्यात आला. हे धोरण जमिनीवरून आणि जमिनीखालून टाकावयाच्या दोन्ही प्रकारच्या ऑप्टीकल फायबर केबलसाठी लागू राहील.

****

माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ विभागातली राजपत्रित पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळण्यात आली आहेत. सध्या उपलब्ध असलेले तंत्रज्ञ अन्य ठिकाणी चांगली संधी मिळाल्यास काम सोडून जातात. असे अचानकपणे झाल्यास प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही पदं तातडीनं भरता यावीत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क संस्थेला अनुदान स्वरुपात निधी देण्याचा निर्णयही काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणं शक्य होणार आहे.

****

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या अठरा वर्षीय रुद्रांक्ष पाटील याला रोख दोन कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी काल जाहीर केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याच्या अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला.

****

परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल दिले. जिल्हा प्रशासनानं अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे निर्देश यावेळी मदत आणि पुनर्वसन तसंच कृषी विभागाला दिले आहे.

****

समृद्ध पर्यावरणासाठी प्रत्येकानं आपलं योगदान दिलं पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांनी काल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची मुंबईत शपथ दिली, त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,

 

Byte…

 

अवेळी येणारा पाऊस, अतिवृष्टी, परतीच्या पावसात देखील झालेलं शेतीचं नुकसान, क्लायमेट चेंज, ग्लोबल वार्मिंग हे सगळं जे आहे हे प्रदूषणामुळे आणि निसर्गाच्या सगळ्या बदलत्या चक्रामुळे झालेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला ही काळाची गरज आहे हे सगळं पर्यावरणाचं समतोल राखणं आणि म्हणून शासन जास्तीत जास्त यामध्ये प्रयत्न करतीये आपलं निसर्गाशी अतूट असं नातं आहेच परंतु हे सण साजरे करत असतांना फटाक्याची आतिषबाजी जी काही दिवाळीत होते, त्याचं ध्वनी आणि हवेचं जे काही प्रदूषण वाढतं परंतु गेल्या चारपाच वर्षांपासून आपण प्रयत्न केल्यामुळे, जनजागृतीमुळे हे कमी होत आहे.

 

राज्यात एकल वापर प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासन जास्तीत जास्त प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा दहा लाख रुपयांवरुन पंधरा लाख रुपये करण्यात आल्याची माहिती, या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची अट ६० वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयाचा मराठा समाजातल्या तरुणांना मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, महामंडळातर्फे मराठा समाजातल्या व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपये बिनव्याजी कर्ज प्रतीदिन दहा रुपये प्रमाणे परतफेडीच्या अटीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासंदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येत्या १५ नोव्हेंबर पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून ४३० खाटांचं जिल्हा रुग्णालय सुरु होणार असल्याचं पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं. या महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांसह मानव संसाधन तसंच अत्यावश्यक बाबींकरता पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारनं १८९ कोटी तर राज्य सरकारनं १४२ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

****

अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारने नकार दिला असून, खटला चालवण्यासाठी मागितलेली परवानगी गृह खात्याने नाकारली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

****

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत बीड शहरात सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम टप्पा दोनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, नगरोत्थान योजनेंतर्गत बीडच्या विकासकामांसाठी भविष्यात निधीची कमतरता जाणवणार नाही, असं सांगितलं. बीडसह एकंदरीतच संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी भरीव निधी राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याचं ते म्हणाले. नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील १६ रस्त्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मंजूर कामांचा शुभारंभ काल झाला असं फडणवीस यांनी सांगितलं.

****

केंद्र शासनाची पंतप्रधान आवास योजना, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनांच्या अंमलबजावणीस गती देऊन सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. असे निर्देश औरंगाबाद जिल्हा विकास समन्वय आणि नियंत्रण समितीचे अध्यक्ष केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. काल औरंगाबाद इथं केंद्र शासनाच्या योजनांचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तीयाज जलील, आमदार हरीभाऊ बागडे, यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या एकूण ४० योजनांची अंमजबजावणी, लक्षांक, उदिष्टपूर्ती साठीच्या अडचणी याविषयी या बैठकीत  चर्चा करण्यात आली.

****

राज्यातल्या ४३ पोलिस अधिक्षक स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या. यात परभणीच्या पोलिस अधीक्षक म्हणून रामसुधा आर, हिंगोलीला संदीपसिंह गील, नांदेडला श्रीकृष्ण कोकाटे आणि लातूर सोमय मुंडे यांची नियुक्ती झाली आहे. औरंगाबादमध्ये गुन्हे अन्वेषण विभाग पोलिस अधिक्षक पदी सचिन पाटील यांना नियुक्ती मिळाली आहे.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधून जाणार असली तरी या पदयात्रेत संपूर्ण राज्यातले काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी असतील, अशी माहिती, पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. ते काल हिंगोली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या ७ नोव्हेंबरला गांधी यांची यात्रा महराष्ट्रात येत आहे, ही यात्रा नांदेड जिल्ह्यातून हिंगोली मार्गे वाशिम, शेगाव अशी मार्गक्रमण करणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड, गंगापूर, वैजापूर, वाळूज या भागात काल मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं. औरंगाबाद शहरामध्ये संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातही काल अनेक भागात पाऊस झाला. शिरुर कासार तालुक्यातल्या भानकवाडी इथं राऊंद नदीच्या पूरात तीन सख्खे भावंड वाहून गेल्याची घटना काल घडली. दोन बहिणींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून, भावाचा शोध सुरु आहे. काल दुपारी या भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तर दगडवाडी शिवारात अंगावर वीज पडून रावसाहेब जायभाये या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

****

मुबंई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे विजयी झाले. यावेळी अमोल काळे यांना १८३ तर माजी कसोटीवीर संदीप पाटील यांना १५८ मतं मिळाली आहेत. या निवडणुकीसाठी ३०० हून अधिक जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...