Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 22 October 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· गडकिल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची
घोषणा
· जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी, महिनाभरात धोरण तयार
करण्याची उपमुख्यमंत्र्यांची सूचना
· महिला आणि बाल विकास विभागाच्या ‘स्थलांतर निरीक्षण प्रणाली’चं उद्घाटन
· ऑरिक सिटीला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे उद्योग मंत्री उदय
सामंत यांचे निर्देश
· दीपावलीनिमित्त औरंगाबादसह सहा ठिकाणी “लखलख चंदेरी” कार्यक्रमाचं आयोजन
· मराठवाड्याच्या अनेक भागात कालही परतीचा पाऊस;नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे
करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश
आणि
· टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडकडून झालेल्या पराभवानं वेस्ट इंडीजचं
आव्हान संपुष्टात
सविस्तर बातम्या
महाराष्ट्रातले गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेवा असून त्यांचं संवर्धन करण्यासाठी
राज्य शासनाच्या वतीने दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात
बोलत होते.
दरम्यान, शेतकऱ्यांचा कायमस्वरुपी विकास व्हावा यासाठी विशेष कृती आराखडा तयार
करण्यात येणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. नाशिक सहकारी साखर कारखान्याचा
गळीत हंगामाचा शुभारंभ करताना ते काल बोलत होते. शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या मदत योजनांचा
आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले...
जे तातडीचे पाच हजार रूपये
आपण देत होतो, घरांमध्ये नुकसान झालं, धान्य भिजलं, कपडे भिजले, तिथे देखील आपण पंधरा
हजार केले. हे केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण करतोय. हे तर नुकसान भरपाईचं झालं.
परंतू कायमस्वरूपी, शेतकऱ्यांना यामध्ये फायदा झाला पाहिजे यासाठी देखील सरकार आपलं,
विशेष कृती आराखडा तयार करतीयेय.
छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था - ‘सारथी’च्या नाशिक विभागीय कार्यालयाचं
उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी, तरुणांचं
भविष्य घडवण्याचं उदात्त धोरण अंगिकारणाऱ्या सारथी संस्थेला शासनामार्फत सर्वतोपरी
मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं.
****
राज्यातल्या आठ जलविद्युत
प्रकल्पांच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी, जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने
संयुक्तरित्या महिन्याभरात धोरण तयार करण्याची सूचना, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा आणि
लाभक्षेत्र विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल मुंबईत यासंदर्भातल्या
बैठकीत ते बोलत होते. जलसंपदा विभागाने जलविद्युत प्रकल्प विहित मर्यादेत पूर्ण करण्यासाठी
उपाययोजना आखाव्यात, प्रस्तावित प्रकल्प किमान तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी धोरण तयार
करावं, काही प्रकल्पांतर्गत खाजगी गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावा, कुसुम सोलर
पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांना मदत करावी, आदी
सूचनाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
****
स्थलांतरित गर्भवती, स्तन्यदा माता आणि बालकांची अद्यावत माहिती तात्काळ एकाच प्रणालीवर उपलब्ध
करणाऱ्या, देशातल्या पहिल्या ‘स्थलांतर निरीक्षण प्रणाली’चं, काल महिला आणि बाल विकास
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन झालं. वैयक्तिक विशिष्ट ओळख क्रमांकांद्वारे,
असुरक्षित हंगामी स्थलांतरित लाभार्थ्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी, महिला
आणि बालविकास विभागाने ही यंत्रणा विकसित केली
आहे. या प्रणालीमुळे हंगामी स्थलांतरित महिला तसंच बालकांची माहिती तात्काळ
उपलब्ध होईल, यामुळे लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ देणं सहज सुलभ होणार आहे. गेल्या
वर्षी नोव्हेंबरमध्ये, चंद्रपूर, अमरावती, जालना, पालघर, नंदुरबार आणि गडचिरोली या
सहा जिल्ह्यांमध्ये, प्रायोगिक तत्वावर या प्रणालीच्या मदतीने वेबसाईट आधारित अॅपमध्ये
लाभार्थ्यांची माहिती भरण्यास सुरवात झाली होती. स्थलांतरित लाभार्थ्यांना ते असलेल्या
ठिकाणी अंगणवाडीच्या सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रक्रियेत
आलेल्या आव्हानांचा अभ्यास करून अॅपमध्ये तशा प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या. आता
राज्यभर स्थलांतरित लाभार्थींची नोंद घेण्याची प्रक्रिया या मोबाईल अॅपमध्ये यानिमित्ताने
सुरु होणार आहे.
****
ऑरिक सिटीला मुंबई - नागपूर
समृद्धी महामार्गाशी जोडल्यास इथल्या गुंतवणूकीत नक्कीच वाढ होणार असल्यानं संबंधित
यंत्रणांनी तातडीने हे काम पूर्ण करण्याचे निर्देश, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी
दिले आहेत. काल औरंगाबाद इथं ऑरिक सिटीला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. ९०० मीटर अंतराचा
हा मार्ग उभारल्यावर मुंबई आणि पुण्याशी कनेक्टीव्हीटी वाढून वेळेची बचत होणार असल्यानं
उद्योजक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऑरिक सिटीमध्ये
सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचं नियोजन करावं, ट्रक टर्मिनल उभारावं, रहिवासी वसाहतींमधल्या
समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही सामंत यांनी
दिले. ऑरिक सिटीत उद्योग वाढीसाठी काही नवीन योजना सुरू करता येतील का याचाही विचार
करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सामंत यांच्या हस्ते काल चिकलठाणा औद्योगिक परिसरातल्या, मराठवाडा
लघुउद्योग संघटनेच्या सभागृहाचं उद्घाटन झालं. औद्योगिक वसाहतीतल्या अंतर्गत रस्ते
विकासाला निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि तो निधी त्याच औद्योगिक क्षेत्रासाठी वापरण्याचा
शासन निर्णय लवकरच निर्गमित केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. मराठवाड्यात लघु उद्योगवाढीसाठी
अमृत या उपक्रमातंर्गत उद्योजकांसाठी दोन हजार चौरस फुट भूखंड आणि यात एक हजार चौरस
फुटावर बांधकाम करुन देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सामंत यांनी दिली.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआय या तपास यंत्रणेला राज्यात कारवाई करण्यासाठी
राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही, असा निर्णय शासनानं घेतला आहे. महाविकास
आघाडी सरकारने, राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने राज्य सरकारची
परवानगी घेणं आवश्यक असल्याचा निर्णय, २१ ऑक्टोबर २०२० रोजी घेतला होता. मात्र राज्य
सरकारच्या या निर्णयामुळे सीबीआयला राज्यात पुन्हा तपास करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
****
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गोरेगाव
इथल्या पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीने ३१ जुलै रोजी
संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर राऊत यांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज
दाखल केला होता. त्यावर काल सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने जामीन अर्जावर निर्णय
न देता, पुढची सुनावणी दोन नोव्हेंबरला ठेवली आहे. त्यामुळे राऊत यांच्या न्यायालयीन
कोठडीत दोन नोव्हेंबरपर्यंत वाढ झाली आहे.
****
१०० कोटी कथित वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल
देशमुख यांचा जामीन अर्ज, केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे.
देशमुख यांना या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयानं ईडी प्रकरणात जामीन
मंजूर केला होता. सीबीआयकडे दाखल प्रकरणात त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र
देशमुख हे जामीनावर सुटल्यास या प्रकरणातल्या पुराव्याबरोबर छेडछाड करु शकतात असं म्हणत
सीबीआयने त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. देशमुख यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये
अटक करण्यात आली आहे.
****
पोलिस स्मृती दिन काल पाळण्यात आला. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथं चीनच्या
सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दहा पोलिसांनी प्राणाची आहुती दिली
होती. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.
मुंबईत नायगाव पोलिस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा पोलिसांच्या स्मृतीस अभिवादन केलं.
औरंगाबाद इथं पोलिस आयुक्तालयाच्या मैदानावर हुतात्मा स्मृति स्तंभाला पोलिस
आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. खासदार इम्तियाज
जलिल, आमदार हरीभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते.
****
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत २०१९ मधल्या आंदोलनप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना
न्यायालयानं पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कडू
यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल होता. या प्रकरणाच्या नियमित सुनावणी दरम्यान
बच्चू कडू हे न्यायालयात नेहमी गैरहजर राहिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. यापुढे सुनावणीला
हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याचा इशारा जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिला
आहे.
****
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दीपावलीनिमित्त, राज्यात औरंगाबाद,
मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि अमरावती या सहा ठिकाणी, “लखलख चंदेरी”, या सांस्कृतिक कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती
दिली. दीपावली पहाट आणि दीपावली संध्या या स्वरूपात हा कार्यक्रम होणार आहे. औरंगाबाद
इथं २५ आणि २६ तारखेला हा कार्यक्रम होईल. शहरातल्या तापडिया नाटयमंदिरात २५ तारखेला
संध्याकाळी सहा वाजता दीपावली संध्या कार्यक्रमात, अभिजीत कोसंबी, अभिषेक नलावडे, दीपाली
देसाई, संज्योती जगदाळे यांच्यासह इतर कलाकार सहभागी होणार असून, २६ तारखेला सकाळी
सहा वाजता दीपावली पहाट या कार्यक्रमात, मंगेश बोरगांवकर आणि रसिका नातू आपला कार्यक्रम
सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ
घ्यावा असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे.
****
सवत्स धेनू अर्थात गाय वासराच्या
पूजेनं कालपासून दीपावलीला प्रारंभ झाला. आज धनत्रयोदशी. निरोगी दीर्घायुष्यासाठी आज
धन्वंतरी पूजन तसंच यम दीप दानाची प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर फटाके, कपडे, फराळाचे
जिन्नस तसंच गृहसजावटीसह विविध साहित्य खरेदीसाठी काल बाजारपेठांमधून ग्राहकांची मोठी
गर्दी दिसून आली.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या चार ते सात डिसेंबर दरम्यान,
महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सवाचं आयोजन होणार आहे. राज्यातल्या २० विद्यापीठांचे
जवळपास दोन हजार ४०० खेळाडू यात सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या आयोजनाबाबत कुलगुरु
डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. क्रीडा महोत्सवाच्या पूर्वी
विद्यापीठ कार्यक्षेत्रातल्या चारही जिल्ह्यात मशालफेरी काढून वातावरण निर्मिती करण्यात
येईल, अशी माहिती कुलगुरु येवले यांनी दिली.
****
मराठवाड्यात कालही अनेक ठिकाणी परतीचा पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात काल सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. औंढा नागनाथ तालुक्यात येळेगाव
सोळंके, जवळा बाजार, शीरड शहापूर, पिंपळदरी, पोटा या भागात ढगफुटीदसदृश पाऊस झाला.
नांदेड- औरंगाबाद मार्गावर चोंडी इथला पूल काल कोसळला. पुलाखालचा भाग पाण्यामुळे
निखळून पडल्यानं या पुलावरची वाहतुक काल सकाळीच बंद करण्यात आली होती. ही वाहतुक पर्यायी
मार्गाने वळवण्यात आली आहे.
बीड, लातूर, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक भागात काल पाऊस पडला. या पावसामुळे
सर्वत्र खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मालगाव आणि मांजरा धरण क्षेत्रात मोठ्या
प्रमाणात पाऊस झाल्यानं दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
****
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश,
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, आणि बीड जिल्ह्यात
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची काल शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर
ते बोलत होते. पंचनामा करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता
घेण्याची सूचना त्यांनी केली.
****
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं हेक्टरी ५० हजार
रुपयांची भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली
आहे. विमा कंपन्यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानापोटी
पीक विम्याची रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असं चव्हाण यांनी म्हटलं
आहे.
****
पंतप्रधान पीक विमा योजनेतल्या मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या
नुकसानासाठी, परभणी जिल्ह्यात सहा तालुक्यांतल्या आठ मंडळात, ७३ हजार ८१४ सोयाबीन उत्पादक
शेतकऱ्यांना, ४० कोटी ७१ लाख १२ हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली
आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपनीकडून सुरुवात
झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात हंगामातल्या प्रतिकूल परिस्थितीनुसार नुकसानीच्या पंचवीस टक्के
आगाऊ पीक विमा मंजूर झाल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. पंतप्रधान
पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी या पिकांसाठी जवळपास ४०० कोटी रुपये
नुकसान भरपाई रक्कम मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या ब
गटातल्या पात्रता सामन्यात आयर्लंड संघानं वेस्ट इंडीजचा ९ गडी राखून पराभव केला. या
पराभवानंतर वेस्ट इंडीज संघाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
या स्पर्धेत भारताचा पहिला सामना परवा २३ तारखेला, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत
सामना होणार आहे.
****
पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत उस्मानाबाद इथं रोटरी क्लबने वीस क्षयरुग्ण
सहा महिन्यांसाठी दत्तक घेतलं आहे. या क्षयरुग्णांना काल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात
पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं. जिल्ह्यातील क्षयरुग्णांना सहा महिने ते तीन वर्षासाठी
अतिरिक्त पोषण आहाराकरिता दत्तक घेण्यास समाजातील इच्छुकांनी आपणहून पुढे यावे आणि
निक्षय मित्र होऊन उस्मानाबाद जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी आपले मोलाचे योगदान द्यावं,
असं आवाहान जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांनी केलं आहे
****
दिवाळीनिमित्त आतषबाजी करताना वीजसुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन वीज महावितरण
कंपनीकडून करण्यात आलं आहे. विद्युत रोहित्र, फ्यूज पेट्या, तसंच वीजवाहिन्यांना स्पर्श
होईल किंवा धोका निर्माण होईल असे फटाके उडवू नयेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका
निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या,
१८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९ १२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं
आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment