Thursday, 21 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.12.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date : 21 December 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २१ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.

****

देशात गेल्या २४ तासांत ३५८ कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची नोंद झाली असून यातल्या सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त ३०० रुग्ण हे केरळ राज्यातले असून यात गुजरात मधल्या ११, महाराष्ट्रातल्या १०, तामिळनाडू १२, तेलंगाणा पाच, कर्नाटकच्या १३  रुग्णांचा समावेश आहे. देशात सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दोन हजार ६६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या सोडे इथल्या शासकीय आश्रमशाळेत अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणी आणखी १७ विद्यर्थिनींना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आश्रमशाळेतल्या विद्यर्थिनींना काल दुपारी मध्यान्ह भोजनानंतर अस्वस्थ वाटत असल्यानं १०७ विद्यार्थिनींची तपासणी करून औषधोपचार केल्यानंतर ९२ विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या या रुग्णालयात ६९ विद्यार्थिनीं उपचार घेत असून, त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. सोडे इथल्या शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक पाठवण्यात आलं असून, उर्वरित विद्यार्थिनींची तपासणी करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यामध्ये वटपळी इथं रस्त्यावर उभ्या वाहनाला शालेय सहल बसनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाले तर अन्य एक शिक्षक आणि काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाठ यांना या अपघातामध्ये डोक्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत तर दुसरे शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा अपघातस्थळी मृत्यू झाला. जखमींना अकलूज  इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

****

मतदारांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र- ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राबद्दल असलेला गैरसमज दूर करण्यासाठी वाशिम इथं विशेष उपक्रम सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या साठी एक मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. आपण केलेलं मतदान योग्य उमेदवाराला पडतं याची शाश्वती देणारं प्रात्यक्षिकही या ठिकाणी दिलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या या उपक्रमांतर्गत नव मतदारांनी ईव्हीएमवर मतदान कसं करावं हे सांगितलं जात आहे. जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी बूवनेश्वरी एस. यांच्या संकल्पनेतून सुरू या उपक्रमाला अनेक नागरिक भेट देत आहेत.

****

राज्याच्या अनेक भागांमध्ये आज आणि उद्या ढगाळ हवामान राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****

विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत उद्या लातूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातल्या अहमदपूर, औसा, चाकूर, देवणी, लातूर, निलंगा, रेणापूर, उदगीर या तालूक्यातल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आलं आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना आज पार्ल मधील बोलंड पार्क इथं खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेचार वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतला पहिल्या सामन्यात विजय मिळवलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळं मालिकेचं विजेतेपद मिळवण्यासाठी भारतीय संघाला आजचा सामना जिंकावा लागेणार आहे. 

****

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे वर्ष २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल आणि श्रीनिवास मिलमधल्या गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतल्या यशस्वी पात्र १६० गिरणी कामगार, वारस यांना आठव्या टप्प्यांतर्गत नुकतंच सदनिकांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं. गेल्या १५ जुलैपासून आतापर्यंत एक हजार ४७० सदनिकांच्या चाव्यांचं याअंतर्गत वाटप करण्यात आलं असल्याची माहिती या संबंधी समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी दिली आहे.

****

गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगावबांध - नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आणखी तीन वाघ सोडण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून हे वाघ आणण्यात येणार असून यापूर्वी गेल्या २० मे रोजी दोन वाघिणींना नागझिरा प्रकल्पात सोडण्यात आलं आहे.

****

संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली तसंच काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोबाईलमध्ये चित्रफीत केल्याचा  लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलक कार्यकर्त्यांनी यावेळी निदर्शनं केली.  

****

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात ३८ बालकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते काल श्रवण यंत्र वाटप करण्यात आलं. या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ३३४५ अंगणवाड्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील २ लाख ८७ हजार ८३ बालकांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...