Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 22 December 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
विकसित भारत संकल्प
यात्रा आज छत्रपती संभाजीनगर इथल्या हडको परिसरात पोहचली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री
डॉ. भागवत कराड यांनी नागरीकांसोबत या यात्रेचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध
योजना गोरगरिबांपर्यंत पोहचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा आपल्या कडे आली आहे, या योजना समजावून
घ्या, लाभार्थी बना, असं आहवान कराड
यांनी यावेळी केलं. नागरिकांनी विविध योजना जाणून घेण्यासाठी याठिकाणी गर्दी केल्याचं
आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची प्रतिज्ञा उपस्थितांना
देण्यात आली.
****
लातूर लोकसभा
मतदारसंघात २०१९ पासून राबवलेल्या विविध शासकीय योजना तसंच सामाजिक प्रकल्पात केलेल्या
कामांचा सविस्तर पुस्तकरूपी माहितीचा 'विकासपर्व' हा अहवाल, खासदार सुधाकर
श्रृंगारे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. या अहवालात लातूर
लोकसभा मतदार संघात सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा आणि इतर अनेक विकास
कामाबाबत माहितीचा ही समावेश असल्याचे श्रृंगारे यांनी सांगितलं. लातूर इथं होत असलेल्या
रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनास येण्याबाबत पंतप्रधान मोदी यांना विनंती केल्याचंही
श्रृंगारे यांनी सांगितलं.
****
नांदेड इथं राष्ट्रीय
कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेअंतर्गत २०२३-२४ मध्ये बाजार
भावाने तूर खरेदी करण्यासाठी पणन महासंघाच्या संस्थाकडून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी
सुरु झाली आहे. अर्धापूर, हदगाव, कासराळी, देगलूर इथल्या
केंद्राना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
नोंदणी करावी, असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश
हेमके यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात
देखील तूर खरेदी करण्यासाठी सहा केंद्राना परवानगी दिली आहे. नाफेड प्रथमच बाजारभावात
तूर खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी या खरेदी
केंद्रावर नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांनी केलं आहे.
बीड जिल्ह्यात
पाच केंद्रांना तूर खरेदी करण्याची परवानगी दिली असून, या केंद्रावर
लातूरच्या बाजारभावात ९ हजार २०० ते ९ हजार ८०० रुपये प्रती क्विंटल तुरीची खरेदी केली
जाणार आहे. परळी, घाटनांदुर, अंबाजोगाई, चौसाळा आणि माजलगाव
इथल्या केंद्रांमध्ये तूर खरेदीसाठी शेतकर्यांना नोंदणी करता येणार आहे.
****
कोरोना विषाणूच्या
नवीन जे एन - वन विषाणूच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचा आढावा
घेतला जात असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी
दिली आहे. राज्य शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांचं पालन आरोग्य यंत्रणेकडून तसंच
प्रशासनाकडूनही केलं जात आहे. जिल्ह्यात सध्या तरी कोणताही धोका नाही, मात्र नागरिकांनी
खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकार्यांनी केलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे
ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी आमदार आणि धुळे
लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचं आज नाशिक इथं अल्पशा आजारानं
निधन झालं,
ते ७५ वर्षांचे होते. सोनवणे यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून
सलग दोन वेळा विजय मिळवला, त्यानंतर त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाची
निवडणुक जिंकली होती.
****
परभणी जिल्ह्यात
पूर्णा तालुक्यातल्या लक्ष्मणनगर इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत
काल शासकीय वाळू डेपोला प्रारंभ झाला. शासनाच्या नवीन वाळू धोरणावा एक भाग म्हणून हा
डेपो सुरु करण्यात आला असून, या माध्यमातून सहाशे रुपये प्रति ब्रासप्रमाणे वाळू
मिळणार आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात
पंढरपूर इथं काल खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि रामदास आठवले युवामंच संस्थेच्या संयुक्त
विद्यमाने केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांच्या उपस्थितीत
विशेष कार्यक्रम घेण्यात आला. नव्या भारताची नवीन खादीने आत्मनिर्भर भारत अभियानाला
नवी दिशा दिली असून, गेल्या नऊ वर्षात खादी उत्पादनांच्या
विक्रीत चार पटीने वाढ झाल्यानं, ग्रामीण भारतातले कारागीर आर्थिकदृष्ट्या
समृद्ध झाले असल्याचं कुमार यावेळी म्हणाले. ग्रामोद्योग विकास योजनेतंर्गत विविध जिल्ह्यातून
आलेल्या १८० लाभार्थ्यांना मधुमक्षिका पालन पेटी, स्वयंचलित अगरबत्ती
बनवण्याची मशीन तसंच विद्युत चलित चाकाचं वाटप
यावेळी करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी येत्या ३१ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. हा या मालिकेचा एकशे आठवा भाग आहे. यावेळी फिट इंडिया या विषयावर भर दिला
जाणार असून,
या विषयावरील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्टार्ट अप्स
याबाबत नागरीकांनी माहिती देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. नमो ॲपच्या हेल्दी
मी. हेल्दी इंडिया या विभागामध्ये नागरीकांना त्यांचे अनुभव सांगता येतील.
****
No comments:
Post a Comment