Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date
: 22 December 2023
Time
: 7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक
बातम्या
·
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप;खासदार निलंबनाविरोधात
विरोधी पक्षांचा मोर्चा
·
कोविडच्या नव्या विषाणूला न घाबरता
प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करावं-मुख्यमंत्र्यांचं आवाहन
·
आईवरुन मुलांची जात ठरवता येणार नसल्याचं
राज्य सरकारकडून स्पष्ट
·
लोक साहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री
डॉ प्रभाकर मांडे यांचं निधन
आणि
·
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तिसरा एकदिवसीय
क्रिकेट सामना जिंकत भारताचा मालिका विजय
सविस्तर
बातम्या
संसदेचं हिवाळी अधिवेशन काल
अनिश्चितकाळासाठी संस्थगित झालं. अधिवेशन काळात लोकसभेत १८ तर राज्यसभेत १७ विधेयकं
पारित झाली. फौजदारी कायद्यांमध्ये बदल करणाऱ्या तीन विधेयकांना संसदेची मंजुरी मिळाली
आहे. ही विधेयकं राज्यसभेनं काल पारित केली, लोकसभेत ती यापूर्वीच संमत झाली होती. मुख्य निवडणूक आयुक्त
आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयक तसंच वृत्तपत्र आणि नियतकालिकं नोंदणी विधेयक २०२३
काल लोकसभेत संमत करण्यात आलं.
****
विरोधी पक्षांच्या खासदारांनी
नवी दिल्लीत संसद भवन ते विजय चौक असा निषेध मोर्चा काढला. लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा तसंच खासदारांचं निलंबन मागं घ्यावं
अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर
या मार्गावरची वाढती वाहतूक पाहता,
नवा पुणे
- छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग लवकरच निर्माण करण्यात येईल, अशी माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत दिली. बांधा-वापरा-हस्तांतरित करा - बीओटी योजनेअंतर्गत
हा प्रकल्प राबवण्यात येणार असून,
हा मार्ग
पुणे रिंग रोडला जोडण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तळेगाव- चाकण- शिंगणापूर
मार्गासाठीचा आराखडाही तयार असून,
यासाठीचा
प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
****
राज्यात कोरोना विषाणूचा नवीन
जे एन - वन हा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
काल राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले. सध्या
राज्यात कोरोनाचे ४५ सक्रीय रुग्ण असून, यामध्ये मुंबईतल्या २७, पुणे आणि ठाणे इथल्या प्रत्येकी आठ, तर कोल्हापूर आणि रायगड इथल्या प्रत्येकी
एका रुग्णाचा समावेश आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना
प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करावं,
असं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
Byte…
ज्यांना
सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे सिम्प्टम असतील तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे आणि
गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नाताळ येतोय, ३१ डिसेंबर
येतोय. त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पण घाबरण्याची आवश्यकता
नाही. एवढाच आवाहन याठिकाणी मी करतोय कारण पूर्वी आपण या कोविडचं मोठं संकट, त्याचा
सामना केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर या अनपेक्षित संकटामध्ये सर्व टिमने काम केले आहे.
पुन्हा एकदा मी सांगेन, की काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु घाबरण्याची आवश्यकता
नाही.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी
आस्तिककुमार पाण्डेय यांनी देखील काल आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. कोविडच्या
अद्याप नवीन प्रकारचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळून आलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता
सतर्कता बाळगावी,
गर्दीच्या
ठिकाणी मास्क वापरावा,
असं आवाहनही
जिल्हाधिकार्यांनी केलं आहे.
****
आईवरुन मुलांची जात ठरवता येणार
नाही, असं राज्य सरकारच्या वतीने
स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्याच्या शिष्टमंडळाने काल जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली
सराटी इथं मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मंत्री
गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. एखादा व्यक्ती कुणबी असेल तर त्याच्या पत्नीच्या
नात्यातल्या नातेवाइकांना तसं कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. शेवटच्या
माणसाची कुणबी नोंद बघेपर्यंत ही कार्यवाही चालूच राहणार, असल्याचं महाजन यांनी सांगितलं. मंत्री
उदय सामंत आणि संदिपान भुमरे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, आरक्षण जाहीर करण्यासाठी २४ डिसेंबरची
मुदत पुढे ढकलण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. काल जालना इथं झालेल्या जाहीर सभेतही
त्यांनी हीच भूमिका मांडली. जरांगे यांची आज लातूर इथं सभा होणार आहे.
****
जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल यवतमाळ इथं वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणाचा
वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे तेव्हढं आरक्षण त्या जातीला
द्यावं, अशी मागणीही, आठवले यांनी यावेळी केली.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
लोक साहित्याचे गाढे अभ्यासक
आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे मार्गदर्शक पद्मश्री डॉ प्रभाकर भानुदास
मांडे यांचं काल अहमदनगर इथं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
मराठी विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेले मांडे यांनी धुळ्यातल्या का. स. वाणी
प्रगत मराठी अध्ययन केंद्रांचे संचालक म्हणून तसंच राज्य प्रौढ शिक्षण संस्थेचे संचालक
म्हणूनही समर्थपणे काम केलं. लोकसाहित्य संशोधन मंडळाची त्यांनी स्थापना केली. मराठवाड्यातील
कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी यासह त्यांची ५० मराठी आणि इंग्रजी पुस्तकं प्रकाशित
झाली आहेत. केंद्र सरकारनं मांडे यांना याच वर्षी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं होतं.
मांडे यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे.
****
हैद्राबाद मुक्तीसंग्रामतले
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा काशिनाथअप्पा खुमसे यांचं काल लातूर इथं वृद्धापकाळानं
निधन झालं, ते १०३ वर्षांचे होते. खुमसे
यांनी अंबाजोगाई तालुक्यातल्या बर्दापूर इथं झालेल्या पोलीस कारवाईत मोलाची कामगिरी
बजावली होती. त्यांच्या पार्थिव देहावर आज रेणापूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
विकसित भारत संकल्प यात्रेला
सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा काल छत्रपती संभाजीनगर शहरात पवन नगर
परिसरात पोहोचली. या यात्रेच्या माध्यमातून मिळालेल्या लाभांची नागरिकांनी माहिती दिली.
या यात्रेअंतर्गत आज लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या
काही ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार असून, नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन, प्रशासनानं केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यातल्या
लेंडी प्रकल्पाबाबत,
आधी पुनर्वसन
मग धरण, अशी भूमिका ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी जाहीर केली आहे. पाटकर यांनी काल नांदेड इथं लेंडी प्रकल्पाबाबत, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यानंतर त्या बोलत होत्या. धरणाला विरोध नाही मात्र पुनर्वसना
संदर्भातल्या कायद्यांचं पालन झालं पाहिजे, अशी शेतकऱ्यांची भूमिका असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
दक्षिण आफ्रिकेत पर्ल इथं झालेल्या
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी पराभव करत, मालिका दोन - एकनं जिंकली आहे. कालच्या
सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २९६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा
संघ २१६ धावांवर सर्वबाद झाला. अर्शदीप सिंहनं चार, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरनं प्रत्येकी दोन गडी बाद
केले.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला
क्रिकेट संघादरम्यान मुंबईत सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात कालच्या पहिल्या
दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ९८ धावा झाल्या. स्मृती मंधाना ४३, तर स्नेह राणा चार धावांवर खेळत आहे.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ धावांवर संपुष्टात आला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज वेल्ड
टेक फेअर २०२३ चं उद्घाटन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार आहे. चेंबर
ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर, मराठवाडा ऑटो क्लस्टर, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल
इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर, तसंच औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स
असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामानं,
वेल्डिंग
क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आणि छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग
विश्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
****
लिंगायत आरक्षणाच्या मागणीसाठी
काल लातूर इथं मोर्चा काढण्यात आला. वीरशैव लिंगायत समाजाला वाणी जातीचं प्रमाणपत्र
देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
****
नांदेड इथं काल नांदेड पोलीस
परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्या अध्यक्षतेखाली
शांतता समितीची बैठक झाली. जिल्ह्यात लोकशाही मार्गानं आंदोलन केल्यास सहकार्य केलं
जाईल, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
लातूर जिल्ह्यात प्रधानमंत्री
टीबी मुक्त भारत अभियान राबवण्यात येत असून, यामध्ये सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर
- घुगे यांनी केलं आहे..
****
No comments:
Post a Comment