Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
दिल्लीलगतच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटनांना केंद्र सरकारनं पाचव्या टप्प्यातील चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. चर्चेच्या पुढील फेरीत किमान आधारभूत किंमतीसह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार असून आंदोलक शेतकऱ्यांनी शांतता राखायला हवी, असं केंद्रीय कृषिमंत्री अर्जून मुंडा यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आज नवी दिल्लीत आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि व्यवस्थापन या राष्ट्रीय प्रकल्पाचा शुभारंभ करणार आहेत. या प्रकल्पाचं उद्दिष्ट वीस हजाराहून अधिक आदिवासी लोकांना आरोग्य लाभ मिळवून देणं हे आहे. याअंतर्गत सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सामान्य आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
****
प्रख्यात कायदेतज्ज्ञ, भारतीय न्यायशास्त्रज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस. नरिमन यांचं आज वृद्धपकाळानं मुंबईत निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. नरिमन यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. फली नरिमन यांनी १९९१ ते २०१० या काळात बार असोसिएशन ऑफ इंडियाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फली नरिमन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. फली नरीमन यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं असं, पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नरीमन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
****
विख्यात निवेदक अमिन सयानी यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. ओघवते निवेदन, भारदस्त आवाजाचे सयानी यांनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडीओवर गीतमाला सादर केली. या कार्यक्रमामुळं ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांनी रेडीओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगितिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. सयानी यांच्या अंत्यविधीविषयी लवकरच कळवू, असं त्यांचे पूत्र राजिल सयानी यांनी सांगितलं आहे.
अमीन सयानी यांनी भारतीय प्रसारणात क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांनी श्रोत्यांशी खास बंध जोपासला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सयानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
“अमीन सयानी यांच्या निधनानं भारतीय रेडिओच्या सांगितिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
राज्य कारभार कसा करावा याचा वस्तूपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला त्यांच्या प्रेरणेतूनच आम्हाला कारभार करायचा आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईतील कुर्ला इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात ते आज बोलत होते.
आज पर्यावरण संवर्धन कसं करावं हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकावं. त्यांची अर्थनीती, युद्धनीती, राजनीती अशा नितींवर आज जगभरात अभ्यास होत असल्याचही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मंदिराच्या लोकार्पणानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.
****
नंदुरबार तालुक्यातील रनाळे इथं काल रात्री भंडाऱ्याच्या प्रसादातून दोनशेहून अधिक भक्तांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. रनाळे गावात बाळू मामाच्या भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये भगर आमटी आणि दुधाचा प्रसाद भाविकांनी खाल्ल्यानंतर त्यांना मध्यरात्रीनंतर उलट्या, जुलाब आणि मळमळ सुरू झाली. त्यामुळं त्यांना रनाळे इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. घटनेची माहीती मिळताच आरोग्य प्रशासन तातडीनं कामाला लागलं आहे. १२५ जणांना उपचार घेतल्यानंतर सुटी देण्यात आली असून ७५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे; सर्वांची प्रकृती ही धोक्याबाहेर असल्याचं आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहेत.
****
आजपासून बारावीची परीक्षा सुरु झाली असून नांदेड जिल्ह्यात बारावीच्या १०१ परीक्षा केंद्रावर ४२ हजारांवर विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ही परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी प्रत्येक केंद्रावर महसूल अधिकारी, ग्रामपंचायत, शिक्षण विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांचे बैठक पथक कार्यरत आहेत, तसंच आठ भरारी पथकही केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी स्थापन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिली.
****
ओडिशातील बिरसा मुंडा स्टेडियमवर आज पुरुष हॉकी स्पर्धेत भारताचा सामना नेदरलँडशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल.
****
No comments:
Post a Comment