Monday, 13 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

शिक्षण संस्थांनी मुलांचं करिअर घडवण्याइतकंच व्यक्तिमत्व घडवण्यालाही महत्व द्यावं, असं आवाहन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शारदा मंदीर प्रशालेच्या शताब्दी पूर्ती समारोहात त्या आज बोलत होत्या. यावेळी शाळेच्या निवृत्त शिक्षिका रत्नप्रभा गोगटे, ज्येष्ठ विद्यार्थीनी स्वातंत्र्य सेनानी ताराबाई लड्डा, क्रीडापटू राशी जाखेटे यांचा महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थीनींशीही त्यांनी यावेळी थेट संवाद साधत, प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली. विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासासोबतच खेळ, साहित्य, कला, आदी विषयातही प्रावीण्य मिळवावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 

****

माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशानं त्यांच्या अभ्यासक्रमात निवडणूक साक्षरता हा विषय सुरु करावा, अशा सूचना निवडणूक आयोगानं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केल्या आहेत. १५ ते १७ वयोगटातली ही मुलं मुली भावी मतदार असणार आहेत, त्यामुळे त्यांना या वयातच मतदानाबाबत शिक्षण देणं आवश्यक असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं एन सी आर टी ला सांगून निवडणूक साक्षतरेविषयक एक पुस्तिका तयार करण्यासही आयोगानं सांगितलं आहे.

****

विमुद्रीकरणाचे नकारात्मक परिणाम आता दिसून येत असल्याचं माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. जुन्या नोटा रद्द करुन भ्रष्टाचारावर काहीही परिणाम होणार नसून, यामुळे देशाच्या विकास दरावर हळूहळू परिणाम होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.  

****

विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी नीति आयोगानं सुरु केलेल्या लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. याअंतर्गत गेल्या ५० दिवसात सुमारे आठ लाख नागरिकांना १३३ कोटी रुपयांची पारितोषिकं प्रदान करण्यात आली. अजून ५० दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत या योजना सुरु राहणार आहेत. 

****

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण सुधारणा सुचवण्यात येतील, अशी माहिती यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष अशोक दलवाई यांनी दिली आहे. उत्पादकतेत वाढ आणि कमी खर्चात पीक लागवड ही प्रमुख उद्दीष्टे समोर ठेऊन, नव्या उपाययोजना आखल्या जातील, असं त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. येत्या एप्रिलपर्यंत ही समिती आपला अहवाल सादर करेल, यासाठी कृषी वैज्ञानिक, शेतकरी, व्यवसायिक संस्था यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

राज्यातल्या दहा महानगरपालिकांच्या एक हजार २६८ जागांसाठी नऊ हजार १९९ उमेदवार रिंगणात असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे, अशा १५ जिल्हा परिषदांच्या ८५५ जगांसाठी चार हजार २७८, तसंच त्याअंतर्गत येणाऱ्या १६५ पंचायत समित्यांच्या एक हजार ७१२ जागांसाठी सात हजार ६९३ उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी १६ फेब्रुवारीला, तर महानगरपालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

****

शेतकऱ्यांनी कमी खर्चात तुरीचं उत्पादन घेण्यासाठी अत्याधुनिक तसंच पारंपारिक पद्धतींची योग्य सांगड घालावी, असं आवाहन राज्याचे कृषी विस्तार संचालक डॉ. हरिहर कोसडीकर यांनी केलं आहे. पुणे इथं भारतीय किसान संघ आणि भारतीय कृषी आर्थिक संशोधन केंद्र यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तूर परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादाला राज्यातले शंभराहून अधिक शेतकरी उपस्थित होते.

****

भारत आणि बांग्लादेश दरम्यान हैदराबाद इथं सुरु असलेल्या एकमेव कसोटी सामन्याचा शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांग्लादेशाच्या दुसऱ्या डावात सात बाद २२५ धावा झाल्या होत्या. भारतानं आपला दुसरा डाव १५९ धावांवर घोषित केला आहे. बांग्लादेशला सामना जिंकण्यासाठी २३४ धावांची, तर भारताला सामना जिकंण्यासाठी तीन बळी घेण्याची आवश्यकता आहे. 

//*******//

No comments: