आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
राष्ट्रीय
वयोश्री योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. आंध्रप्रदेशात नेल्लोर इथं नागरी विकास मंत्री
एम. व्यंकय्या नायडू आणि सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत या
योजनेला प्रारंभ होईल. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक
उपकरणं मोफत पुरवली जाणार आहेत. येत्या तीन वर्षात सुमारे साडे पाच लाख ज्येष्ठ नागरिकांना
या योजनेचा लाभ मिळेल, यासाठी ४८५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
*****
मालमत्ता
खरेदी विक्री व्यवहारांच्या नोंदणी शुल्क - रेडीरेकनरच्या दरात आजपासून वाढ होण्याचे
संकेत आहेत. मुद्रांक शुल्क, नोंदणी विभागासह संबंधित विविध विभागांमार्फत सर्वेक्षण
करून प्राप्त अहवालानुसार रेडीरेकनर दर निर्धारित केले जातात.
****
छत्तीसगडमध्ये
बस्तर जिल्ह्यात काल ३३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामध्ये चार महिलांचा समावेश
असून, इतर चार जणांवर एक लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं, असं पीटीआयच्या
बातमीत म्हटलं आहे. नक्षलविरोधी मोहिमेत हे छत्तीसगड पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे.
****
नांदेड इथल्या सत्यशोधक मंचातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट संपादनाचा डॉ.
बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार माध्यमतज्ज्ञ डॉ. सुधीर गव्हाणे आणि नांदेडचे डॉ.
राजेंद्र गोणारकर यांना जाहीर झाला आहे. येत्या चार एप्रिलला नांदेड इथं ज्येष्ठ विचारवंत
डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
चौथ्या
बौद्ध साहित्य संमेलनाचं आयोजन उद्या परळी वैजनाथ इथं करण्यात आलं आहे. नटराज रंग मंदिरातील
डॉ. कृष्णा किरवले साहित्य नगरीत आयोजित या संमेलनात चर्चासत्र, परिसंवाद, काव्यवाचन
आदी कार्यक्रम होणार असल्याचं स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. विनोद जगतकर यांनी सांगितलं.
****
नांदेडहून
अजनीला जाणारी उन्हाळी विशेष गाडी प्रवाशांच्या कमी संख्येमुळे बंद होण्याची शक्यता आहे. दक्षिण
मध्य रेल्वेनं नांदेड इथून
नागपूरला जाण्याकरता नांदेड ते अजनी
ही विशेष गाडी मार्च ते जून दरम्यान चालवण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही,
तर ही गाडी जून पूर्वीच बंद होईल, असं नांदेड विभागाच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं
आहे.
//*******//
No comments:
Post a Comment